• Download App
    उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे 'मनमोहन सिंग'..? | The Focus India

    उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे ‘मनमोहन सिंग’..?

    …दुर्दैवाने मनमोहन सिंग, उद्धव ठाकरे या दोन्ही नेत्यांच्या नशिबी अत्यंत धूर्त नेतृत्वाच्या हाताखाली काम करण्याची वेळ आली आहे. डॉ. सिंग यांच्या नशिबी सोनिया गांधी आल्या, तर उद्धव ठाकरे यांच्या नशिबी शरद पवार आलेत! अर्थात फरक हा आहे, की डॉ. सिंग यांना अतिमवाळपणामुळे सोनिया गांधी, राहुल गांधींचे नेतृत्व सहन करावे लागले आणि उद्धव ठाकरे यांना स्वत:च्या अतिमहत्त्वाकांक्षेपायी पवारांचे एेकावे लागत आहे…


    विनय झोडगे

    सगळंच जर महाराष्ट्रात शरद पवारांच्या हस्तक्षेपानंतर घडतयं तर मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमके करतायत तरी काय? हा प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेला पडलाय! पण या प्रश्नामधील between the lines वाचायचे असेल तर जुना घटनाक्रम आणि उदाहरणे आठवावी लागतील. यातून एक वेगळी संगती लागेल आणि कदाचित वरील प्रश्नाचे वेगळेच उत्तर सापडू शकेल…..

    ते उत्तर म्हणजे शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्रापुरते “मनमोहन सिंग” करून ठेवलेय…!! येथे डॉ. मनमोहन सिंग आणि उद्धव ठाकरे या दोन्ही नेत्यांचा अजिबात अधिक्षेप करण्याचा किंवा तुलना करून गैर निष्कर्ष काढण्याचा हेतू नाही. दोन्ही नेत्यांसाठी victim card खेळण्याचाही प्रश्न नाही. पण राजकीय वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करण्यात मतलब नाही. हे दोन्ही नेते आपापल्या कर्तृत्वानुसार मोठेच आहेत. डॉ. मनमोहन सिंग यांच्या नावावर तर १९९१ च्या आर्थिक सुधारणा धोरणाचे क्रेडिट आहे. उद्धव ठाकरे यांच्या नावावरही बाळासाहेबांनंतर शिवसेनेला एकमुखी नेतृत्व देण्याचे क्रेडिट आहे. पण….. हा “पण” च काही वेगळी कहाणी सांगतोय…!!

    दुर्दैवाने दोन्ही नेत्यांच्या नशिबी अत्यंत धूर्त नेतृत्वाच्या हाताखाली काम करण्याची वेळ आली आहे. डॉ. मनमोहन सिंग यांच्या नशिबी सोनिया गांधी आल्या, तर उद्धव ठाकरे यांच्या नशिबी शरद पवार आलेत…!! अर्थात फरक हा आहे, की डॉ. मनमोहन सिंग यांना अतिमवाळपणामुळे सोनिया गांधी, राहुल गांधींचे नेतृत्व सहन करावे लागले आणि उद्धव ठाकरे यांना स्वत:च्या अतिमहत्त्वाकांक्षेपायी पवारांचे एेकावे लागत आहे. डॉ. मनमोहन सिंग यांच्या डोक्यावर राष्ट्रीय सल्लागार मंडळ (National Advisory Board) च्या रूपाने सर्वंकष सत्ताकेंद्र बसले होते. निर्णय ते मंडळ करत होते आणि जबाबदारी डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर ढकलत होते. कोळशापासून टेलिकॉमपर्यंत सर्व निर्णय राष्ट्रीय सल्लागार मंडळ करायचे आणि त्यातला घोटाळा बाहेर आला की पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे सरकार बदनाम व्हायचे.

    महाराष्ट्रात या नजीकच्या इतिहासातली छोटी पुनरावृत्ती घडत आहे. निर्णयात हस्तक्षेप पवार करताहेत. “८० व्या वर्षी योद्धा मैदानात”, “पवारांच्या हस्तक्षेपानंतर निर्बंध शिथिल” या बातम्या पवार पेरताहेत आणि कोरोना काळात मुख्यमंत्री फिरत नाहीत, म्हणून चलाखीने जबाबदारी उद्धव ठाकरेंवर ढकलताहेत. कोरोना काळात इतर सरकारी कामे ठप्प असताना साखर कारखान्यांच्या कर्जाच्या अटी-शर्ती शिथिल करण्याचे काम पवार मंडळी करताहेत आणि घोटाळा बाहेर आला की उत्तरे द्यायला उद्धव ठाकरे यांना पुढे करणार आहेत.

    महाराष्ट्रात पवारांनी बहुमतावर दरोडा घातला. आता सरकारच्या कामाचे छोट्यातले छोटे क्रेडिटही पवार घेताना दिसतात पण मोठ्यातली मोठी जबाबदारी मात्र ते उद्धव ठाकरे यांच्यावर टाकताना दिसतात. त्याचवेळी प्रशासनाच्या leavers मात्र पवार आपल्या हातात ठेवताना दिसतात.

    त्यावेळी डॉ. मनमोहन सिंग यांना सोनिया गांधींचे तसे अनुभव आले होते. आता उद्धव ठाकरे यांना शरद पवारांचे असे अनुभव येताहेत. दोन्हींमध्ये काळाचा जुना – नवा आणि तपशीलाचा फरक असला तरी गुणात्मक फरक काहीच नाही. कारण सोनिया आणि पवार यांच्या धूर्त पाताळयंत्री राजकारणात फरक अजिबात नाही…!!

    Related posts

    नड्डांवर बॅनर्जींची मानभावी “ममता”; कोरोनातून बरे होण्यासाठी दिल्या शुभेच्छा

    पवारांना संभाजीराजेंच्या वाढदिवसाच्या “सारथी” शुभेच्छा

    मोदी सरकारविरोधातील संघर्षात ममतांचा संघराज्य व्यवस्थेलाच धक्का