शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे गुरुजी यांनी अमरावतीतल्या भाषणात महात्मा गांधींविषयी जे उद्गार काढले, ते उद्गार वाचल्यानंतर त्यांचे वर्णन “राहुल बुद्धीचे गुरुजी” या शब्दांनी करावेसे वाटते. Rahul Gandhi’s and bhide guruji’s shallow criticism on savarkar and gandhiji unacceptable equally
कारण राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर केलेली टीका जेवढी अप्रस्तुत आणि अयोग्य आहे, तेवढेच संभाजी भिडे गुरुजींनी महात्मा गांधींच्या वडिलांच्या कथित मुस्लिम मूळाविषयी काढलेले उद्गार अप्रस्तुत आणि अयोग्य आहेत.
मूळात महात्मा गांधींच्या एकूण राजकीय, सामाजिक, धार्मिक मतांविषयी आणि धोरणांविषयी त्यांचे दिवंगत वडील कसे काय जबाबदार ठरू शकतात?? मग ते हिंदू असोत अथवा मुस्लिम, हा मुद्दा इथे प्रस्तुत तरी कसा ठरू शकतो??, एवढे साधे लॉजिक संभाजी भिडे गुरुजी यांच्यासारख्या वयाने ज्येष्ठ असलेल्या उच्चशिक्षित सामाजिक कार्यकर्त्याला समजू नये का??, हा महत्त्वाचा मुद्दा आहे!!
राहुल गांधींनी जशी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कथित माफीनाम्यावर वाट्टेल तसे लॉजिक लावून बेछूट टीका केली होती आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्वातंत्र्य लढ्यातले अत्यंत अमूल्य योगदान नाकारले होते, त्याच पद्धतीने संभाजी भिडे गुरुजींचा महात्मा गांधींचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान नाकारण्याचा प्रयत्न दिसतो.
इतकेच नाही, तर मूळात अत्यंत गांभीर्याने इतिहासाचे अवलोकन करून इतिहासापासून काही धडे घेऊन समाजात कालानुरूप सुधारणा करण्याच्या प्रयत्नांनाच राहुल गांधी काय किंवा संभाजी भिडे गुरुजी काय, या दोघांचाही खो घालण्याचा प्रयत्न दिसतो!!
महात्मा गांधी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर ही दोन्ही भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील उत्तुंग व्यक्तिमत्वे होती. ते अत्यंत उच्चशिक्षित नेते होते. त्यांच्यात गंभीर स्वरूपाचे मतभेद होते. पण म्हणून त्यांनी कधी एकमेकांच्या आई-वडिलांवर खालच्या पातळीवर येऊन टीका केली नव्हती. इतकेच काय, पण गंभीर मतभेद तितक्याच गंभीर आणि प्रगल्भ भाषेत नोंदवून एकमेकांविषयी अत्यंत आदरही व्यक्त केल्याचे इतिहास सांगतो.
मग अशा स्थितीत त्यांचे अनुयायी म्हणवणाऱ्या नेत्यांनी अथवा कार्यकर्त्यांनी या दोन्ही महान नेत्यांमधले उच्चतम गुण घेऊ नयेत?? की कायम उथळ पाण्याला खळखळाट फार अशाच पद्धतीने खालच्या पातळीवर येऊन टीका करावी?? यातून काय साध्य होणार?? या टीकेमुळे या नेत्यांची उंची कमी होईल?? की त्यांनी सांगितलेले प्रामाणिक तत्त्वज्ञान खोटे ठरेल, असे या दोन्ही नेत्यांच्या अनुयायांना वाटते??… तसे वाटत असेल तर ती त्यांची चूक आहे. या दोन्ही नेत्यांची उंची अथवा त्यांचे तत्वज्ञान कोणत्याही उथळ टीकेमुळे बाधित होणार नाही. कारण इतिहासात तसे प्रमाण नाही!!
राहुल गांधी स्वतःला महात्मा गांधींचे अनुयायी म्हणवून घेतात, पण महात्मा गांधींनीच सावरकरांविषयी लिहिलेले उद्गार ते नाकारतात. संभाजी भिडे गुरुजी स्वतःला छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे अनुयायी म्हणवतात, मग छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज अथवा स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी कोणाला त्यांच्या आई-वडिलांच्या मूळावरून हिणवल्याचे उदाहरण आहे का??, एवढी साधी गोष्ट संभाजी भिडे गुरुजी यांच्यासारख्या वयाने ज्येष्ठ असलेल्या कार्यकर्त्याला समजू नये??
महात्मा गांधी काय किंवा स्वातंत्र्यवीर सावरकर काय, दोघांच्या विषयी काही गंभीर मतभेद असणे समजू शकते. त्यांच्या विशिष्ट मतांवर, धोरणावर, कार्यकर्तृत्वावर गंभीर स्वरूपाची कोणतीही टीका अत्यंत सभ्य भाषेत करणे हेही समजू शकते. किंबहुना या दोन्ही नेत्यांचे राजकीय – सामाजिक कार्याचे परखड आणि सटीक विश्लेषणही समजू शकते. ते त्या दोन्ही नेत्यांनी स्वीकारलेही होते.
पण म्हणून सावरकरांचा कथित माफीनामा त्यांच्या उत्तुंग कार्यकर्तृत्वावर बोळा फिरवणारा ठरविणे हे जितके चूक आहे, तितकेच महात्मा गांधींचे वडील मुस्लिम होते, असा “जावई शोध” लावणे हे देखील चूक आणि अप्रस्तुत आहे. कायद्याच्याच काय पण इतिहासाच्या कसोटीवर देखील हे खरे उतरू शकत नाही. म्हणूनच संभाजी भिडे गुरुजींनी राहुल बुद्धीने केलेली महात्मा गांधींवरची टीका स्वीकारार्ह नाही. ती हिंदुत्ववादी तत्त्वज्ञानाला बाधा आणणारी आहे.
Rahul Gandhi’s and bhide guruji’s shallow criticism on savarkar and gandhiji unacceptable equally
महत्वाच्या बातम्या
- ‘’तीन महिन्यांत देशभरात खेलो इंडियाची एक हजार केंद्र सुरू होणार’’, क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांची घोषणा!
- रोहित पवार शरदनिष्ठांसाठी “संजय राऊतांच्या” भूमिकेत; पण प्रचार प्रमुख डॉ. अमोल कोल्हे आहेत कुठे??
- उत्तर प्रदेशच्या शाळांमध्ये मोहरमच्या सुट्ट्या रद्द, योगी सरकारने जारी केले आदेश
- अतिक अहमदचा नातेवाईक मोहम्मद अहमदला अटक; खंडणी आणि मारहाण प्रकरणी पोलिसांची कारवाई