• Download App
    भारत जोडो यात्रा राहुल गांधींची पप्पू इमेज त्यांचे फंबल्स या पलिकडचे काही प्रश्न Bharat Jodo Yatra : did Rahul Gandhi saw any change in India?? Will it reflect in Congress strategic planning for 2024??

    भारत जोडो यात्रा : राहुल गांधींची पप्पू इमेज, त्यांचे फंबल्स या पलिकडचे काही प्रश्न!!

    विशेष प्रतिनिधी

    भारत जोडो यात्रेत राहुल गांधी तब्बल 2000 – 2500 किलोमीटर चालले आहेत. भारत जोडो यात्रा आता शेवटच्या टप्प्यात आहे. या सगळ्या यात्रेत राहुल गांधींची “पप्पू” इमेज आणि त्यांच्या मोजक्याच झालेल्या जाहीर सभांमध्ये मधले फंबल्स या पलिकडचे काही प्रश्न आहेत. Bharat Jodo Yatra : did Rahul Gandhi saw any change in India?? Will it reflect in Congress strategic planning for 2024??

    महात्मा गांधींचे भारत भ्रमण

    महात्मा गांधींचे गुरु गोपाळ कृष्ण गोखले यांनी गांधींना त्यावेळी संपूर्ण भारत भ्रमण करण्याचा सल्ला दिला होता. तुम्ही संपूर्ण भारत फिरा. त्या निमित्ताने तुम्हाला संपूर्ण भारताचे प्रश्न समजतील आणि त्या प्रश्नांवर आधारित तुमचे धोरण आखा, असा तो सल्ला होता. महात्मा गांधींनी गोपाळ कृष्ण गोखलेंचा सल्ला तंतोतंत पाळला. त्यांनी खरंच भारत भ्रमण केले आणि त्यातूनच महात्मा गांधींच्या विविध आंदोलनांचा उदय झाला. महात्मा गांधींनी त्यांच्या भारताच्या आकलना नुसार आपल्या राजकीय, सामाजिक आणि धार्मिक आंदोलनांना आकार दिला. पण त्या सगळ्यांचे मूळ त्यांच्या भारत भ्रमणात होते.



    राहुलजींच्या भाषणातील फंबल्स आणि कंटेंट

    इथे महात्मा गांधी आणि राहुल गांधी यांची तुलना करण्याचा अजिबात हेतू नाही. तसे करणे शक्यही नाही. पण भारत भ्रमणातून भारताचे जे आकलन महात्मा गांधींना झाले, तसे काही आकलन राहुल गांधींना आपल्या भारत जोडो यात्रेतून झाले आहे का??, हा खरा प्रश्न आहे. कारण त्यांच्या जाहीर भाषणांमध्ये त्याचे काहीच प्रतिबिंब पडलेले दिसत नाही, ही वस्तुस्थिती आहे. 2014, 2019 च्या लोकसभा निवडणुकांमधली भाषणे आणि भारत जोडो यात्रेतील भाषणे यामध्ये जो मूलभूत फरक दिसायला हवा होता, त्यामध्ये भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींना दिसलेल्या चित्राचे प्रतिबिंब त्यामध्ये पडायला हवे होते. ते प्रतिबिंब त्यांच्या सध्याच्या भाषणांमध्ये पडते का??, हा प्रश्न आहे. राहुल गांधींचे फंबल्स हा माध्यमांच्या बातम्यांचा विषय होतो. राहुल गांधींनी पानिपतच्या सभेत भारताची लोकसंख्या रुपयात मोजली. भारताची लोकसंख्या 140 करोड रुपये आहे, असे ते म्हणाले. त्याच्या बातम्या आल्या. पण त्यांच्या भाषणांमधला कंटेंट नेमका काय होता, यावर कोणीही चर्चा केली नाही.

    राहुल गांधींच्या भाषणात ढोबळ मानाने पंतप्रधान मोदी यांचे अपयश, तरूणांची अस्वस्थता, बेरोजगारी, शेतकरी – मजूर हीच पारंपारिक काँग्रेसी भाषा आहे. त्या पलिकडे कोणताही कोणतीही समस्या त्यांनी मूलभूतपणे समजून घेऊन मांडली आहे, असे दिसत नाही.

