नवज्योत सिंग सिद्धू यांना मुख्यमंत्रीपद नाकारुन काँग्रेस श्रेष्ठींनी कॅप्टन अमरिंदरसिंग यांचे मन राखले आहे. आपण मुख्यमंत्री राहणार नसू तर आपल्याला पर्याय देणारे नेतृत्व नवज्योत सिंग सिद्धू यांच्या रुपाने तयार होता कामा नये हा कॅप्टन साहेबांचा आग्रह काँग्रेस श्रेष्ठींनी मान्य केलेला दिसतो. त्यामुळेच अमरिंदर सिंग यांनी नव्या मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले आहे. हा देखील काँग्रेसच्या राजकीय संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे.
पंजाबच्या मुख्यमंत्रीपदासाठी कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्यानंतर फ्रंट रनर्स असलेल्यांपैकी कोणत्याही नेत्याला काँग्रेस श्रेष्ठींनी मुख्यमंत्री बनविले नाही. यात काहीही आश्चर्य वाटण्यासारखे घडलेले नाही. किंबहुना तो काँग्रेस राजकीय संस्कृतीचा एक भाग आहे. Congress culture of making Chief Ministers dependant on central leadership
काँग्रेस श्रेष्ठींनी आत्तापर्यंत कोणत्याही राज्याच्या मुख्यमंत्र्याला आपल्यापेक्षा लोकप्रिय होऊ दिलेले नाही. किंवा प्रमुख बंडखोर नेत्याला मुख्यमंत्री केलेले नाही. कोणताही मुख्यमंत्री लोकप्रिय झाला की त्याला घरची वाट दाखविणे याची सुरुवात इंदिरा गांधींनी केली तीच परंपरा आत्तापर्यंतच्या सर्व काँग्रेस श्रेष्ठींनी पाळली आहे. त्याला गांधी – नेहरू खानदान वगळता झालेले काँग्रेसचे अध्यक्ष देखील अपवाद नाहीत. पी. व्ही. नरसिंहराव आणि सीताराम केसरी हे दोन गांधी-नेहरू नसलेले काँग्रेसचे अध्यक्ष देखील इंदिरा गांधींच्या पावलावर पाऊल टाकून मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत वागलेले आहेत.
आज पंजाबमध्ये अंबिका सोनी, सुनील जाखड, खुद्द नवज्योत सिंग सिद्धू, सुखविंदर सिंग रंधवा या फ्रंट रनर्सना डावलून चरणजीत चन्नी यांची निवड काँग्रेस श्रेष्ठींनी केली. काँग्रेसचा इंदिरा गांधींच्या पासूनचा इतिहास यात “रिपीट” झाला आहे. इंदिरा गांधींनी कोणत्याही मुख्यमंत्र्याला स्थिर ठेवून राज्य करू दिलेले नाही आणि मुख्यमंत्र्यांची निवड करताना देखील राज्यातला लोकप्रिय चेहरा दिलेला नाही. किंबहुना राज्यातली लोकप्रियता कोणत्याही नेत्याच्या मुख्यमंत्रिपदाच्या आड आल्याचीच उदाहरणे अनेक आहेत. वसंतदादा पाटील हे महाराष्ट्रातले महत्त्वाचे असे उदाहरण आहे. वसंत दादांना मुख्यमंत्री करायचे नाही म्हणून इंदिरा गांधींनी अब्दुल रहमान अंतुले, बाबासाहेब भोसले या नेत्यांना देखील महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बसविले पण वसंत दादांना 1980 नंतर ती संधी दिली नव्हती.
