विशेष प्रतिनिधी
इंदापूर : मंत्र्यांच्या विसरभोळेपणाचे किस्से महाराष्ट्रातच काय पण जगभर चर्चिले जातात. पण या विसरभोळेपणातून जेव्हा एखादा मंत्री मनातलेच बोलून जातो तेव्हा काय म्हणायचे असाच काहीसा प्रकार इंदापुरात घडला आहे. Devendra Fadnavis “Chief Minister” !!; Did you make a mistake by saying “Dattamama” that went to your mind ??
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकार राज्यात स्थापन होऊन आता 2 वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून या महाविकास आघाडी सरकारची धुरा सांभाळत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या कामाचा अनेकदा गौरवही करण्यात आलेला आहे. पण त्यांच्याच सरकारमधील मंत्र्यांना उद्धव ठाकरे यांच्या नावाचा विसर पडल्याची धक्कादायक घटना पहायला मिळाली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्य सरकारमधील सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भर सभेत मुख्यमंत्री म्हणून थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा उल्लेख केला. त्यामुळे मंचावर झालेला गोंधळ पाहून दत्तामामा गोंधळले आणि त्यांनी आपली चूक सुधारली.
इंदापूर येथे वाढदिवसानिमित्त झालेल्या एका कार्यक्रमाला राज्यमंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते. भाषणासाठी ज्यावेळी भरणे व्यासपीठावर उभे राहिले, त्यावेळी त्यांच्याकडून “चुकून” फार मोठी “चूक” घडली. त्यांना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नावाचा विसर पडला आणि ते मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेऊन मोकळे झाले. त्यानंतरही त्यांना आपली चूक लक्षात आली नाही. व्यासपीठावर उपस्थित सर्वांनी ही चूक त्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी ती दुरुस्त केली. पण त्यांच्या या चुकीमुळे उपस्थितांमध्ये मात्र काही काळ हशा पिकला. त्यानंतर गोंधळलेल्या दत्तामामांनी डोक्यात एकाचवेळी भरपूर विचार चालू असल्याने अशा गोष्टी होत असतात, असे म्हणत वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न केला.
चुकीला माफी मिळणार का?
दत्तामामांच्या या एका चुकीमुळे राजकीय वर्तुळात मात्र चर्चांना उधाण आले आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना दत्तामामा इंदापूरचे आमदार होते आणि त्यावेळी फडणवीसांनी इंदापूरसाठी विकासनिधी देताना कायम हात सैल ठेवला होता. त्यामुळेच भरणेंच्या तोंडी आजही मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांचे नाव आले का?, दत्ता मामा आपल्या मनातले तर बोलून गेले नाहीत ना?, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेते त्यांच्या या चुकीला माफी देणार का?, असाही सवाल खासगीत विचारला जात आहे.