Thursday, 8 May 2025
  • Download App
    प्रचार झेपता – झेपेना; टप्पे गाठता गाठेना!!; ममतांची व्हिलचेअर आता पळता पळेना...!! TMC wants remaining elections to be held in one phasee%

    West Bengal assembly elections : प्रचार झेपता – झेपेना; टप्पे गाठता गाठेना!!; ममतांची व्हिलचेअर आता पळता पळेना…!!

    विनायक ढेरे

    लंबी रेस का घोडा धीरे से दौडता है… ही म्हण बंगालच्या निवडणूकीस विशेषतः ममतादीदींच्या तृणमूळ काँग्रेसला चपखल लागू पडताना दिसतेय. कारण उघड आहे, त्यांना आता निवडणूकीतला प्रचार झेपेनासा झालाय आणि मतदानाचे उरलेले ४ टप्पे नकोसे झालेत. TMC wants remaining elections to be held in one phase

    ममता बॅनर्जींच्या तृणमूळ काँग्रेसचे अधिकृत प्रतिनिधी डेरेक ओब्रायन यांनी निवडणूक आयोगाकडे तशी रीतसर मागणीच केली आहे. फक्त त्याला कोरोना फैलावाचे महत्त्वाचे कारण जोडले आहे… अर्थात हे कारण खरेच आहे. कोरोना बंगालमध्येच काय पण देशात वेगाने फैलावतोय. त्यामुळे ते कारण नाकारण्यात मतलब नाही… पण खरा मुद्दा पुढचाच आहे, बंगालमध्ये आजही ममता बॅनर्जी याच मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या तृणमूळ काँग्रेसचेचे सरकार आहे. ते सरकार कोरोना फैलावाला अटकाव करण्यासाठी नेमके काय करते आहे, हा तो मुद्दा आहे. याचे नेमके उत्तर डेरेक ओब्रायन यांनी दिलेले नाही.

    त्यांनी फक्त कोरोनाचे कारण देऊन मतदानाचे उरलेले ४ टप्पे रद्द करून मतदान एकाच टप्प्यात घ्यावे अशी मागणी केली आहे. पण यात कोरोनाच्या कारणापेक्षा महत्त्वाचे राजकीय इंगित दडलेले आहे, ते म्हणजे असे… आता तृणमूळ काँग्रेसच्या नेत्यांना प्रचार झेपेनासा झाला आहे. ममतांचा एकखांबी तंबू व्हिलचेअरवर बसून किती दिवस एकटाच प्रचार करीत राहणार… हा प्रश्न त्यांना भेडसावतो आहे. ना त्यांच्याकडे स्टार प्रचारक आहे, ना कोणी क्राऊड पुलर. जे काही ते सगळे ममता बॅनर्जींभोवती आणि काही प्रमाणात अभिषेक बॅनर्जींभोवती फिरते आहे.

    … आणि तृणमूळचा प्रचाराचा गाडा अडकण्याची खरी मेख इथेच आहे. त्यांना भाजपच्या तोफखान्याला तोंड देताना नाकी नऊ आल्याचे दिसते आहे. मोदींचा प्रचाराचा धडाका झाला. तो अधून – मधून होत राहणारही आहे. अमित शहा आणि जे. पी. नड्डा तर तिथे अक्षरशः तळ ठोकून आहेत. भाजपची टीम तृणमूळच्या स्थानिक टीमपेक्षा तगडी आहे. ती मीडियात दिसते आहे. सोशल मीडियात दिसते आहे. नुसरत जहाँसारखी आपल्याच मतदारसंघाचा प्रचार आटोपून फॅशनच्या फोटोशूटसाठी निघून गेलेली नाही.



    मेनस्ट्रीम मीडिया भाजपच्या प्रचारातील पैशाचा आणि रिसोर्सेसचा उल्लेख आवर्जून करतोय. पण भाजपने गेल्या ६ वर्षांमध्ये उभ्या केलेल्या कार्यकर्त्यांच्या फौजेकडे मुद्दाम दुर्लक्ष करतोय. ही फौज बंगालमध्ये उभे करणे सोपे नव्हेत… जिथे चौका चौकात काठ्या – सुऱ्यांशी गाठ आहे, तिथे तर हे अजिबात सोपे नव्हते. भाजपने हे कष्टपूर्वक साध्य केले आहे.

    ममतांनी गेल्या १५ वर्षांमध्ये कम्युनिस्टांच्या हिंसक केडरशी लढण्याची ताकद जरूर मिळविली. त्यांनी कम्युनिस्टांच्या केडरवर जिद्दीने मात केली. त्यासाठी त्यांना १०० मार्क द्यायलाच हवेत… पण त्यांना आता भाजपच्या कार्यकर्त्यांच्या फौजेशी तोंड देताना नाकी नऊ येत आहे. ममतांच्या पाठीवर आपल्याच राजवटीच्या १० वर्षांच्या गैरकारभाराचे ओझे झाले आहे… आणि ते फेकून देत प्रचार करताना त्यांची दमछाक व्हायला लागली आहे.

    भाजपच्या आक्रमक प्रचाराला तोंड द्यायला ममतांचे कार्यकर्ते कमी पडताना दिसत आहेत. निवडणूकीत हिंसाचार माजविणे निराळे आणि आक्रमक – अचूक प्रचार करणे निराळे. ममता प्रचारात आक्रमक राहिल्या नाहीत. त्या आक्रस्ताळ्या झाल्या. आणि आक्रस्ताळेपणाचे वैशिष्ट असे असते, की तो आर्विभाव फार काळ टिकवून धरता येत नाही. टिकवून धरला, तर तो आक्रस्ताळ्यालाच खाऊन टाकतो. ममतांच्या प्रचाराचे नेमके असे झाले आहे.

    शिवाय मतदानाच्या वेळी बूथवर भाजपच्या कार्यकर्त्यांची फौज दिसते. तृणमूळकडे तिचा अभाव आहे. दीर्घकाळ दमसास टिकविणारी किंवा टप्प्या – टप्प्याने मैदानात येणारी फौज तृणमूळकडे नाही. ही आपल्याच पक्षाची उणीव ममतांना भाजपशी लढताना जाणवतेय.

    शिवाय स्वतःचा आक्रस्ताळेपणा आणि कार्यकर्त्यांची आक्रमकतेपक्षा हिंसक वृत्ती या दोहोंच्या कात्रीत ममता अडकल्या आहेत… आणि त्यातून सुटण्यासाठी त्यांच्या पक्षाला अर्थात तृणमूळ काँग्रेसला उरलेल्या ४ टप्प्यांमधले मतदान गुंडाळून ते एकाच टप्प्यात उरकून घ्यायचेय… तृणमूळच्या मागणीमागचे हे खरे इंगित आहे.

    TMC wants remaining elections to be held in one phase

     

    Related posts

    Operation Sindoor- 7 मिनिटांत 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त; काय म्हणाल्या कर्नल सोफिया आणि विंग कमांडर व्योमिका? वाचा सविस्तर

    द फोकस एक्सप्लेनर : भारताचे ‘ऑपरेशन सिंदूर’- 1971 नंतरचा सर्वात मोठा प्रतिहल्ल! 5 मुद्दे

    भारताने 13 देशांना ऑपरेशन सिंदूरची माहिती दिली, या ४ मुद्द्यांवर होता फोकस