विशेष प्रतिनिधी
लखनौ : कोरोना संसर्गाबरोबरच आता देशातील अंधश्रद्धा देखील वाढू लागल्या असून यूपीतील अनेक गावांमध्ये कोरोनामाई देवीची पूजा सुरू झाली आहे. तर बाराबंकी जिल्ह्यातील सिसोऱ्हा खेड्यामध्ये लसीकरणासाठी आलेले अधिकारी पाहून काही ग्रामस्थांनी चक्क शरयू नदीमध्येच उड्या मारल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. Up people did puja for corona
कोरोनामाई देवीच्या पूजाअर्चेत खेडूतांबरोबरच सुशिक्षित मंडळी देखील सहभागी होताना दिसतात. अनेक महिलांनी स्वतःच्या शेतामध्येच कोरोनामाईचे देवालय उभारले असून सकाळी उठल्यापासूनच काही मंडळी पूजा साहित्य घेऊन शेतांमध्ये धाव घेत असल्याचे दिसून आले आहे.
देवीच्या मूर्तीवर तेल, दुधाचा अभिषेक केला जात असून पूजा करणारी मंडळी तिथे आलेल्या अन्य भक्तांना देखील मोठ्या श्रद्धेने प्रसादाचे वाटपही करतात. या देवीसाठी गुरुवारी विशेष कार्यक्रम आणि पूजाविधीचेही आयोजन केले जाते. या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी काही महिला या शेकडो किलोमीटर अंतर चालत दुसऱ्याच्या शेतामध्ये जातात.