विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : एक कर्मचारी कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या अधिकाऱ्यांनी प्रवाशांना एअर इंडियाच्या विमानात बसण्यास मनाई केली. त्यामुळे एअर इंडियाचे विमान मंगळवारी सिडनीहून केवळ सामान घेऊन मायदेशी परतले.Air India plane comes back without passengers
दिल्ली ते सिडनी अशी सेवा देणारे एअर इंडियाचे विमान शनिवारी दिल्लीहून सिडनीला रवाना झाले होते. तत्पूर्वी वैमानिक आणि अन्य कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आणि त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले होते.
रविवारी सकाळी एअर इंडियाचे विमान सिडनीत पोचल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या अधिकाऱ्यांनी वैमानिकांसह सर्व कर्मचाऱ्यांची आरटी पीसीआर चाचणी केली. त्याचा अहवाल सोमवारी आला. त्यात एक सदस्य बाधित असल्याचे असल्याचे निष्पन्न झाले.
त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या अधिकाऱ्यांनी प्रवाशांना विमानात जाण्यापासून रोखले. अखेर एअर इंडियाचे विमान केवळ उर्वरित कर्मचारी आणि सामान घेऊन नवी दिल्लीला परतले.
त्यांनी कोरोनाबाधित झालेल्या कर्मचाऱ्याला सिडनीच्या विलगीकरण कक्षात ठेवले आहे. ऑस्ट्रेलियाने भारतात कोविडची वाढती संख्या लक्षात घेता १५ मे पर्यंत भारतातून येणाऱ्या सर्व विमानांवर बंदी घातली आहे.