काँग्रेस पक्षाची प्रकृती आता तोळामासा होऊनही पक्षातली गटबाजी संपलेली नाही उलट ती अधिक उफाळली आहे. एकेकाळचा “वाघ्या” असलेला पक्ष आता “पाग्या” झाला तरी त्याचा “येळकोट राहीना आणि गटबाजीचा मूळ स्वभाव जाईना” असे म्हणायची वेळ त्या पक्षाच्या नेत्यांनी आणली आहे…!!congress groupism increased so much in its current weak political position
“त्याचा येळकोट राहीना। मूळ स्वभाव जाईना।” जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या भारुडातल्या या पंक्ती आहेत. यात त्यांनी मनुष्य स्वभावाचे वर्णन केले आहे. परंतु चारशे वर्षांनंतरही या पंक्ती काँग्रेस पक्षाला शंभर टक्के लागू होत आहेत. “आधी होता वाघ्या। त्याचा झाला पाग्या। त्याचा येळकोट राहीना। मूळ स्वभाव जाईना।” असे हे भारुड आहे.
काँग्रेसची आजची दारुण अवस्था पाहता हे भारूड त्या पक्षाला चपखल लागू होत आहे. काँग्रेस पक्ष जेव्हा ऐन भरात होता, जेव्हा त्याला कोणताही विरोधी पक्ष टक्कर देण्याच्या स्थितीत नव्हता तेव्हा काँग्रेसमध्ये दोन – तीन – चार गट एकमेकांशी सत्तेसाठी भांडायचे आणि एकमेकांनाच पराभूत करून विजय झाल्याचे ढोल पिटायचे. तेव्हा काँग्रेस पक्ष “वाघ्या” होता, पण गेल्या दहा वर्षांमध्ये देशातल्या जनतेने त्याचा पार “पाग्या” करून टाकला आहे.
काँग्रेस पक्ष एवढा दुबळा – पतला झाला आहे की देशाच्या एखाद-दुसऱ्या कोपऱ्यात वगळता पक्षाची कुठे सत्ताही टिकलेली नाही. पण या “वाघ्या”चा “पाग्या” झाला तरी त्याचा मूळ स्वभाव काही जाईना…!! म्हणजे काँग्रेस मधली गटबाजी त्याच्या या दुबळ्या पतल्या अवस्थेतही संपेना…!! अशी स्थिती आहे.
जिथे काँग्रेस पक्षाची राजकीय प्रकृती तोळामासा आहे तिथे एका पेक्षा एक गट एकमेकांच्या जीवावर उठले आहेत. पण जिथे ते सत्ताधारी आहेत, पूर्ण बहुमत त्यांच्याकडे आहे अशा छत्तीसगड आणि पंजाबमध्ये दोन प्रबळ गट एकमेकांच्या राजकीय जीवावर उठले आहेत.
पंजाबमध्ये तर दोन गट एकमेकांच्या नरडीचा घोट घेत आहेत की काय…??, असे वाटण्याची स्थिती येऊन ठेपली आहे. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग आणि नवज्योत सिंग सिद्धू यांच्यात राजकीय समझोता व्हावा म्हणून काँग्रेस श्रेष्ठींनी भरपूर प्रयत्न करून झाले. नवज्योत सिंग सिद्धूला प्रदेशाध्यक्षपद दिले. पण वाद काही मिटायला तयार नाही. पक्षाचे पंजाब प्रभारी हरीश रावत यांनी अखेर हात टेकले. प्रभारी पद सोडण्याची तयारी दाखवली.
निवडणुका सहा महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत आणि दोन्ही गट एकमेकांशी शत्रुपक्ष असल्यासारखे भांडत आहेत. समोर अकाली दल आणि बहुजन समाज पक्षाने प्रचंड मोठे आव्हान उभे केले आहे. दोन्ही पक्षांची युती बहुमताने सत्तेवर येण्याचे सर्व्हे प्रसिद्ध झाले आहेत. पण काँग्रेसचे दोन गट मात्र एकमेकांना पुरते गाडल्याशिवाय राहणार नाही, अशा धमक्या देत आहेत.
नवज्योत सिंग सिद्धू यांनी आज सगळ्यात वरकडी करून ज्यांनी त्यांना प्रदेशाध्यक्ष नेमले त्या काँग्रेस श्रेष्ठींनाच धमकी देऊन टाकली आहे. भाषा काय वापरली आहे…??, तर “ईट से ईट बजा दुंगा” मला निर्णय घेऊ दिला नाही, तर मी एकेकाची वाजवीन अशीच ही धमकी आहे. यात त्यांनी काँग्रेस श्रेष्ठींनाही लपेट्यात घेतले आहे.