    विक्रमी पेरणी दिसली नाही का??

    आजचीच म्हणजे 8 जानेवारी 2023 रोजीची एक बातमी आहे. भारतात गहू, तेलबिया आणि कडधान्य यांची विक्रमी पेरणी झाली आहे. शेतकऱ्यांचे मूलभूत आकलन आणि कृतीतला हा फरक आहे. केंद्र सरकारने खाद्य तेलांची आयात कमी करण्यासाठी जी महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे, त्या योजनेचा एक महत्त्वाचा भाग म्हणून तेलबियांची लागवड याकडे पाहिले आहे. त्या योजनेनुसार जर तेलबियांच्या पेरणीमध्ये विक्रमी वाढ होत असेल, तर हा बदल राहुल गांधींना भारत जोडो यात्रेत फिरताना दिसला नाही का??, हाही महत्त्वाचा प्रश्न आहे.

    पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 80 कोटी जनतेला 2023 वर्षभर मोफत धान्य देण्याची घोषणा केली आहे. हे धान्य कुठून येणार??, हा प्रश्न राहुल गांधींना पडला नाही का?? याचे खरे उत्तर गव्हाच्या विक्रमी पेरणीत आहे. पण ते राहुल गांधींना दिसले नाही का??, हा देखील प्रश्न आहे.

     अमुलाग्र बदल दिसले नाहीत का??

    भारतीय रेल्वेमध्ये अमुलाग्र बदल होतो आहे. गेल्या वर्षभरातच भारतभरात दीर्घ पल्ल्याच्या 9 वंदे भारत रेल्वे गाड्या सुरू झाल्या आहेत. यापैकी एकही वंदे भारत रेल्वे गाडी राहुल गांधींना आपल्या 2500 किलोमीटरच्या भारत जोडो यात्रेत दिसली नाही का?? कित्येक हजार किलोमीटर राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग तयार होऊन ते वापरात आले आहेत. यापैकी एकही महामार्गावरून राहुल गांधींची भारत जोडो यात्रा गेली नसेल का?? दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत छोट्या मोठ्या शहरांमध्ये वेगवेगळे बदल घडले आहेत, मग ते तंत्रज्ञानाच्या छोट्या मोठ्या वापरापासून ते आता 5g तंत्रज्ञानापर्यंतचे बदल आहेत. याची झलक राहुल गांधींना भारत जोडो यात्रेत 2500 किलोमीटर चालताना दिसली आहे का?? या सगळ्या गोष्टींचे प्रतिबिंब त्यांच्या धोरणांमध्ये पडणार आहे का??, हा मूलभूत प्रश्न आहे.

    उत्तरे द्या अथवा देऊ नका तरी…

    महात्मा गांधींच्या भारत भ्रमणातून त्यांची अनेक आंदोलने आकाराला आली. त्यांचे राजकीय जीवन यशस्वी झाले. ते भारताचे आयकॉन बनले. पण राहुल गांधींना आपल्या भारत जोडो यात्रेत बदलता भारत दिसला आहे का?? दिसला असल्यास त्याचे प्रतिबिंब त्यांच्या भाषणात पडो अथवा न पडो, ते काँग्रेस पक्षाच्या धोरणात पडणार आहे का?? हा प्रश्न आहे आणि या प्रश्नाच्या उत्तरातच 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या निवडणुकीतील काँग्रेसच्या यशापयशाची बीज दडले आहेत. त्याची पेरणी खरे म्हणजे राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेदरम्यान करायला हवी होती. ती त्यांनी केली आहे का?? या प्रश्नाचे उत्तर राहुल गांधींकडे आहे का??, ते राहुल गांधी जाहीररीत्या देवोत न देवोत. त्याचे पीक मात्र नेमके किती उगवेल??, हे 2024 मध्ये दिसणार आहे!!

    Bharat Jodo Yatra : did Rahul Gandhi saw any change in India?? Will it reflect in Congress strategic planning for 2024??

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक