राहुल गांधींकडून नरेंद्र मोदींची इंदिरा गांधींची टक्केवारीत तुलना; पण नातू आजीकडून का काही शिकेना??, असा सवाल विचारायची वेळ राहुल गांधींच्या आजच्या लोकसभेतल्या भाषणातून समोर आली.
Operation Sindoor वरल्या चर्चेत राहुल गांधींनी लोकसभेमध्ये जोरदार भाषण केले. त्यांनी नेहमीप्रमाणे मोदी सरकारला घेरले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या क्रेडिट घेण्याच्या घाई वरून पुन्हा पुन्हा तेच तेच प्रश्न सरकारला विचारले. पण त्यावेळी राहुल गांधींनी पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना इंदिरा गांधींशी केली. नरेंद्र मोदींमध्ये दम असेल, तर डोनाल्ड ट्रम्प खोटं बोलताय हे त्यांनी लोकसभेमध्ये येऊन सांगावं. इंदिरा गांधींनी जसं अमेरिकन अध्यक्षाला एक्सपोज केला होता, तसं मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना expose करावं, असं आवाहन राहुल गांधींनी मोदींना दिले. नरेंद्र मोदी जर इंदिरा गांधीं सारखे असतील, अगदी त्यांच्यात इंदिरा गांधींचे 50 % जरी धैर्य असेल, तरी मोदी लोकसभेत येऊन डोनाल्ड ट्रम्प खोटारडे असल्याचे सांगतील, असा टोला राहुल गांधींनी मोदींना हाणला. त्यावेळी समोरच्या बाकांवर मोदी उपस्थित नव्हते.
नवा फक्त एक मुद्दा
लोकसभेमध्ये राहुल गांधींचे भाषण तर जोरदार झाले, पण त्यामध्ये इंदिरा गांधींशी मोदींची केलेली तुलना या खेरीज दुसरा नवा मुद्दा नव्हता. त्यामुळे राहुल गांधींच्या भाषणाची इंदिरा गांधी आणि मोदी यांच्या तुलनेपुरती जरी चिकित्सा केली तरी काही वेगळी वस्तूस्थिती समोर आली. इंदिरा गांधींनी अमेरिकन अध्यक्षांना एक्सपोज केले होते, हे खरेच. पण बांगलादेशाचे युद्ध दीर्घकाळ चालले होते. आज जेवढे डोनाल्ड ट्रम्प बडबड करतात आणि स्वतःच सगळ्या जगासमोर स्वतःचे हसे करून घेतात, तसे रिचर्ड निक्सन करत नव्हते. त्यांनी इंदिरा गांधींना दुय्यम लेखण्याची चूक केली होती, ती इंदिरा गांधींनी कृतीतून धडा शिकवून निक्सन यांना मान्य करायला लावली होती.
जयशंकर यांनी खोडला ट्रम्पचा दावा
इकडे मोदींनी अजून जरी डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव घेऊन ते खोटे बोलतात असे सांगितले नाही, तरी त्यांच्या सरकारचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी लोकसभेमध्येच डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा खोडून काढला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या एकही फोन कॉल झाला नव्हता भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या शस्त्रसंधीमध्ये अमेरिकेशी व्यापार हा मुद्दा आला नव्हता, असे जयशंकर यांनी वारंवार स्पष्ट केले होते. पण राहुल गांधींना हे सत्य नरेंद्र मोदी यांच्याच तोंडून ऐकायचे असल्यामुळे त्यांनी मोदींची तुलना इंदिरा गांधींशी करून मोदींचे एक वेगळे कर्तृत्व मान्य करून टाकले.
पण एवढे सगळे करताना स्वतः राहुल गांधी आपल्या अशी कडून मात्र कुठलाच राजकीय धडा शिकू शकले नाहीत. अन्यथा त्यांनी सरकारला वेगळ्या पातळीवरून पूर्णपणे वेगळे प्रश्न विचारून अडचणीत आणले असते. मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणाची खऱ्या अर्थाने पोल खोलली असती. Howdy Modi – Namaste Trump असल्या उपक्रमांनी देशाचे परराष्ट्र धोरण ठरत नसते, हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले असते. हा विषय मल्लिकार्जुन खर्गे यांनी राज्यसभेत जरूर मांडला, पण त्याचा प्रभाव माध्यमांमध्ये दिसला नाही, तो प्रभाव राहुल गांधींनी स्वतः भाषण करून निर्माण करून दाखविला असता, पण हे सगळे ते आजीकडून राजकारण शिकले असते, तरच शक्य झाले असते. ते आजीकडून राजकारण नीट शिकले नाहीत म्हणून तर मोदी सरकारला वेगवेगळ्या मुद्द्यांवर स्वतःची सुटका करून द्यायची संधी मिळाली. काँग्रेसवर प्रतिहल्ला करून सरकारच्या उणीवा झाकायची संधी मिळाली.
कुठे इंदिरा गांधी, अन्…
अशी संधी इंदिरा गांधींनी कधीच उपलब्ध करून दिली नसती. त्यांनी मोदी सरकारला आपल्या अचूक वक्तव्यांमधून आणि अचूक कृतींमधून जेरीस आणले असते. नरेंद्र मोदींना आपल्या सरकारच्या चुका मान्य करायला लावल्या असत्या. पण राहुल गांधींना हे जमले नाही. त्यांना भाषणातून नवे मुद्दे समोर आणता आले नाहीत. राजकीय कृतीतून मोदी सरकारला अडचणीत आणता आले नाही. त्यामुळे त्यांचे लोकसभेतले भाषण नुसतेच आक्रमक झाले, पण तेच मोदी सरकारला स्वतःची सुटका करून घेण्याची संधी निर्माण करणारे ठरले.
Rahul Gandhi compared Narendra Modi with Indira Gandhi in Loksabha
महत्वाच्या बातम्या
- पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड हाशिम मुसासह 3 दहशतवादी ठार; ऑपरेशन महादेवअंतर्गत कारवाई
- DR Congo : पूर्व DR काँगोमध्ये चर्चवर दहशतवादी हल्ला, 38 मृत्यू; लोक प्रार्थना सभेला उपस्थित होते
- ज्यांनी पाकिस्तान विरोधात काहीच केले नाही, ते मोदी सरकारला विचारताहेत तुम्ही आणखी पुढे का गेला नाहीत??; परराष्ट्र मंत्र्यांचा लोकसभेत हल्लाबोल
- Turkey : तुर्कीने दोन सर्वात शक्तिशाली बॉम्बची चाचणी घेतली; 970 किलो वजनाचे GAZAP आणि NEB-2 घोस्ट बॉम्ब