एकेकाळी राज्याराज्यांमध्ये काँग्रेसचे गट एकमेकांशी झुंजवत ठेवण्यात काँग्रेस श्रेष्ठी स्वतः रस घ्यायचे. त्यातून आपले वर्चस्व संपूर्ण काँग्रेस पक्षावर टिकून राहील, हे पाहायचे. पण आता प्रदेश समित्यांमधले वाद एवढे टोकाला गेले आहेत की ते काँग्रेस श्रेष्ठींनी नाही कोलायला कमी करत नाहीत.
नवज्योत सिंग सिद्धू यांचे भाषण अशाच कोलण्याच्या प्रवृत्तीतून आले आहे. त्यांना पक्षश्रेष्ठींची भीती वाटेनाशी झाली आहे. पूर्वी पक्षश्रेष्ठींनी एक कटाक्ष टाकला तरी भांडणारे गट थोड्या दिवसांपुरते तरी शांत व्हायचे. आता पक्षश्रेष्ठी दोन दोन – तीन तीन मीटिंग घेतात, पण भांडण काही मिटत नाही.
छत्तीसगडमध्ये हा अनुभव येतो आहे. मंत्री टी. एस. सिंगदेव आणि मुख्यमंत्री भूपेश बघेल हे दोन्ही गट एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. दोन्ही नेते पक्षश्रेष्ठींना भेटले आहेत. पण वाद मिटलेला नाही. उलट तो आता शक्तिप्रदर्शनापर्यंत येऊन ठेपला आहे. भूपेश बघेल 26 आमदारांसह राहुल गांधींना भेटले आहेत. टी. एस. सिंगदेव माघार घेण्याच्या स्थितीत नाहीत. त्यांच्याही दोन मीटिंगा पक्षश्रेष्ठींबरोबर झालेल्या आहेत.
महाराष्ट्र देखील काँग्रेस पक्षाचा चौथ्या क्रमांकावर आहे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले स्वबळावर लढून क्रमांक एकचा पक्ष होण्याच्या बाता करत आहेत त्यांच्या प्रदेशाध्यक्षपदाचा नियुक्ती नंतर सहा महिन्यांनी त्यांना भरभक्कम टीम मिळाली आहे. पण या टीममध्ये जुन्या नेत्यांच्या मुलांना प्रमुख स्थान देण्यात आले आहे. कार्यकर्ते आणि मोठा वारसा नसलेले नेते यांना महत्त्वाचे स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे ते नाराज आहेत. जी 23 गटाच्या नेत्यांमध्ये असलेल्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना प्रदेश काँग्रेसच्या शिस्तपालन समितीचे अध्यक्षपद देऊन काँग्रेस श्रेष्ठींनी नव्या शिस्तभंगासाठी निमंत्रण दिले आहे. त्यांच्या नियुक्तीवर झालेली खोचक टविट बघता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये किती अस्वस्थता आहे हेच दिसून येत आहे. चौथ्या क्रमांकाच्या पक्षाची ही गटबाजीची अवस्था कायम आहे.
या सर्वांचा अर्थ एकच पक्षाची प्रकृती आता तोळामासा होऊनही पक्षाचा मूळ स्वभाव जाईना. एकेकाळचा “वाघ्या” असलेला पक्ष आता “पाग्या” झाला तरी त्याचा “येळकोट राहीना आणि गटबाजीचा मूळ स्वभाव जाईना” असे म्हणायची वेळ आली आहे…!!
congress groupism increased so much in its current weak political position
महत्त्वाच्या बातम्या
- सावधान ! गॅस एजन्सी तुमच्याकडून सिलेंडरचे जास्त पैसे घेतेय , कुठे कराल तक्रार , वाचा सविस्तर
- कोणाच्या वहिनीवर कोणी अॅसिड फेकले…??; नारायण राणेंचे गंभीर आरोप कोणावर…??, जन आशीर्वाद यात्रेत जोरदार चर्चा
- नाशिकच्या मैदानात अमित ठाकरेंची पहिली गर्जना, म्हणाले – कोणतही सरकार कायम नसत
- काँग्रेसचा शिस्तीचा अजब बडगा, जी 23 मध्ये जाऊन शिस्तभंग करणारे पृथ्वीराज चव्हाण शिस्तपालन समितीचे अध्यक्ष