वृत्तसंस्था
नवी दिल्ली – माजी केंद्रीय मंत्री कै. रामविलास पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षावर ताबा कुणाचा हा वाद निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला आहे. पक्षाध्यक्षपदावर रामविलास पासवान यांचे चिरंजीव चिराग पासवान आणि रामविलासांचे बंधू पशुपती कुमार पारस या दोघांनीही दावे ठोकले आहेत. A 5-member delegation of Lok Janshakti Party met Election Commission today.
लोक जनशक्ती पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सर्व सदस्यांनी आणि ५ खासदारांनी एकत्र येऊन चिराग पासवान यांना पक्षाध्यक्षपदावरून तसेच संसदीय पक्ष नेतेपदावरून हटविले आहे. तर चिराग पासवान यांच्या गटाने ५ खासदारांना आणि पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या खासदारांना निलंबित केले आहे.
लोक जनशक्ती पक्षावर आपलाच ताबा असल्याचा आणि आपलाच पक्ष खरा असल्याचा दावा काका पशुपती पारस आणि पुतण्या चिराग पासवान या दोघांनीही केला आहे.
चिराग पासवान यांनी दिल्लीत निवडणूक आयोगाच्या ऑफिसमध्ये जाऊन लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्षपद पक्षाच्या घटनेनुसार ५ वर्षांसाठी आपल्याकडे असल्याचा दावा केला आहे. तर चिराग पासवान यांना पक्षाध्यक्षपदावरून अधिकृतपणे पक्षाच्या कार्यकारिणीनीने हटविल्याचा दावा पशुपती कुमार पारस यांनी केला आहे.
दोन्ही नेते आणि दोन्ही गट निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या प्रतिक्षेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करणार असल्याची अपेक्षा आहे. त्यामध्ये वर्णी लागण्याच्या अपेक्षेने काका – पुतणे राजकीय भांडणे करीत आहेत. पण त्यातून रामविलास पासवान यांच्या पक्षात फूट पडल्याचे स्पष्ट होत आहे.