कॉंग्रेसचे तरुण खासदार राजीव सातव कोरोनाग्रस्त झाल्याने त्यांच्यावर पुण्यात उपचार सुरु होते. गेल्याच आठवड्यात त्यांची प्रकृती गंभीर बनली. कॉंग्रेसमध्ये चिंतेचे वातावरण तयार झाले. त्याचवेळी राहुल गांधी यांनी फोन केला आणि..Satav’s health improves after Rahul Gandhi’s phone call
प्रतिनिधी
पुणे : काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर त्यांची तब्येत खालावली होती. मात्र, आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. पुण्यातील जहांगीर रूग्णालयात सातव यांच्यावर उपचार होत असून आता त्यांचा कोरोना अहवाल आता निगेटिव्ह आला आहे. सध्या त्यांच्यावर सामान्य वॉर्डमध्ये देखरेखीखाली उपचार करण्यात येत आहेत. लवकरच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती रुग्णालयातील सूत्रांनी दिली.
गेल्याच आठवड्यात सातव यांची प्रकृती बिघडून ते गंभीर झाले होते. समस्त कॉंग्रेसजन चिंतेत होते. त्यावेळी राहुल गांधी यांनी रुग्णालय प्रशासनाशी फोनवरुन चर्चा केली. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करत सर्वोत्तम उपचार देण्याची सूचना केली. त्यानंतर रुग्णालयाने विशेष लक्ष देत सातव यांच्यासाठी प्रयत्न केले. परिणामी आता सातव यांची प्रकृती सुधारली आहे.
काँग्रेस खासदार राजीव सातव यांना १९ एप्रिलला कोरोना सदृश्य लक्षणे दिसून आल्यानंतर त्यांनी कोरोना चाचणी केली होती. २२ तारखेला त्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. ऑक्सिजन पातळी खालावल्याने त्यांना २५ तारखेला पुण्यातल्या जहांगीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता त्यांचा कोरोना अहवाल निगेटीव्ह आला आहे, त्यामुळे त्यांना लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे. त्यांना व्हेंटीलेटरशिवाय श्वास घेता येत असल्याचे रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.
खासदार सातव यांच्या उपचारांवर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, प्रियांका गांधी, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यातील काँग्रेस पक्षाचे नेतेही नजर ठेऊन होते. त्यांच्याकडून सतत फोनच्या माध्यमातून सातव यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यात येत होती. सातव यांच्या प्रकृतीची माहिती देण्यासाठी कॉंग्रेस नेते आणि मंत्री विश्वजित कदम यांनी पत्रकार परिषदही घेतली होती.