बिहारची निवडणूक तोंडावर आली असताना राहुल गांधी दक्षिण अमेरिकेच्या दौऱ्यावर निघून गेले. तिथे त्यांनी नेहमीप्रमाणे संघ आणि भाजपवर जोरदार टीका करणारी भाषणे केली. त्यांच्या भाषणांमध्ये नवे काही नव्हते, पण संघाचा द्वेष पुरेपूर भरला होता. पण राहुल गांधींनी संघाचा द्वेष नाही करायचा तर दुसरे करायचे तरी काय असा सवाल त्यामुळे मनात आल्या शिवाय राहात नाही. Rahul Gandhi
राजकारणात काहीही होऊ शकते असे कितीही आणि कुणीही म्हटले तरी, एक तर राहुल गांधी आणि संघ यांचे कधी जुळण्याची शक्यता नाही. कारण राहुल गांधी म्हणजे “इंदिरा गांधी” किंवा “राजीव गांधी” नव्हेत.
– संघ आणि इंदिरा गांधी यांचे संबंध
संघ आणि इंदिरा गांधी किंवा इंदिरा गांधी आणि संघ आणि त्यानंतर संघ आणि राजीव गांधी यांनी एकमेकांशी त्यांच्या राजकीय अपरिहार्यतेपोटी जुळवून घेतले होते, याची साक्ष देशाच्या राजकीय इतिहासात मिळते. त्याचा वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये अनेक पत्रकारांनी उल्लेख देखील केला आहे. 1980 च्या दशकात इंदिरा गांधींना संघाचे “राजकीय महत्त्व” पटले होते. एकीकडे वाजपेयी स्वतःचे राजकारण secularise करत होते, तर दुसरीकडे इंदिरा गांधींचा झुकाव हिंदू राजकारणाकडे आला होता. त्यामुळे इंदिरा गांधींनी संघांशी जुळवून घेतले होते. इंदिरा गांधींनी सुद्धा संघाचे विशिष्ट “राजकीय महत्त्व” ओळखून संघ नेतृत्वाला न दुखावता त्यांना जवळ केले होते. बाळासाहेब देवरस + भाऊराव देवरस यांच्याशी इंदिरा गांधींचे संवादात्मक संबंध व्यवस्थित निर्माण होऊन ते टिकले देखील होते. 1980 च्या निवडणुकीत इंदिरा गांधींना 353 जागा मिळाल्या होत्या. संघाने रेटा लावला नसता, तर इंदिरा कांग्रेसला एवढ्या जागा मिळाल्या नसत्या, याची कबुली इंदिरा गांधींनी खाजगीत दिली होती, असा हवाला ज्येष्ठ पत्रकार नीराजा चौधरी यांनी आपल्या पुस्तकातून दिला आहे.
– राजीव गांधींना संघाची मदत
त्याचबरोबर ईशान्य भारत आपल्या समस्या उग्र होताना संघाने आपल्याला मदत करावी संघाने त्याचे काम वाढवावे यासाठी इंदिरा गांधींनी हस्ते पर हस्ते संघाला सुचविले होते. त्यानुसार संघाने इंदिरा गांधींची विशिष्ट अनुकूलता पाहून ईशान्य भारतात आपले काम त्या काळात वेगाने वाढवायला सुरुवात केली होती. आसामचे आंदोलन हाताळण्यासाठी संघाने राजीव गांधींना सुद्धा मदत केली होती. भाऊराव देवरस आणि राजीव गांधी यांच्या चार वेळा भेटी झाल्या होत्या, असा हवाला वेगवेगळ्या राजकीय पुस्तकांमधून मिळतो.
वर उल्लेख केल्याप्रमाणे इंदिरा गांधी आणि संघ राजीव गांधी आणि संघ यांच्या काही विशिष्ट राजकीय कारणांसाठी जुळवून घेतले असले, तरी दोन्ही बाजूने राजकीय परिपक्वता (political maturity) दाखविल्यानंतर हे संबंध जुळून आले होते.
