• Download App
    "सावरकर" या विषयाचे काँग्रेसवर उलटलेले राजकीय बुमरँग!!|Savarkar poster in Bharat Jodo Yatra, it's a political boomerang for Congress

    “सावरकर” या विषयाचे काँग्रेसवर उलटलेले राजकीय बुमरँग!!

    विशेष प्रतिनिधी

    काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत केरळमध्ये “झाकलेले” सावरकर कर्नाटकात पुन्हा “प्रकट” होणे हे खरे म्हणजे सावरकर या विषयाचे काँग्रेसवर उलटलेले राजकीय बुमरँग आहे!!Savarkar poster in Bharat Jodo Yatra, it’s a political boomerang for Congress

    वास्तविक सावरकर हा विषय काँग्रेसने गेल्या सुमारे 70 वर्षांमध्ये राजकीय दृष्ट्या व्यवस्थित टाळला होता. किंबहुना सावरकर या विषयाचा वारा देखील या भारत देशाला लागू नये, याची पुरेपूर राजकीय काळजी काँग्रेसच्या तीन पिढ्यांच्या नेत्यांनी घेतली होती. सावरकर या विषयाचा दुरान्वये देखील उल्लेख होऊ नये यासाठी काँग्रेसी राज्यकर्त्यांनी आणि त्यांचे वैचारिक भरण पोषण करणाऱ्या कम्युनिस्टांनी इतिहासातून अत्यंत खुबीने त्यांचे नाव पुसण्याचा देखील प्रयत्न केला होता.

    पण 70 वर्षांनंतर मात्र काँग्रेसच्या वारसदार नेत्याला ही राजकीय खुबी जमली नाही आणि सावरकर हा विषय कायमचा संपवण्याच्या नादात काँग्रेसच्या वारसदार नेत्याने म्हणजे राहुल गांधी यांनी दिल्लीच्या रामलीला मैदानावरून जो हुंकार भरला, तो काँग्रेसच्याच शिडात उलटा शिरल्याचे दिसते आहे!! “मेरा नाम राहुल सावरकर नही है, मेरा नाम राहुल गांधी है!! मै माफी नही माँगूंगा!!”, असे उद्गार राहुल गांधींनी काढले आणि सावरकर संपूर्ण भारताच्या राजकीय पटलावर पुन्हा एकदा राजकीय दृष्ट्या “प्रकटले”!!



    काँग्रेस नेतृत्वाच्या आधीच्या पिढ्यांना जे नको होते, तेच राहुल गांधींनी नेमके स्वतःच्या हाताने घडवून आणले. जे सावरकर समर्थकांनाही राजकीयदृष्ट्या जमले नव्हते, ते राहुल गांधी यांच्यासारख्या विरोधकांनी करून दाखवले, ते म्हणजे सावरकर हा विषय देशाच्या राजकीय भूमीचा मध्यवर्ती बिंदू बनवून ठेवला आणि आता जेव्हा काँग्रेस स्वतःचे संघटनात्मक पुनरुज्जीवन करू पाहत आहेत, त्यासाठी राहुल गांधी मोठी मेहनत घेत आहेत, तेव्हा सावरकर हा विषय त्यांचा पिच्छा सोडायला तयार नाहीए!!

    अनेक स्वातंत्र्य सैनिकांपैकी एक महत्त्वाचे स्वातंत्र्यसैनिक एवढ्या पुरती जरी काँग्रेसने सावरकरांना “मान्यता” दिली असती, तरी सावरकर हा विषय आज जेवढा राजकीय भूमीचा मध्यवर्ती केंद्रबिंदू बनला आहे, तेवढा कदाचित तो बनू शकला नसता. पण राहुल गांधी यांच्यासारख्या नेत्याने सावरकरांचा वैचारिक विरोध सावरकर विद्वेषापर्यंत नेऊन ठेवल्याने सावरकर हा विषय देशाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनला. राहुल गांधी आणि बाकीचे सावरकर विरोधक जेवढ्या मोठ्या प्रमाणावर सावरकरांवर हल्ले करत राहिले, त्यापेक्षा सावरकर समर्थकांचा प्रतिहल्ला किंबहुना सावरकर समर्थकांची प्रत्युत्तरे जास्त प्रभावी ठरल्याचे दिसले आहे. किंबहुना असेही म्हणायला हरकत नाही, की सावरकर समर्थकांना एक प्रकारे राहुल गांधी आणि बाकीच्या सावरकर विरोधकांनी केलेली टीका ही हवीच होती… की ज्यामुळे सावरकर हा विषय आणि त्यानिमित्ताने हिंदुत्व हा विषय खऱ्या अर्थाने देशाच्या राजकारणाचा मध्यवर्ती बिंदू बनून राहील!!

