विशेष प्रतिनिधी
अहमदाबाद : कोविडचे निर्बंध असतानाही मध्य गुजरातेतील साणंद येथे मोठ्या संख्येने महिला एका धार्मिक कार्यक्रमासाठी रस्त्यावर एकत्र आल्या. सोशल मीडियावर त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली आहे.Corona rules breaks in gujrath
गुजरातमध्ये काल चोवीस तासात १३ हजार रुग्ण आढळून आले तर १३१ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत ६ लाखांहून अधिक रुग्ण बाधित झाले आहेत.
या कार्यक्रमातून कोविडच्या नियमांची पायमल्ली झाल्याने पोलिसांनी स्वत:हून दखल घेत संबंधितांविरोधात कारवाई केली आहे. या सर्व महिला बलियादेव मंदिरात जाण्यासाठी जमल्या होत्या. याप्रकरणी चोवीस महिलांना अटकही झाली आहे.
साणंद तालुक्यातील नवापुरा आणि निधार्ध गावात पूजेसाठी मोठ्या संख्येने महिला एकत्र आल्या होत्या. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन न करता या महिला डोक्यावर कलश घेऊन रस्त्यावरून गेल्या.
यावेळी संगीतही वाजवले जात होते. या कार्यक्रमाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्याची दखल घेतली. सरपंचासह नवापुरा गावातील चोवीस जणांविरोधात गुन्हा दाखल केला.
संगीत वाजवणाऱ्या आणि कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्याविरोधातही कारवाई केली गेली. राज्यात अनेक भागात संचारबंदीसारखे निर्बंध लावलेले आहेत. तरीही नागरिकांनी त्याची तमा न बाळगता धार्मिक कार्यक्रमासाठी गर्दी केल्याचा प्रकार घडला आहे.