– राहुल गांधींमध्ये परिपकवतेचा अभाव
राहुल गांधींच्या बाबतीत तशी बिलकुल शक्यता नाही. कारण त्यांच्यात राजकीय परिपक्वतेचा पूर्ण अभाव आहे. शिवाय राहुल गांधींसारख्या बेभरवशाच्या राजकीय खेळाडूची संघाला आता गरजच उरलेली नाही. राहुल गांधींनी संघाचा कितीही द्वेष केला तरी त्यातून संघाच्या अंगावर कुठलाही राजकीय ओरखडा उठण्याची शक्यता नाही. संघाच्या अंगावर जो काही राजकीय ओरखडा उठवायचा होता, तो सोनिया गांधींनी 2004 ते 2009 या कालावधीत उठवून घेतला. त्याचा संघाला आणि संघ नेतृत्वाला त्रासही झाला. पण त्यातूनच तर राजकीय मंथन होऊन नरेंद्र मोदी नावाचे नेतृत्व उदयाला आले. ते आता पूर्ण परिपक्वतेने राज्य करत आहे. अशा स्थितीत नरेंद्र मोदी हे सत्तेच्या मार्गातून संघाला अपेक्षित बदल जर स्वतःहून घडवून आणत असतील, तर संघ इतर नेत्यांच्या नादी लागण्याची शक्यताच नाही. कारण संघाला आणि संघ नेतृत्वाला तशी गरजही नाही.
– परिणाम काय होईल??
त्याचबरोबर राहुल गांधींसारख्या नेत्याला अनेक राजकीय रणनीतीकारांनी समजावून झाले, की तुम्ही नरेंद्र मोदींसारख्या नेत्याला व्यक्तिगत पातळीवर अंगावर घेऊ नका. त्यामुळे नरेंद्र मोदींचे नुकसान होण्याच्या ऐवजी तुमच्या पक्षाचे आणि तुमचे वैयक्तिक नुकसान होते, असे स्पष्ट बजावून सांगून सुद्धा राहुल गांधी नरेंद्र मोदींना वैयक्तिकरित्या अंगावर घेतात आणि स्वतःचे आणि काँग्रेसचे नुकसान करून घेतात. हेच राहुल गांधी संघाला सुद्धा अशाच पद्धतीने अंगावर घेतात. त्यामुळे राहुल गांधींचे फार मोठे नुकसान होते असे नाही, पण त्यांचा फायदाही काही होत नाही. संघाच्या कामाची जी विशिष्ट गती आहे, ती बिलकुल थांबत नाही. त्यामुळे राहुल गांधींना त्यांचे राजकारण पुढे धकवण्यासाठी संघाचा द्वेष केल्याशिवाय राहावत नाही. तोच त्यांच्या राजकारणाचा पुरता “आधार” आणि “आजार” बनत चाललाय. त्याला त्यांच्यासारखे अपरिपक्व नेते करणार तरी काय??, हा खरा सवाल आहे. म्हणून राहुल गांधी संघाचा असाच द्वेष करत राहणार आणि स्वतःचे राजकारण पुढे ढकलत राहणार. त्यापलीकडे काही होण्याची शक्यता नाही.
What else Rahul Gandhi can do barring to abominate RSS??
महत्वाच्या बातम्या
- संघ शताब्दी : पुणे महानगरात शताब्दी वर्षात संघशक्तीचे विराट दर्शन; विजयादशमी निमित्त 77 संचलने, 84 शस्त्र पूजन उत्सव!!
- Mohsin Naqvi : पाकिस्तानात गृहमंत्री नक्वींवर राजीनाम्यासाठी दबाव; आशिया कप पराभवानंतर पीसीबी अध्यक्षांविरुद्ध संतापाची लाट
- पराभूत निजामाने तयार केलेले गॅझेट मराठा आरक्षणासाठी स्वीकारण्याचे कारण काय??; खासदार शाहू महाराजांचा परखड सवाल
- Vijay Kumar Malhotra : भाजप नेते विजय कुमार मल्होत्रा यांचे निधन; दिल्लीचे पहिले भाजप अध्यक्ष, मनमोहन सिंग यांचा केला होता पराभव