विशेष प्रतिनिधी
पुणे : पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणीत अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द करण्यात आला असून त्याला आता बालसुधारगृहात राहावे लागणार आहे. दारूच्या नशेमध्ये भरधाव वेगाने गाडी चालवत या अल्पवयीन आरोपीने दोघांचा जीव घेतला होता. अटक झाल्यानंतर त्याला 15 तासांमध्येच जामीन मंजूर करण्यात आला होता. आता बाल न्याय मंडळाने त्याचा जामीन रद्द केला आहे. अल्पवयीन आरोपी हा सज्ञान आहे की नाही हे पोलिस ठरवतील असंही बाल न्याय मंडळाने म्हटलं आहे.Pune Porsche Car Accident Case; The bail of the minor accused is cancelled
- पोर्शे कार अपघातातील आरोपीव अल्पवयीन नव्हे, तर प्रौढ आरोपीचाच खटला चालणार; पोलीस आयुक्तांची ग्वाही!!
हॉटेलमधील 48 हजारांचे बिलही सादर केले
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे पोलिसांनी बुधवारी सकाळी अल्पवयीन आरोपीला कोर्टात हजर केलं. युक्तिवाद करताना पोलिसांनी मुलगा दारू प्यायल्याचे कोर्टाला पटवून देण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी अल्पवयीन मुलाने कोझी किचन हॉटेलमध्ये भरलेलं 48 हजार रुपयांचे बिलही सादर केलं. याशिवाय आरोपीने केलेले कृत्य हे अत्यंत भीषण आहे, त्यामुळे त्याच्यावर खटला चालवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणीही पोलिसांनी केली. दुसरीकडे बचावपक्षाच्या वकिलांनी मुलगा अल्पवयीन असल्याचा युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने अखेर हा आदेश दिला.
नवीन कलमेही जोडली
पुण्यातील कल्याणीनगरमधील अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलावर दाखल गुन्ह्यात पोलिसांनी नव्या कलमाची वाढ केली आहे. त्यानंतर अल्पवयीन आरोपी मुलाने कोर्टात हजेरी लावली आहे. मद्यधुंद अवस्थेत कार चालवल्याप्रकरणी अल्पवयीन मुलावर 185 कलमाच्या अंतर्गत नव्याने गुन्हा दाखल करण्यात आला. याआधी त्याच्यावर कलम 304 अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र अल्पवयीन असल्याच्या कारणावरुन न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला होता. या मुलाला दुपारी 12 वाजता बाल हक्क कोर्टासमोर हजर करण्यात आले. तर आरोपी मुलाचे वडील विशाल अगरवाल यांना अटक करण्यात आली असून त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
अल्पवयीन वाहन चालवण्याबद्दल नियम काय सांगतात?
देशात, 16-18 वर्षे वयोगटातील तरुणांना 50cc पेक्षा कमी गिअरलेस दुचाकी चालवण्याची परवानगी आहे. पण पार्टीनंतर मद्यधुंद अवस्थेत ताशी 200 किलोमीटर वेगाने कार चालवू नये. मोटार वाहन कायदा, 1988 अन्वये अल्पवयीन व्यक्ती वाहन चालवताना पकडल्यास त्याच्या पालकाकडून 25,000 रुपये दंड वसूल केला जाईल. तसेच, 3 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. त्या अल्पवयीन व्यक्तीला वयाच्या 25 वर्षांपर्यंत कोणत्याही प्रकारचे वाहन चालविण्यास बंदी असेल.
पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणात अल्पवयीन व्यक्तीला काय शिक्षा होऊ शकली असती? बालगुन्हेगार आणि अल्पवयीन मुलांची प्रकरणे हाताळण्यासाठी बाल न्याय कायदा, 2000 लागू करण्यात आला. ज्या अंतर्गत देशभरात बाल न्याय मंडळ आणि बाल न्यायालयाची स्थापना करण्यात आली. डिसेंबर 2012 मध्ये निर्भया प्रकरणानंतर यामध्ये सर्वात महत्त्वाची दुरुस्ती करण्यात आली होती, ज्यानुसार 16 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या अल्पवयीन मुलाने जघन्य गुन्हा केल्यास त्याला प्रौढांप्रमाणेच वागणूक दिली जाईल.