विशेष प्रतिनिधी
मुंबई : खासदार राहुल गांधींची भारत जोडो यात्रा निम्मी सरली. महाराष्ट्रातूनही गेली, पण काँग्रेसच्या नेत्यांना यात्रेदरम्यान आलेल्या अनुभवातून त्यांची टीआरपीची मिळत नसल्याची भीती अजूनही संपली नाही असेच चित्र दिसत आहे. कारण भारत जोडो यात्रेचे महत्त्वाचे मुद्दे बाजूला सारून वीर सावरकरांच्या अपमानाचा मुद्दा पुन्हा पुन्हा यात्रेला “हॉन्ट” करत आहे!! राहुल गांधींच्या वक्तव्याचा मुद्दा काँग्रेसजनांचा पिच्छा सोडायला तयार नाही. Veer Savarkar insult issue : Congress leaders still fear of declining TRP of bharat Jodo yatra
सुरुवातीलाच टीआरपीत खोट
काँग्रेसची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आली तरी तिला टीआरपी मिळत नसल्याचे पाहून अखेरीस राहुल गांधींनी सावरकरांच्या माफीनाम्याचा मुद्दा उकरून काढला. त्यानंतर यात्रेचा टीआरपी एकदम वधारला. राहुल गांधी महाराष्ट्रात आल्याची दखल मीडियाने घेतली. कारण त्यापूर्वी संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाड यांच्या खेरीज महाराष्ट्राच्या मीडियात दुसरे विषयाच येत नव्हते. राऊत आणि आव्हाड यांच्या विषयांमुळे राहुलजींची भारत यंत्र भारत जोडो यात्रा झाकोळली गेली होती. या झाकोळातून राहुलजींनी यात्रा बाहेर काढली. त्यासाठी त्यांनी सावरकरांचा मुद्दा उकरून काढला. पण आता तोच मुद्दा त्यांच्या मानगुटीवर बसला आहे.
यात्रेच्या बातम्या फारशा नाहीत
महाराष्ट्रातला राहुलजींच्या यात्रेचा महाराष्ट्रातला आज अखेरचा दिवस आहे. या यात्रेमध्ये त्यांच्याबरोबर चित्रपट निर्माते अमोल पालेकर आणि लेखिका संध्या गोखले सामील झाले. पण त्याच्या बातम्या फारशा प्रसार माध्यमांमध्ये आल्याच नाहीत. मेधा पाटकर यांची बातमी सुद्धा आली, ती भाजपने शरसंधान साधल्यानंतर… त्यामुळे भारत जोडो यात्रेचा फोकस राहुल गांधींनी कितीही बदलायचा प्रयत्न केला, तरी तो सावरकरांच्याच मुद्द्याभोवती फिरत राहिला, ही वस्तुस्थिती बदलत नाही.
आव्हाडांच्या मुद्द्यामुळे टीआरपी घसरला
आज यात्रेचा आढावा घेण्यासाठी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते जयराम रमेश प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि भारत जोडो यात्रेचे महाराष्ट्रातले संयोजक बाळासाहेब थोरात यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन भरपूर मुद्द्यांवर उहापोह केला. यात्रा यशस्वी झाल्याचे सांगितले. जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला म्हणून आभार मानले. पण मीडियाचे आभार मानताना नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांना जितेंद्र आव्हाडांचा मुद्दा टोचून गेला. आव्हाडांनी केलेला महिलेचा विनयभंग आणि त्यानंतर घडलेले राजीनामा नाट्य या मुद्द्यावर महाराष्ट्रातल्या मीडियाने भर दिल्यामुळे राहुलजींची भारत जोडो यात्रा झाकोळली गेली, याची कबुली दोन्ही नेत्यांनी दिली. किंबहुना त्यांना ती द्यावी लागली.
राहुलजींचे समर्थन, नानांचे उत्तर
नाना पटोलेंना देखील पत्रकारांनी सावरकरांच्याच मुद्द्यावर प्रश्न विचारला त्यावेळी त्यांनी राहुलजींनी भाषणात उल्लेख केलेला बिरसा मुंडा आणि सावरकर तुलनेचा मुद्दा सांगितला. बिरसा मुंडा शहीद झाले, पण त्यांनी माफी मागितली नाही. पण सावरकरांनी माफी मागितली. ब्रिटिशांनी त्यांना 60 रुपये पेन्शन दिली. एवढेच राहुल गांधींनी सांगितले. राहुल गांधींनी त्याविषयीची कागदपत्रे दाखविली. आता समोरच्यांकडे जर वेगळी कागदपत्रे असतील, तर ती त्यांनी दाखवावीत, असे सांगून नाना पटोले यांनी सावरकर मुद्दा थांबविण्याचा प्रयत्न केला.
