• Download App
    उद्धवाचे जावे मुख्यमंत्रीपद ही आघाडीतल्याच काहींची इच्छा ; भाजप प्रदेशाध्यक्षांचा दावा | The Focus India

    उद्धवाचे जावे मुख्यमंत्रीपद ही आघाडीतल्याच काहींची इच्छा ; भाजप प्रदेशाध्यक्षांचा दावा

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : मुख्यमंत्री उदध्व ठाकरे यांना आमदारकी न मिळता त्यांना राजीनामा द्यायला लागावा ही भावना भारतीय जनता पार्टीची नसून आघाही सरकारमधील्याच काही असंतुष्टांची आहे, असा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला.

    मुख्यमंत्री ठाकरे यांची आमदारकी गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनली आहे. राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून विधान परिषदेत जाण्याचा उद्धव ठाकरे यांचा मानस आहे. यात राजकीय अडथळे आणले जात असल्याची चर्चा आहे. या निमीत्ताने पाटील बोलत होते.

    उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरुन घालवून ज्यांना स्वतःला मुख्यमंत्री व्हायची इच्छा आहे, त्यांच्यासाठीच हा खटाटोप केला जात आहे. यात संबंध नसताना भाजपावर जाणीवपूर्वक टीका केली जात असल्याचे पाटील म्हणाले.

    राज्यपालांनी काय निर्णय घ्यावा हा त्यांचा प्रश्‍न आहे. राज्यपाल राज्यघटनेशी बांधील राहुन निर्णय घेत असतात. त्यांच्यावर कोणाची दादागिरी चालणार नाही. मात्र, राज्यपालांनी कसे वागावे, हे सांगणारी नवी लोकशाही राज्यात सुरू झाली आहे. कायद्याच्या चौकटीत बसेल असा निर्णय राज्यपाल घेत असतात. यावर अधिक बोलण्याची इच्छा नाही. मात्र, या विषयावरून भाजपावर टीका करणाऱ्या आघाडी सरकारमधील काही असंतुष्टांचीच तीव्र इच्छा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकार पडावे, अशी असल्याचे पाटील यांनी सांगितले.

    “आम्हाला सत्तेशिवाय राहण्याची सवय आहे. आमचा प्रश्‍नच नाही. मात्र, सरकार पडावे, अशी इच्छा असणारे आघाडीतील काहीजण अशा प्रकारचा प्रचार करीत आहेत. ठाकरे सरकार पाडून ज्यांना मुख्यमंत्रीपदी बसवायचे आहे. त्यासाठीची ही सारी तयारी आहे,” असे म्हणाले.

    भाजपा नेत्यांना ट्रोल करणाऱ्यांमध्ये सामान्य जनता नसल्याचेही पाटील म्हणाले. आघाडी सरकारमधील काही घटकांनी भाडोत्री ट्रोलर नेमले आहेत. शंभर-शंभर लोकांची पगारी टीम त्यासाठी नेमण्यात आली आहे. कोण कुठून काय करतेय, याची कल्पना आहे. मात्र, त्यांना जाब विचारण्याची ही वेळ नाही. मी ‘पाटील’ आहे.

    असल्या भाडोत्री ट्रोलला ‘पाटील’ अजिबात घाबरत नसतात, असा टोलाही पाटील यांनी लगावला. मी ट्विट केल्याने सतरा जिल्ह्यात पालकमंत्री काम करू लागले. त्या आधी चौदा जिल्ह्यात पालकमंत्री होते पण ते तिथे जात नव्हते. तीन जिल्ह्यात पालकमंत्री बदलले. आता सर्वजण त्यांच्या जिल्ह्यात काम करतात. मी केलेल्या ट्विटमुळे सरकार जागे झाल्याने हे घडले. त्यामुळे, कोणी कितीही ट्रोल केले तरी त्याला घाबरण्याचे कारण नाही, असे पाटील म्हणाले.

    राज्यपालांना पुन्हा विनंतीचा पुनरुच्चार

    दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली दि. 9 एप्रिल 2020 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत विधान परिषदेच्या एका रिक्त जागेवर विद्यमान मुख्यमंत्री श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची नियुक्ती करण्याची शिफारस करण्याचा निर्णय घेतला होता व तशी शिफारस माननीय राज्यपाल महोदयांकडे करण्यात आली होती.

    सध्या कोरोनाच्या संकटकाळात शासन-प्रशासन जोमाने संकटाचा मुकाबला करत आहे. कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत राज्यातील अस्थिरता दूर होणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाने आज महाराष्ट्र विधान परिषदेच्या एका रिक्त जागेवर विद्यमान मुख्यमंत्री श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची नियुक्ती करण्याच्या शिफारशींवर माननीय राज्यपाल महोदयांनी तातडीने कार्यवाही करावी या विनंतीचा पुनरुच्चार केला.

    Related posts

    नड्डांवर बॅनर्जींची मानभावी “ममता”; कोरोनातून बरे होण्यासाठी दिल्या शुभेच्छा

    पवारांना संभाजीराजेंच्या वाढदिवसाच्या “सारथी” शुभेच्छा

    मोदी सरकारविरोधातील संघर्षात ममतांचा संघराज्य व्यवस्थेलाच धक्का