वृत्तसंस्था
हावडा : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या प्रांतवादाने टोक गाठलेय. हावडाच्या सभेत त्या म्हणाल्या, की मोदी – शहांचे गुजराती सिंडिकेट यूपी – बिहारमधल्या गुंडांना आणून बंगालवर कब्जा करू पाहतेय…Gujaratis are trying to capture Bengal by bringing goons from UP and Bihar. We will not allow Bengal to become like Gujarat, says mamata banerjee
बंगालच्या निवडणूकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रचाराच्या मुद्द्यावरून ममतांनी त्यांना टार्गेट केले.
ममता बॅनर्जी म्हणाल्या, की मोदी हे सिंडिकेट नंबर १ आहेत आणि अमित शहा सिंडिकेट नंबर दोन. त्या दोघांनी मिळून अभिषेक बॅनर्जी, सुदीप बॅनर्जी यांच्या घरी केंद्रीय तपास यंत्रणांचे लोक पाठविले. त्यांना त्रास दिला.
मोदी – शहांच्या सिंडिकेटनेच तामिळनाडूत एम. के. स्टॅलिन यांच्या मुलीच्या आणि जावयाच्या घरी देखील केंद्रीय तपास य़ंत्रणांना पाठवून त्यांना त्रास दिलाय.
हे दोन गुजराती मिळून यूपी – बिहारच्या गुंडांना बंगालमध्ये आणून बंगालवर कब्जा करू पाहात आहेत. पण आम्ही बंगालचा गुजरात होऊ देणार नाही. बंगालमधले जातीय सामंजस्य त्यांना बिघडवू देणार नाही.
बंगालमध्ये येऊन जातीत आणि धार्मिक तेढ निर्माण करण्याचा त्यांचा डाव आहे. तो आम्ही हाणून पाडू, असेही ममता बॅनर्जी म्हणाल्या.
या सगळ्या प्रचाराच्या भाषणात ममतांचा प्रांतवाद टोकाला गेलेला पाहायला मिळाला. बंगालबाहेरच्या नेत्यांचा बंगालशी काहीही संबंध नाही. त्यांनी येथे प्रचाराला यायचे कारणच नाही, असा सूर त्यांच्या भाषणात होता.