विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडून झाल्यानंतर प्रियांका गांधी यांनी आज लोकसभेत राज्यघटनेवरील चर्चेत पहिले भाषण केले, हे भाषण 15 – 20 मिनिटांचेच होते, पण त्यातून काँग्रेस नेत्यांना नव्या “इंदिरा गांधी” आल्याचा भास झाला. काँग्रेस नेत्यांनी राहुल गांधींना सोडून प्रियांका गांधी यांच्या भोवती गर्दी केली.
भारतीय राज्यघटनेवरची विशेष चर्चा लोकसभेमध्ये आज सुरू झाली. सुरुवातीला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सरकारतर्फे भाषण करून चर्चेची सुरुवात केली. त्यानंतर काँग्रेसकडून प्रियांका गांधींचा नंबर लागला. प्रियांका गांधी वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्यानंतर पहिल्यांदाच लोकसभेत भाषणासाठी उठल्या, तेव्हा काँग्रेस खासदारांना नव्या “इंदिरा गांधी” आल्याचाच भास झाला.
राजनाथ सिंह यांच्या भाषणावर प्रियांका गांधींनी टीका केली. सत्ताधारी पक्षातले लोक 1931 मध्ये काय झाले नेहरूंनी काय केले वगैरे बोलत राहिले. आज देशातले वर्तमान काय सांगते, त्याबद्दल बोलायला हवे. सरकारने शेतकऱ्यांचा कामगारांचा महिलांचा सगळ्यांचा आवाज दाबून टाकला आहे. कुणाच्या मागे ईडी, कुणाच्या मागे सीबीआय लावले आहे. यातून राज्यघटनेची पायमल्ली होत आहे, पण त्याविषयी तोंड उघडायला सरकार पक्ष तयार नाही. सगळी जबाबदारी नेहरूंवर झटकून ते मोकळे होत आहेत, असे टीकास्त्र प्रियांका गांधी यांनी सोडले.
प्रियांका गांधींचे पहिले भाषण ऐकायला सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे हे राज्यसभेतून कामकाज सोडून लोकसभेच्या गॅलरीत येऊन बसले होते. प्रियांका गांधींचे भाषण संपताच सोनिया गांधी आणि खर्गे प्रेक्षक गॅलरीतून बाहेर पडले. त्यांच्या पाठोपाठ लोकसभेतले काँग्रेसचे खासदार देखील बाहेर पडले. या सगळ्यांनी प्रियांका गांधींच्या भाषणाची “एक्सलंट स्पीच” म्हणून स्तुती केली.
प्रियांकांनी पहिल्याच भाषणामध्ये सरकारचे कसे वाभाडे काढले, याचे वर्णन मल्लिकार्जुन खर्गे यांनी केले. बाकीच्या काँग्रेसच्या खासदारांनी खर्गे यांचीच री ओढली. राहुल गांधींनी सुद्धा प्रियांका गांधींच्या भाषणाची स्तुती केली. माझ्या लोकसभेतल्या कुठल्याही भाषणापेक्षा प्रियांकाने चांगले भाषण केले, असे राहुल गांधी म्हणाले. काँग्रेस खासदारांनी राहुल गांधींना सोडून प्रियांका गांधी यांच्या भोवती गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.
Priyanka Gandhi first speech in the Lok Sabha
महत्वाच्या बातम्या
- Tamil Nadu तामिळनाडूतील खासगी रुग्णालयास भीषण आग, 7 जणांचा मृत्यू
- BMC elections : बीएमसी निवडणुकीसंदर्भात झालेल्या बैठकीनंतर शिंदेंचं मोठे वक्तव्य, म्हणाले…
- One Nation One Election : विधेयकाला मोदी सरकारची मंजूरी, पण ते JPC कडे पाठवायची काँग्रेसची तयारी!!
- Dantewada : दंतेवाड्यात नक्षलवादी अन् सुरक्षा दलांमध्ये चकमक, सात माओवादी ठार