प्रतिनिधी
पंढरपूर : संपूर्ण देशाने स्वीकारलेल्या “सबका साथ – सबका विकास – सबका विश्वास – सबका प्रयास” या धोरणाचे मूळ वारकरी संप्रदायाने देशात रुजविल्या समरसता तत्त्वांमध्ये आहे, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिली.Addressing a programme on infra modernisation in Pandharpur.
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गांच्या विस्तारीकरणाचे भूमिपूजन आज दुपारी झाले. त्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी बोलत होते. कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय महामार्ग बांधणी मंत्री नितिन गडकरी, राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंग, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आदी उपस्थित होते.
पंढरपूर मधून वारकरी संप्रदायाची सर्व संतमंडळी कार्यक्रमात सहभागी झाली. पंतप्रधान मोदी यांनी दिल्लीतून ऑनलाइन संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, की देशाने “सबका साथ – सबका विकास – सबका विश्वास आणि सबका प्रयास” हे धोरण स्वीकारले आहे यामागे वारकरी संप्रदायाने आपल्या समाजावर केलेले समरसतेचे संस्कार आहेत. संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे, “विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म सर्व भेदाभेद अमंगळ” हेच तत्व वारकरी समुदाय आत्मसात करून अमलात आणतो. स्त्री-पुरुष भेद ठेवत नाही. एकमेकांना “माऊली” असे संबोधतो. श्री विठ्ठल आणि संत ज्ञानेश्वर महाराजांनी मध्ये आपली माता पाहतो. हा संस्कार आपल्या भारतीय मातीमध्ये झालेला आहे आणि त्यातूनच देशाने आता “सबका साथ – सबका विकास – सबका विश्वास – सबका प्रयास” हे धोरण स्वीकारले आहे, असे मोदी यांनी स्पष्ट केले.
त्याच वेळी पंतप्रधान मोदी यांनी वारकरी आणि पालखी मार्गावरील सर्व ग्रामस्थांकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. दोन्ही पालखी मार्गांवर ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन मोठे वृक्ष लावावेत. तेथे पाणपोया बांधाव्यात आणि पंढरपूर हे देशातले सर्वात स्वच्छ तीर्थस्थळ बनवावे, अशा तीन अपेक्षा मोदी यांनी व्यक्त केल्या. यामध्ये जनसहभाग मोठी भूमिका बजावेल असे सांगितले. त्यावेळी उपस्थितांनी हात उंचावून पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले पंढरपूरची असलेले दुहेरी नाते देखील सांगितले. ते म्हणाले, की मी गुजरातचा आहे. गुजरातमधले द्वारकाधीश हेच पंढरपुरात श्री विठ्ठलाच्या रूपाने प्रकट झाले आहेत. मी काशीचा देखील आहे आणि पंढरपूर हे दक्षिणेत दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. हे अतूट नाते भारतीय तीर्थस्थळांचे आहे, असे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमापूर्वी नितीन गडकरी यांनी आपल्या खात्याचे राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंग यांच्या समवेत पंढरपूर मध्ये श्री विठ्ठल आणि रखुमाई यांचे दर्शन घेतले. सुमारे सुमारे बाराशे कोटी रुपये खर्चाचे हे दोन्ही मार्ग येत्या दीड वर्षात पूर्ण होणे अपेक्षित आहे.
Addressing a programme on infra modernisation in Pandharpur.
महत्त्वाच्या बातम्या
- ब्रिटनमध्ये प्रथमच महात्मा गांधीजींचे चित्र असलेले नाणे प्रसिद्ध
- प. बंगालमध्ये इंधनावरील व्हॅट कमी करण्याची भाजपची तृणमूल काँग्रेसकडे मागणी
- रशियाचे तब्बल ९० हजार सैनिक युक्रेनच्या सीमेवर, तणाव वाढला
- अमिताभ बच्चन यांच्या घरातील पेंटिंगची चर्चा
- भारताची भूमी बळकाविण्यासाठी चीनच्या सातत्याने व्यूहात्मक खेळी – अमेरिकेचा अहवाल