वृत्तसंस्था
नवी दिल्ली : थायलंडचे पंतप्रधान श्रेथा थाविसिन ( Srettha thavisin ) यांना घटनात्मक न्यायालयाने पदावरून हटवले आहे. गुन्हेगारी रेकॉर्ड असलेल्या वकिलाचा मंत्रिमंडळात समावेश केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. हे पाऊल नैतिकतेचे उल्लंघन असल्याचे म्हणत न्यायालयाने पंतप्रधान श्रेथा यांना दोषी ठरवले आहे.
घटनात्मक न्यायालयाच्या 9 न्यायाधीशांच्या खंडपीठाने 5-4 अशा बहुमताने हा निर्णय दिला आहे. माजी सिनेटर्सनी पंतप्रधान श्रेथा यांच्या विरोधात न्यायालयात तक्रार दाखल केली होती. हे सर्व सिनेटर्स आधीच्या जंटा सरकारने नियुक्त केले होते. या निर्णयानंतर थायलंडमध्ये राजकीय संकट निर्माण झाले आहे.
याआधी गेल्या आठवड्यात घटनात्मक न्यायालयाने मुख्य विरोधी पक्ष मूव्ह फॉरवर्ड पार्टीला फेटाळून लावले होते. याशिवाय त्यांच्या सर्व नेत्यांवर 10 वर्षांची बंदी घालण्यात आली होती. गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीत मूव्ह फॉरवर्ड पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या.
मंत्रिमंडळही विसर्जित, नव्याने सरकार स्थापन होणार
न्यायालयाने आपल्या आदेशात थायलंड सरकारचे मंत्रिमंडळही बरखास्त केले आहे. आता यानंतर पंतप्रधानांची नव्याने नियुक्ती होणार आहे.
फेउ थाई पक्षाच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी आघाडी आता पंतप्रधानपदासाठी नवीन नाव सुचवणार आहे. नव्या नावाची घोषणा करण्यासाठी थायलंडच्या 500 सदस्यीय संसदेत मतदान होणार आहे.
न्यायालयाने म्हटले की, पंतप्रधान श्रेथा यांनी मुद्दाम गुन्हेगारी रेकॉर्ड असलेल्या व्यक्तीचा मंत्रिमंडळात समावेश केला आहे. मंत्रिमंडळात सामील होणारे वकील पिचित चुएनबान आहेत, ज्यांना 2008 मध्ये एका प्रकरणात दोषी ठरवण्यात आले होते.
पंतप्रधान श्रेथा केवळ एक वर्ष सत्तेत राहू शकले. 22 ऑगस्ट 2023 रोजी ते थायलंडचे पंतप्रधान झाले. घटनात्मक न्यायालयाने यापूर्वी फेउ थाई पक्षाच्या तीन पंतप्रधानांना काढून टाकले आहे. थायलंडमधील सत्ताधारी युतीमध्ये फेउ थाई पक्षाव्यतिरिक्त 10 पक्षांचा समावेश आहे. या आघाडीच्या एकूण खासदारांची संख्या 314 आहे.
थायलंडच्या नॅशनल असेंब्लीमध्ये सध्या 493 खासदार आहेत. पंतप्रधान होण्यासाठी कोणत्याही उमेदवाराला 247 खासदारांचा पाठिंबा आवश्यक असतो.
सध्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत पहिले नाव आहे 37 वर्षीय पीटोंगर्न शिनावात्रा यांचे. त्या फो थाई पक्षाचे नेते थाक्सिन शिनावात्रा यांच्या कन्या आहेत. याआधीही त्यांचे नाव पंतप्रधानपदासाठी पुढे आले होते.
Srettha thavisin Thailand’s Prime Minister impeached
महत्वाच्या बातम्या
- Narendra Modi : विकसित भारताचा संकल्प ते वैद्यकीय शिक्षणाच्या वाढीव 75000 जागा; लाल किल्ल्यावरून काय म्हणाले मोदी??; वाचा!!
- Sheikh Hasina : पंतप्रधानपदावरून पायउतार झाल्यानंतरही शेख हसीना यांच्या अडचणीत वाढ
- Govind Mohan : वरिष्ठ आयएएस अधिकारी गोविंद मोहन यांची केंद्रीय गृहसचिव म्हणून नियुक्ती!
- Vinesh Phogat : CASने विनेश फोगटची केस फेटाळली, रौप्य पदक मिळणार नाही!