विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : विधानसभेच्या निवडणुका झाल्यात किंवा होत आहेत, उत्तर प्रदेश उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर मध्ये. पण निवडणुकीनंतरच्या धोरणाविषयी काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी आज चर्चा केली आहे, ती राजस्थान आणि छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांशी…!!Elections in Uttar Pradesh, Uttarakhand, Punjab
राहुल आणि प्रियांका गांधी यांनी आज राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना चर्चेसाठी पाचारण केले होते. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, पंजाब आणि मणिपूर या राज्यांमधील विधानसभांच्या निवडणुकांनंतर काँग्रेसचे धोरण नेमके काय असावे?, यावर चर्चा झाल्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी नंतर पत्रकारांना सांगितले. या चर्चेच्या वेळी मुख्यमंत्री भूपेश बघेल हे उपस्थित होते. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याकडे उत्तर प्रदेश काँग्रेसचा कार्यभार देखील आहे. प्रियांका गांधी यांनी स्वतः उत्तर प्रदेशाची जबाबदारी देखील घेतली आहे. त्यामुळे या दोघांनी निवडणुकीनंतरच्या धोरणाच्या चर्चेत सहभागी होणे स्वाभाविक आहे. पण या चर्चेमध्ये खुद्द उत्तर प्रदेश राज्यातील तसेच उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या राज्यांमधील कोणते नेते हजर होते याविषयी कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.
त्याचबरोबर आजच्या चर्चेत काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीवर चर्चा झाल्याचे अशोक गेहलोत म्हणाले.
परंतु दिल्लीतल्या राजकीय वर्तुळात मात्र आजच्या चर्चेची “वेगळी चर्चा” रंगली आहे. निवडणुका जरी उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमध्ये असल्या तरी भविष्यकाळासाठी राजस्थान आणि छत्तीसगड या दोन राज्यांचे मुख्यमंत्री बदलून अशोक गेहलोत आणि भूपेश बघेल यांच्याकडे पक्षाच्या पातळीवरची केंद्रीय जबाबदारी देण्याचे काँग्रेसच्या अंतर्गत वर्तुळात बोलले जात आहे. त्याची आत्तापासून चाचपणी तर केली नाही ना?, अशोक गेहलोत, भूपेश बघेल या दोन मुख्यमंत्र्यांना एकत्र करून त्यांना नव्या जबाबदारीची आणि राजस्थान, छत्तीसगडमधील नेतृत्व बदलाची कल्पना तर दिली नाही ना?, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
काँग्रेस पक्षासंदर्भात आमची काही कर्तव्य आहेत ती आम्ही पार पाडणार आहोत, असे वक्तव्य जाता जाता अशोक गहलोत यांनी केले आहे. त्यातून वर उल्लेख केलेला अर्थ काढण्यात येत आहे.
आजच्या चर्चेत काही वेळ पक्षाचे दुसरे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल हे देखील सहभागी झाले होते. त्यामुळे राजस्थान आणि छत्तीसगड यांच्यात या राज्यांमधील नेतृत्व बदलाच्या चर्चेला वेग आल्याचे मानण्यात येत आहे.