विशेष प्रतिनिधी
नांदेड : सद्गुरु ओशो यांचा पुणे येथील आश्रम नष्ट करण्याचे कारस्थान सुरू आहे. ओशोंचा वारसा, समाधी वाचविण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी सक्रिय होण्याची गरज आहे, असे ओशो आश्रमाचे प्रमुख स्वामी गोपाल भारती यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.ओशोंचा वारसा वाचविण्यासाठी भारतभर जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. त्या मोहिमेचाच एक भाग म्हणून नांदेड येथे ते बोलत होते.Osho Ashram in Pune Conspiracy to destroy : Swami Gopal Bharati
स्वामी गोपाल भारती म्हणाले की, महाराष्ट्रातील सर्व खासदार आणि आमदार यांनी लोकसभा, राज्यसभा, विधानसभा व विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित करावा. त्या द्वारे ओशोप्रेमींना यांचे पुणे येथील ओशो आश्रम पुन्हा परत प्राप्त होण्यासाठी संघर्ष करावा. ११ डिसेंबरपर्यंत संपूर्ण देशात ११००० होर्डीग उभारले जातील.
ओशोंचा वारसा हा भारतासह संपूर्ण जगाचा वारसा आहे. ओशोंनी भारताच्या हजारो वर्षे जुन्या असलेल्या अध्यात्मिक परंपरेला पुनर्जीवन देण्याचे काम केले. ओशोंची समाधी ओशो सन्यासी व ओशो प्रेमींसाठी काशी किंवा मक्का मदीना एवढीच प्रिय आहे. ओशो समाधीपर्यंत जाण्यास बंदी करुन आम्हाला धार्मिक अधिकारांपासून वंचित केले आहे. ओशोंचा फोटो काढून, त्यांचे वक्तव्य काटून छाटून मनमानी पद्धतीने जनतेसमोर सादर केले जात आहे.
ओशोना एक रहस्यदर्शी सद्गुरु न मानता त्यांना केवळ एका लेखकाच्या स्वरूपात सादर केले जात आहे. हे भावी पिढीने त्यांना विसरून जावे, यासाठी कारस्थान रचले आहे. ओशोंची जगात ६० ते ७० भाषांमध्ये अनुवादित झालेली ग्रंथसंपदांची रॉयल्टी कुठे जात आहे? याची चौकशी व्हावयास हवी. आमची मागणी केवळ ओशोंचा आश्रम विकण्यापासून वाचविण्याची नसून या सर्व प्रकाराची सीबीआय व इडीमार्फत सखोल चौकशी करावी, अशी आहे.
ओशो आश्रम वाचविण्यासाठी नांदेड शहरात एक होर्डिंग निळा रोड व दुसरे होर्डिंग गोवर्धन घाट रोड येथे लावलाआहे, अशी माहिती त्यांनी दिली. या वेळी ओशो ध्यान शिबिर संचालक सुरेश धुत ,आनंद सुरेश, ओशो ब्लेसिंग मेडिटेशन कम्यूनचे मुख्य प्रवर्तक आदी उपस्थित होते.
- पुण्यातील ओशो आश्रम नष्ट करण्याचे कारस्थान
- आश्रम वाचविण्यासाठी जगभरात जनजागृती
- देशभरात 11 हजार होर्डिंगच्या माध्यमातून जागृती
- सर्व लोकप्रतिनिधींनी आवाज उठविण्याची गरज
- ओशोंच्या ग्रंथसंपदेची रॉयल्टी कुठे जाते ?
- गैरप्रकाराची सीबीआय व इडीमार्फत चौकशी करावी
- ओशो आश्रम वाचविण्यासाठी नांदेडमध्ये होर्डिंग