    पंडित जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी, विश्वनाथ प्रताप सिंग, पी. व्ही. नरसिंहराव या पंतप्रधानांपर्यंत सर्वांनी खुबीने सावरकर हा विषय टाळला होता. इंदिरा गांधींनी सावरकरांच्या शताब्दी निमित्त लिहिलेले पत्र त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ काढलेला पोस्टल स्टॅम्प या बाबी प्रतीकात्मक होत्या. पण आज जेव्हा राहुल गांधी आणि त्यांचे समर्थक नेते सावरकरांचा वैचारिक विरोध राजकीय विद्वेषाच्या पातळीवर नेतात तेव्हा इंदिरा गांधींनी लिहिलेले पत्र आणि सावरकरांचा त्यांनीच काढलेला पोस्टल स्टॅम्प हे सावरकर समर्थकांची हत्यारे बनतात आणि या हत्यारांनी सावरकर समर्थक राहुल गांधी आणि त्यांच्या समर्थकांना घायाळ करताना दिसतात.

    केरळमध्ये भारत जोडो यात्रेत सावरकरांचे एक पोस्टर लागले होते. त्या पोस्टरवर वास्तविक पाहता अनेक नेत्यांचे फोटो होते. त्यात सावरकर राहिले असते, तर फारसे कोणाचे लक्षही गेले नसते. पण राहुल गांधींनी त्यांच्यावर एकापाठोपाठ एक हल्ले चढवून सावरकर हा विषय एवढा मोठा करून ठेवलाय की आपोआप सावरकरांच्या कुठल्याही छोट्या – मोठ्या फोटोकडे कोणाचेही लक्ष जावे. तसे केरळच्या पोस्टरवर सोशल मीडियाचे लक्ष गेले होते. त्यानंतरही तो फोटो महात्मा गांधींचा फोटो त्यावर चिकटवून झाकला नसता तरीही चालले असते. पण “सावरकरांचा फोटो झाकण्यासाठी महात्मा गांधींचा फोटो चिकटवला”, याची फार मोठी बातमी झाली… आणि हेच काँग्रेसवर एक प्रकारे राजकीय बुमरँग ठरले… कारण राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेच्या जेवढ्या बातम्या झाल्या नाहीत, तेवढ्या सावरकरांचे पोस्टर झाकल्याच्या बातम्या मेनस्ट्रीम मीडियामध्ये आणि सोशल मीडियामध्ये झळकल्या!!… आणि आता केरळमध्ये “झाकलेले” सावरकर कर्नाटकात “प्रकट” होणे ही त्या राजकीय बुमरँगची पुढची आवृत्ती आहे.

    राहुल गांधींनी आणि त्यांच्या समर्थकांनी सावरकरांवर “माफीवीर” वगैरे अनेक गलिच्छ आरोप केले. राजकीय दृष्ट्या तटस्थपणे विचार केला, तर ते आरोप सावरकरांना चिकटलेच नाहीत. उलट या आरोपांच्या निमित्ताने सावरकर समर्थकांनी जी प्रत्युत्तरे दिली, त्यातून सावरकरांची प्रतिमा जास्त उजळली आणि सावरकर समर्थक हे राजकीय दृष्ट्या वरचढ ठरले.

    आताही कर्नाटकात भलेही काँग्रेस विरोधकांनी मुद्दामून सावरकरांची पोस्टर्स काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने कुठे कुठे लावलीही असतील. ती शांतपणे काढून टाकता आली असती. त्या ऐवजी काँग्रेसचे आमदार नलपद अहमद हरीस त्यावर खुलासा देत बसले. त्यामुळे त्याची बातमी झाली.

    वास्तविक गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी हे भाषणात सावरकरांचे नाव घेत नाहीत, हे खरे, पण आता सावरकर हा विषय मात्र त्यांचा राजकीय पिच्छा सोडायला तयार नाही!! हेच कर्नाटकात भारत जोडो यात्रेच्या पोस्टरवर “प्रकट” झालेल्या सावरकरांचे “राजकीय इंगित” आहे!!

    Savarkar poster in Bharat Jodo Yatra, it’s a political boomerang for Congress

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

    रोजगाराच्या संधी वाढल्या, EPFOने फेब्रुवारीमध्ये १६.१ लाख सदस्य जोडले

    Pink e rickshaw महिलांसाठी महिलांद्वारे संचालित ‘पिंक ई-रिक्षा’!