काँग्रेसची सध्याची अवस्था उत्तर प्रदेशातल्या जमीनदारासारखी झाली आहे. त्याचे पूर्वी एक हजार एकर शेत शिवार होते. पण आता शेती दहा-बारा एकरावर आली आहे. त्याला जुने दिवस आठवतात आणि तो म्हणतो की हे सगळे एकेकाळी माझे होते. काँग्रेस एकेकाळी संपूर्ण देशात होती. पण आता ती 40 खासदारांच्या मर्यादे इतकी उरली आहे, असे अत्यंत खळबळजनक वक्तव्य करून शरद पवारांनी देशाच्या राजकारणात मोठी राळ उडवण्याचा प्रयत्न केला…पण ती राळ उडाली फक्त महाराष्ट्रात…!! केंद्रातल्या नेत्यांनी काँग्रेसच्या नेत्यांनी पवारांच्या या “महा वक्तव्याची” दखलही घेतली नाही. किंबहुना नाना पटोले यांनी दखल घेऊन “पवार मोठे नेते आहेत, त्यांच्याविषयी काही बोलायचे नाही,” असे आमचे ठरले आहे, असे सांगून पवारांना एक प्रकारे किरकोळीतच काढले.Why Congress centaral leadership ignored sharad pawar’s statement??
वास्तविक पाहता आपण काय विधान करतो आहोत?, ते कोणाला टोचणार आहे? याची पूर्ण जाणीव पवारांना होती. त्यासाठी त्यांनी जमवलेला जमावडा, साधलेली वेळ त्यांच्या मते अचूक होती. पण त्यांनी एवढे खळबळजनक विधान करूनही महाराष्ट्र काँग्रेसमध्ये प्रतिक्रिया दिली ती फक्त नाना पटोले यांनी, ती देखील पवारांचे वक्तव्य येऊन बारा तास उलटून गेल्यानंतर. त्यातही त्यांनी शेलक्या शब्दात पवारांना ठोकून घेतले. त्याच्या हेडलाईन झाल्या. पण त्यांच्या वक्तव्यातले “बिटवीन लाईन” हेच होते की काँग्रेसचे असे ठरले आहे, की पवारांविषयी काही बोलायचे नाही म्हणजे केंद्रातले काँग्रेसचे नेते पवारांची दखलही घेणार नाहीत, असा त्याचा अर्थ होतो.
काही दिवसांपूर्वीच “हा अर्थ” काँग्रेसच्या बंडखोर नेत्यांनी देखील पवारांना आपल्या कृतीतून दाखवून दिला होता. राष्ट्र मंच नावाच्या यशवंत सिन्हा यांच्या बैठकीला एकही काँग्रेस नेता पवारांच्या 6 जनपथ या निवासस्थानी फिरकलाही नव्हता. यातून पवारांचे राष्ट्रीय राजकारणातले महत्त्व
किती “प्रचंड” आहे, काँग्रेस नेत्यांनी आपल्या पद्धतीने दाखवून दिले होते. आता पवारांनी काँग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वावर दुगाण्या झोडूनही काँग्रेसच्या केंद्रीय पातळीवरच्या कोणत्याही नेत्याने पवारांच्या वक्तव्याची साधी दखलही घेतलेली नाही, याला म्हणतात राजकारण…!! हे राजकारण उद्ध्वस्त हवेलीच्या जमीनदारांना बरोबर जमते. कारण उद्वस्त असली तरी त्यांची ती “हवेली” आहे. एकेकाळी का होईना पण काँग्रेस संपूर्ण देशात होती आणि आणि त्या जमीनदारांवर हल्लाबोल करणाऱ्यांना स्वतःच्या चाळी देखील नीट बांधता आलेल्या नाहीत किंवा त्यांची डागडुजी करता आलेली नाही. काँग्रेस नेतृत्वावर हल्लाबोल करणाऱ्या पवारांना आपला पक्ष संपूर्ण देशभर तर सोडाच पण संपूर्ण महाराष्ट्रभर देखील कधी पसरवता आलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसला 23 वर्षे उलटून गेली तरी पश्चिम महाराष्ट्राची राजकीय हद्द ओलांडता आलेली नाही. ही कटू असली तरी राजकीय वस्तुस्थिती आहे.
शिवाय नाना पटोले यांनी म्हटल्याप्रमाणे अनेकांना काँग्रेसने जमीन राखायला दिली त्यावर त्या राखणदारांनी डल्ला मारला. या “अनेकांपैकी एक” पवार आहेत हेच त्यांनी स्पष्टपणे सूचवले. नानांनी हे उघडपणे बोलून सूचित केले पण काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाला उघडपणे बोलण्याची गरजही वाटली नाही. कारण काँग्रेसची घटलेली ताकद 40 खासदार यांच्या आसपास आहे. पवारांची उभरती ताकद देखील कधी राष्ट्रवादीच्या
खासदारांची संख्या डबल डिजिटमध्ये नेऊ शकलेली नाही. हे काँग्रेसच्या नेतृत्वाला पक्के ठाऊक आहे. तेव्हा पवारांसारख्या प्रादेशिक नेत्याच्या वक्तव्यावर कोणतेही वक्तव्य करून आपली केंद्रीय पातळी सोडण्याची काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाला गरज वाटलेली दिसत नाही.
आणि जर 40 खासदारांच्या पक्षाची हवेली जर “उद्धवस्त हवेली” असेल तर 4 ते 9 या खासदारांच्या संख्येत खेळत असलेल्या पक्षाला “चाळ”, “वन रूम किचन” की “वन बीएचके फ्लॅट” असे संबोधायचे, हे ज्याचे त्याने ठरवावे लागेल.
काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने पवारांचा हा राजकीय वकूब ओळखल्याने त्यांच्या खळबळजनक वक्तव्यावर कोणतीही प्रतिक्रिया न व्यक्त करून त्यांना त्यांचे “महाराष्ट्र लिमिटेड” स्थान दाखवून दिले आहे. हे राजकारण उध्वस्त हवेलीच्या जमीनदारांनी साधून घेतले आहे…!! फक्त पवारांनी पोसलेल्या मराठी माध्यमांना ते कळलेले नाही…!! किंवा कळूनही वळलेले नाही…!!
कारण त्यांनी नेहमीप्रमाणे पवारांच्या वक्तव्याचे ढोल वाजवून घेतले. महाराष्ट्रात प्रचंड खळबळ झाल्याचे भासविले पण प्रत्यक्षात काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने पवारांबरोबरच मराठी माध्यमांच्या फुग्यातली हवा देखील प्रतिक्रिया न देऊन काढून टाकली आहे…!!
Why Congress centaral leadership ignored sharad pawar’s statement??
महत्त्वाच्या बातम्या
- साकीनाका ‘निर्भया’ प्रकरण : ३० वर्षीय पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी, आरोपी गजाआड, महाराष्ट्रातून संतापाची लाट
- Honey Trap : भारतीय लष्कराचे गुप्त दस्तऐवज पाकिस्तानी महिला एजंटला पुरवले, टपाल सेवा अधिकाऱ्याला अटक
- Bigg Boss OTT : शिल्पा शेट्टीने बहीण शमिताला दिला पाठिंबा , चाहत्यांना मतदान करण्याचे केले आवाहन
- 9/11 AMERICA ATTACK : ३००० मृत्यु-जग हादरले-महासत्तेवरील दहशतवादी हल्ल्याला २० वर्षे पूर्ण; सीआयएला होती हल्ल्याची कल्पना- राेखण्यात अपयश;वाचा सविस्तर