बाकी सर्व मुद्द्यांवर त्यांनी पत्रकार परिषदेत जरूर चर्चा केली. राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांची नितीन गडकरींची केलेली तुलना भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी उपस्थित केलेला छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला पत्र लिहिल्याचा मुद्दा या सर्व मुद्द्यांवर नाना पटोले यांनी जोरदार शरसंधान साधले.
घुमून फिरून सावरकर
पण पत्रकार परिषद घुमून फिरून सावरकरांच्याच मुद्द्यावर आली आणि अखेरीस जयराम रमेश यांना हस्तक्षेप करून सावरकरांच्या मुद्द्यावर प्रश्न विचारणे बंद करा, असे सांगावे लागले. पण हे करताना त्यांनी देखील सावरकरांचाच मुद्दा पुन्हा उकरून काढला. यात त्यांची राजकीय चतुराईच दिसली. सावरकरांचा मुद्दा उपस्थित केला नाही तर बाकीच्या पत्रकार परिषदेला प्रसिद्धीच मिळणार नाही हे जेव्हा त्यांना जाणवले, तेव्हा जयराम रमेश यांनी हस्तक्षेप केला आणि सावरकर मुद्द्याला पुन्हा हवा देताना खरे – खोटे बोलणे याचा शाब्दिक खेळ केला. “जिस दिन भाजप के नेता हमारे नेताओं के बारेमे झूठ बोलना बंद कर देंगे, उसी दिन से हम लोग उनके नेताओं के बारेमे सच बोलना बंद कर देंगे,” असे वक्तव्य जयराम रमेश यांनी केले. वर पाहता हा वाद मिटवण्याचा प्रकार वाटला असला तरी यातले “बिटवीन द लाईन्स” मात्र सावरकरांच्या माफीनाम्याचा मुद्दा काँग्रेसला जिवंत ठेवायचा आहे किंबहुना तो यापुढे देखील तापवायचा आहे हेच यातून दिसून आले. कारण आम्ही म्हणजे काँग्रेस बोलते ते “सत्य” आणि समोरचा म्हणजे भाजप बोलतोय ते “असत्य” असा शिक्का मारून जयराम रमेश यांनी सावरकरांचा मुद्दा जिवंत ठेवला आहे आणि इथेच वर शीर्षकात उल्लेख केल्याप्रमाणे राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेसाठी महत्त्वाचा ठरतो आहे.
टीआरपीची भीती संपली नाही
राहुल गांधींनी बाकी कोणत्याही मुद्द्यावर भाष्य केले, त्यांच्याबरोबर असलेल्या नेत्यांनी पत्रकार परिषदांमध्ये कितीही आणि कोणतीही माहिती सांगितली, तरी अपेक्षित टीआरपी मिळत नसल्याचा काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचा अनुभव आहे. किंबहुना टीआरपी मिळत नसल्याची भीती काँग्रेसजनांच्या मनात आहे. या भीतीतूनच यातूनच सावरकरांचा मुद्दा पुन्हा राजकीय दृष्ट्या जिवंत ठेवण्याचा जयराम रमेश यांचा प्रयत्न दिसतो आहे. यात्रा महाराष्ट्रातून मध्य प्रदेशात गेली आहे. तिथे आता कोणता मुद्दा उपस्थित केला जातो आणि तापवला जातो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Veer Savarkar insult issue : Congress leaders still fear of declining TRP of bharat Jodo yatra
महत्वाच्या बातम्या
- राहुलजींच्या भारत जोडो यात्रेत महाराष्ट्रातल्या अखेरच्या दिवशीही सावरकरांच्या मुद्द्यावर जयराम रमेश यांनी पुन्हा डिवचले
- महाराष्ट्र विधानसभा सुवर्ण महोत्सव उद्घाटन समारंभात पंतप्रधान राजीव गांधींसमोर लतादीदींचे सावरकरांच्या ज
- राहुल गांधींनी सावरकरांविषयी काय बोलावे हे उद्धव ठाकरेंनी सांगू नये; माणिकराव ठाकरेंनी भरला उलटा दम!!