विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्रातल्या मोदी सरकारला सातत्याने घेरत राहायचे. सरकारवरची टीकेची धार अजिबात कमी करायची नाही. उलट ती वाढवत न्यायची. परंतु त्यामध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधकांच्या एकजुटीमध्ये आपण सामील व्हायचे नाही, असे राजकीय धोरण तृणमूल काँग्रेसने आखल्याचे दिसते आहे.Mamata’s Trinamool MPs are different from the opposition when they surround the Modi government
आज जंतर मंतर वर राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांच्या खासदारांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला. तेथे काही काळ धरणे धरले. परंतु त्यामध्ये तृणमूल काँग्रेसचे खासदार सहभागी झाले नाहीत. पण त्यांनी मोदी सरकार वरची टीकेची धार कमी केली नाही. मोदी सरकारवर त्यांनी स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन टीका केली.
मोदी सरकारने 25 मिनिटांत 21 बिले संसदेत मंजूर करून घेतली आहेत. देशाचा घटनात्मक पाया उखडण्याचे काम मोदी सरकार करत आहे, अशी टीका खासदार काकूली घोष दस्तगीर यांनी केली आहे. संसदेची कामकाज सल्लागार समिती एखाद्या जनरल स्टोअर सारखी झाली आहे. तिथे गंभीर चर्चा होत नाही. लोक हवे तेव्हा येतात, हवे ते बोलतात आणि निघून जातात, असा दावा खासदार दस्तगीर यांनी केला.
मात्र हे करताना तृणमूलच्या खासदारांनी कुठेही विरोधकांबरोबर आपण का गेलो नाही, याचा खुलासा केला नाही. तृणमूळ काँग्रेसचे लोकसभेत 22 खासदार आहेत. हे 22 खासदार एक प्रकारे वेगळी चूल मांडून बसल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर मायावतींच्या बहुजन समाज पक्षाचे 10 खासदार देखील आज जंतरमंतरच्या धरणे आंदोलनात सामील झाले नाहीत. परंतु त्यांनी आज पत्रकार परिषद घेतलेली नाही.