नाशिक : राहुल गांधींच्या तोंडून नेहरुंचे “री ब्रॅण्डिंग”; गांधीजींच्या सत्यशोधनाच्या जॅकेटचे “री फिटिंग”!!, असेच सत्य राहुल गांधींनी दिलेल्या नव्या मुलाखतीतून समोर आले. Rahul Gandhi
दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे पुत्र माजी खासदार संदीप दीक्षित यांना राहुल गांधींनी विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत राहुल गांधींनी पंडित जवाहरलाल नेहरूंचे “री ब्रॅण्डिंग” केले. जवाहरलाल नेहरू यांच्या विषयी अनेक उदगार त्यांनी काढले. जवाहरलाल नेहरू हे काही राजकारणी नव्हते, तर ते सत्यशोधक होते. जवाहरलाल नेहरूंनी सगळ्यांना राजकारण करायला शिकवले नाही. त्यांनी सर्व भारतीयांना भीतीशी लढा द्यायला आणि सत्याबरोबर उभे राहायला शिकवले. त्यांनी भारतीयांना दडपशाहीच्या विरोधात लढा देऊन स्वातंत्र्य जिंकायला शिकवले. सत्याचा शोध हा जवाहरलाल नेहरूंचा सर्वोच्च वारसा आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
त्यापुढे देखील राहुल गांधींनी जवाहरलाल नेहरूंचे “री ब्रँडिंग” केले. जवाहरलाल नेहरूंवर त्यांच्या वडिलांचा खूप प्रभाव होता. गांधीजींना जेव्हा इंग्लंडमध्ये ट्रेन मधून बाहेर फेकण्यात आले होते, त्यावेळी मोतीलालजी आणि जवाहरलाल यांनी अलाहाबाद मध्ये जाऊन ट्रेन मधून ब्रिटिशांना बाहेर फेकले होते, ही फारच कमी लोकांना माहिती असलेली गोष्ट आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
वास्तविक महात्मा गांधींना दक्षिण आफ्रिकेतल्या पीटरमेरिट्सबर्ग स्टेशनवर ट्रेन मधून बाहेर फेकले होते. पण राहुल गांधी नेमका तो संदर्भ विसरले आणि त्यांनी महात्मा गांधींना इंग्लंडमध्ये ट्रेनमधून बाहेर फेकले होते, असे सांगितले. संदीप दीक्षित यांच्यासारख्या नाणावलेल्या उच्चशिक्षित नेत्याने देखील राहुल गांधींना त्या संदर्भात टोकले नाही.
जवाहरलाल नेहरू यांच्या विषयी इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या मुखातून बरेच काही ऐकले, पण ते राजकारणी या स्वरूपात कधीच नव्हते. कारण नेहरू स्वतः राजकारणी नव्हते. इंदिराजी राजकारणी नव्हत्या. माझे वडीलही राजकारणी नव्हते. आम्ही कोणीच स्वतःला राजकारणी समजले नाही. कारण नेहरूंनी आम्हाला सत्याचा शोध घ्यायला शिकवले. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात कुठलीही कृती कराल, तर ती सत्याला अनुसरून असली पाहिजे, असे नेहरू म्हणत असल्याचे इंदिरा गांधींनी सांगितले होते. त्यामुळे घरामध्ये नेहरूंच्या विषयीची चर्चा कायम राजकारणाच्या पलीकडची असायची. म्हणूनच नेहरूंचा सगळ्यात मोठा वारसा हा सत्याचा शोध असल्याचे मी म्हणतो, असे राहुल गांधींनी संदीप दीक्षित यांना या मुलाखतीत सांगितले.
नेमके हेच राहुल गांधींच्या Rahul Gandhi तोंडून नेहरूंचे करण्याचा प्रयत्न झाला आणि त्यातही गांधीजींच्या मूलभूत तत्वाचे जॅकेट नेहरूंच्या अंगावर फिट करण्याचा प्रयत्न झाला.
– नेहरू – गांधी भिन्नता
वास्तविक महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू हे एका मुशीत घडलेले नेते नव्हते. त्यांच्यात सर्व प्रकारची भिन्नता होती. काँग्रेसच्या छताखाली दोन स्वतंत्र व्यक्तीमत्व असलेले मोठे राजकीय नेते म्हणून गांधी आणि नेहरू आयुष्यभर एकत्र जरूर वावरले. अगदी पंतप्रधान करण्यासाठी महात्मा गांधी यांनी आपले सर्व प्रकारचे वजन सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ऐवजी नेहरूंच्या पारड्यात जरूर टाकले. पण म्हणून या दोन्ही नेत्यांमध्ये वैचारिक अभिन्नता होती असे मानणे किंवा तसे सांगणे ऐतिहासिक दृष्ट्या चूक आणि इतिहासाशी प्रतारणा आहे. नेमकी तीच राहुल गांधींनी केलीय.
सत्याचा शोध, सत्यान्वेषण, सत्याचे प्रयोग शब्द पंडित जवाहरलाल नेहरूंशी कधीच संलग्न नव्हते, तर ते महात्मा गांधींशी संलग्न असणारे शब्द होते. महात्मा गांधींच्या या सत्तेच्या प्रयोगाविषयी अनेकदा पंडित नेहरूंनी गंभीर मतभेद व्यक्त केले होते. त्याच्या चर्चा पुस्तकांमधून आणि त्यावेळच्या वर्तमानपत्रांमधून समोरही आल्या होत्या. गांधीजींची काही बाबतीतली सामाजिक प्रतिगामी धोरणे पंडित नेहरूंना अजिबात मान्य नव्हती. आधुनिक विज्ञानाच्या आधारे भारत देश उभा राहिला पाहिजे, ही पंडित नेहरूंची महात्मा गांधींपेक्षा वेगळी धारणा होती. त्यांनी त्यानुसारच देशांमध्ये संस्था उभारल्या आणि आपल्या परीने देश पुढे न्यायचा प्रयत्न केला होता. महात्मा गांधींचे नाव राजकीय दृष्ट्या सोयीचे म्हणून नेहरूंनी ते कायम घेतले, पण गांधीजींचे सर्वच्या सर्व विचार त्यांनी अजिबात अंमलात आणले नाहीत. उलट ते अनेकदा गुंडाळून ठेवले.
पण आज नेहरूंचे री ब्रँडिंग करताना राहुल गांधींनी नेहरूंच्या आधुनिक विज्ञाननिष्ठ विचारांचा गजर केला नाही, त्यांनी देशासाठी उभारलेल्या आधुनिक संस्थांचा उल्लेख केला नाही, तर गांधींशी संलग्न असलेल्या शब्दांचा वापर करून नेहरुंचे री ब्रॅण्डिंग केले. शिवाय नेहरुंचे री ब्रँडिंग करताना इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि स्वतःचेही तसेच री ब्रँडिंग मध्येच घुसवायचा प्रयत्न केला. त्या पलीकडे राहुल गांधींच्या मुलाखतीत दुसरे काही नव्हते.