पश्चिम बंगाल मधून येऊन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्ष गोव्याच्या राजकारणात पायरोवा करू शकतात. पण गोव्यापासून हाकेच्या अंतरावरील महाराष्ट्रातल्या दोन प्रादेशिक पक्षांची डाळ गोव्याच्या राजकारणात शिजत नाही. याला काय म्हणायचे? गोव्याच्या राजकारणाचा “गुण” की या दोन प्रादेशिक पक्षांच्या नेतृत्वाच्या मर्यादा??Mamata can come to Goa and do political work, but why can’t Shiv Sena-NCP do it
ममता बॅनर्जी यांनी जिद्द बाळगून पश्चिम बंगालमध्ये भाजपचा पराभव केला किंवा त्या आधी डाव्या पक्षांची राजवट संपवली. तशी जिद्द महाराष्ट्रातले दोन प्रादेशिक पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या नेतृत्वांना का दाखवता आली नाही? ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात अनेक दोष काढता येतील.
पश्चिम बंगालमधील त्यांच्या राजवटीमध्ये अनेक उणीवा देखील असतील. पण ममता बॅनर्जी ज्या तडफेने लढतात आणि प्रदेश काबीज करतात तशी तडफ शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या नेतृत्वांना का दाखवता येत नाही?
ममता बॅनर्जी यांनी गोव्यात तीन वेळेला दौरे केले. प्रत्येक वेळी त्यांनी भाजपवर तोंडी तोफा डागल्या. पण काँग्रेस फोडली. राष्ट्रवादी काँग्रेसही फोडली. आपल्या तृणमूल काँग्रेस पक्षाची तळापासून बांधणी सुरू केली. त्याला यश किती येईल? एकाच निवडणुकीत पक्ष किती मोठा होईल?, हा भाग अलहिदा. पण ममता बॅनर्जी या “राजकीय लक्ष्य” केंद्रित करून काम करतात आणि ते देखील आपल्या पश्चिम बंगाल या राज्याची मर्यादा ओलांडून काम करतात हे मात्र निश्चित…!!
मग शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वांना या पद्धतीचे “राजकीय लक्ष्य” केंद्रित करून महाराष्ट्राबाहेर अन्य राज्यांमध्ये काम का करता येत नाही? शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसला ती अधिक संधी होती. त्यांच्याकडे बाकीच्या राज्यांमधले अनेक तडफदार नेते होते. पी. ए. संगमा, तारिक अन्वर, गुजरात मधले छबिलदास मेहता, डी. पी. त्रिपाठी ही नावे लहानसान नावे नव्हती. या नेत्यांना राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने पुरेसे पाठबळ दिले असते
तर पुर्वोत्तर राज्ये, बिहार, गुजरात हिन्दी पट्ट्यातील राज्ये यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला पायरोवा करता येणे, संघटन उभे करणे शक्य होते. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाने ते का केले नाही?? वर उल्लेख केलेल्या नेत्यांना पुरेसे पाठबळ का दिले नाही? इतकेच नाही तर ममता बॅनर्जी या ज्या तडफेने बाकीच्या राज्यांचा दौरा करतात, त्या तडफेने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाने अन्य राज्यांचे दौरे केलेले दिसले नाहीत.
कोणतेही नेतृत्व एक दोन निवडणुकांमध्ये उभे राहत नाही. संघटन उभे करण्यासाठी भरपूर खपावे लागते. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व संघटन उभे करण्यासाठी महाराष्ट्रात जरूर खपतात. पण बाहेरच्या राज्यांमध्ये ते जातही नाहीत. अगदी गोव्यासारख्या प्रांतामध्ये देखील शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते कित्येक वर्षात गेले नसतील आणि गेले असले तरी “राजकीय मुशाफिरी”पेक्षा त्याला किंमत अधिक नसेल…!!
अशा स्थितीत बंगाल सारख्या दूरवरच्या प्रांतातून येऊन ममता बॅनर्जी आपल्या तृणमूल काँग्रेसच्या राजकीय पायरोवा गोव्यासारख्या छोट्या राज्यात करू शकतात, पण गोव्याच्या शेजारच्या हाकेच्या अंतरावरच्या महाराष्ट्रातल्या प्रादेशिक पक्षांचे दोन नेते मात्र हा साधा करिशष्मा नाही करू शकत नाहीत. याला कारण गोव्याच्या राजकारणाच्या “गुणा”पेक्षा या दोन प्रादेशिक पक्षांच्या नेतृत्वाच्या शक्तीमर्यादेत दडले आहे.