शिवाय कोणत्याही विद्यमान मुख्यमंत्र्याच्या विरोधात जो प्रमुख प्रमुख नेता बंड करतो त्याला देखील काँग्रेस श्रेष्ठींनी मुख्यमंत्री केल्याचा इतिहास नाही. त्यामुळेच नवज्योत सिंग सिद्धू हे कॅप्टन अमरिंदरसिंग यांचे कट्टर प्रतिस्पर्धी त्यांची इच्छा असूनही मुख्यमंत्री बनू शकलेले नाहीत. 1993 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या विरोधात बंडखोरी करणारे प्रमुख नेते पद्मसिंह पाटील यांना नरसिंह राव यांनी मुख्यमंत्री केले नाही. त्यावेळी तर त्यांना शरद पवारांचा जबरदस्त पाठिंबा होता. परंतु, नरसिंह रावांनी शरद पवारांना केंद्रातून संरक्षणमंत्री पदावरून दूर करून महाराष्ट्रात परत पाठवून मुख्यमंत्री केले. पण पद्मसिंह पाटलांना मुख्यमंत्री केले नव्हते.
2004 मध्ये महाराष्ट्राच्या निवडणुका त्यावेळचे मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने जिंकल्या, म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादीने जिंकल्या. पण सोनिया गांधींनी सुशीलकुमार शिंदे यांच्या ऐवजी विलासराव देशमुख यांना मुख्यमंत्री करून सुशीलकुमारांना आंध्र प्रदेशच्या राज्यपाल पदावर बसवून हैदराबादला रवाना केले होते.
मुख्यमंत्र्याच्या विरोधात बंड करणारा प्रमुख नेता किंवा ज्या मुख्यमंत्र्याचा नेतृत्वात निवडणूक जिंकली असेल त्या मुख्यमंत्र्याला देखील स्थिर न ठेवणे हा देखील काँग्रेसच्या राजकीय संस्कृतीचा वैशिष्ट्यपूर्ण भाग आहे.
नवज्योत सिंग सिद्धू यांना कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या विरोधातल्या बंडखोरीची बक्षिसी प्रदेशाध्यक्ष पदाच्या रूपाने दिली, पण त्यांना हवे असलेले मुख्यमंत्रीपद दिलेले नाही. माध्यमांनी चरणजीत सिंग चन्नी यांची नवज्योत सिंग सिद्धू यांच्याशी असलेली मैत्री यावर भरपूर लिहून प्रसिद्ध केले आहे. हा आता इतिहास झाला आहे. चरणजीत सिंग चन्नी हे आता मुख्यमंत्री बनले आहेत. मुख्यमंत्री बनल्यानंतर ते नवज्योत सिंग सिद्धू यांचे ऐकतीलच याची खात्री नाही किंबहुना त्यांनी सिद्धू यांचे ऐकू नये याची “व्यवस्था” पक्षश्रेष्ठी करतील. कारण हा देखील काँग्रेसच्या राजकीय संस्कृतीचा एक भाग आहे.
नवज्योत सिंग सिद्धू यांना मुख्यमंत्रीपद नाकारुन काँग्रेस श्रेष्ठींनी कॅप्टन अमरिंदरसिंग यांचे मन राखले आहे. आपण मुख्यमंत्री राहणार नसू तर आपल्याला पर्याय देणारे नेतृत्व नवज्योत सिंग सिद्धू यांच्या रुपाने तयार होता कामा नये हा कॅप्टन साहेबांचा आग्रह काँग्रेस श्रेष्ठींनी मान्य केलेला दिसतो. त्यामुळेच अमरिंदर सिंग यांनी नव्या मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले आहे. हा देखील काँग्रेसच्या राजकीय संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे.
अशी अनेक उदाहरणे देता येतील. परंतु, काँग्रेस श्रेष्ठी प्रादेशिक नेत्यांना कसे एकमेकांमध्ये झुंजवत ठेवतात याची वानगीदाखल उदाहरणे वर दिली आहेत. इंदिरा गांधींपासून सुरू झालेला राजकीय खेळीचा हा इतिहास आता काँग्रेस संस्कृतीचा अविभाज्य भाग झाला आहे. हेच पंजाब मधल्या नेतृत्व बदलाच्या उदाहरणातून स्पष्ट होत आहे.