वृत्तसंस्था
मुंबई : मार्चच्या 24 तारखेला जाहीर झालेला लॉकडाऊन येत्या 17 मेपर्यंत वाढवण्यात आले आहे. चीनी विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन उपयुक्त ठरत असल्याचे खंडप्राय भारतात दिसून आले आहे. त्याचवेळी केंद्रातल्या सरकारने सर्व राज्यांना चीनी विषाणू बाधित लोकंचा शोध घेण्यासाठी जास्तीत जास्त चाचण्या घेण्यासाठीही प्रोत्साहित केले आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) दिलेल्या माहितीनुसार देशात आतापर्यंत 9 लाख 76 हजार 363 नमुन्यांच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत.
चीनी विषाणूचा संसर्ग शोधणाऱ्या देशातील सर्वाधिक चाचण्या महाराष्ट्रात 1 लाख 53 हजार इतक्या झाल्या आहेत. परंतु लोकसन्ख्येच्या प्रमाणात विचार करता सर्वाधिक चाचण्या तामिळनाडुत झाल्या आहेत. 485 इतके सर्वाधिक कोरोनाबळी मात्र महाराष्ट्रातले आहेत. ही आकडेवारी 1 मेपर्यंतची आहे.
देशभरातील चाचण्यांचा आढावा पुढीलप्रमाणे –
- आंध्र प्रदेशात 1 लाख 2 हजार 460 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. यातल्या 1 लाख 997 चाचण्या निगेटीव्ह आल्या. एकूण 1 लाख 463 रुग्ण कोरोनाबाधित आढळले. तर कोरोनाबळी 33 झाले.
- केरळमध्ये आतापर्यंत 27 हजार 150 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. यापैकी 26 हजार 225 निगेटिव्ह आल्या. केरळात सध्या 497 कोरोना पॉझिटिव्ह असून 4 कोरोनाबाधित आढळले आहेत. कोरोनातून बऱ्या झालेल्यांची संख्या 392 आहे.
- तामिळनाडूमध्ये आतापर्यंत 1 लाख 29 हजार 363 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. यापैकी कोरोनाबाधित 2 हजार 526 आढळले. या आजारातून 1 हजार 312 लोक बरे झाले आणि 28 लोक मरण पावले आहेत.
- तेलंगणा राज्याने 30 एप्रिलनंतर चाचणी केलेल्या नमुन्यांची संख्या दिलेली नाही. तोवर या राज्यात 1 हजार 44 कोरोनाबाधित आढळले तर 28 मृत्यूची नोंद झाली आहे.
- कर्नाटकात 64 हजार 898 नमुन्यांची चाचणी झाली. यातले 589 लोक कोरोनाबाधित आढलले. कोरोना निगेटिव्ह लोकांची संख्या 61 हजार 855 दिसली. तर 251 लोक कोरोनातून मुक्त झाले. कर्नाटकातील कोरोना बळींची संख्या 21 आहे.
- महाराष्ट्रात 1 मेपर्यंत 1 लाख 53 हजार 125 नमुन्यांची चाचणी घेतली गेली. त्यापैकी 1 लाख 40 हजार 587 चाचण्या निगेटीव्ह आल्या. राज्यातल्या कोरोनाबाधितांची संख्या 11 हजार 506 आढळून आली. महाराष्ट्रात आजवर देशातील सर्वाधिक म्हणजे 485 लोकांचा मृत्यू कोरोनाने झाला आहे तर बरे झालेल्यांची संख्या 1 हजार 879 आहे.
सार्वजनिक आरोग्य तज्ञांनी चीनी विषाणूच्या समुदायाची तपासणी करण्यासाठी व्यापक चाचण्या करण्याचे आवाहन केले आहे. आयसीएमआरने इन्फ्लूएन्झा सारख्या आजाराने ग्रस्त तसेच ताप, खोकला, घसा खवखवणे, वाहणारे नाक आदी लक्षणे आढळणाऱ्यांची चाचणी घेण्याची सूचना केली आहे. तसेच हॉटस्पॉट्स / क्लस्टर्समध्ये तपासणीचा वेग वाढवण्याची सूचना केली आहे.