मराठी माध्यमांनी निर्माण केला न्यूनगंड; पंतप्रधान मोदींनी लावला त्याला सुरुंग!! असे काल दिल्लीत झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभात घडले. पण ते कुठल्याच मराठी माध्यमांच्या लक्षात आले नाही. मराठी वर्तमानपत्रांचे आणि माध्यमांचे मोठमोठे संपादक तिथे बसले होते, पण मोदींनी पवारांपुढे सरकवलेली खुर्ची आणि त्यांचा पाण्याने भरून दिलेला ग्लास यांच्या कहाण्या रंगवण्यात ते “बुडून” गेले होते. उरलेली मराठी माध्यमे संमेलनाध्यक्ष ताराभवाळकरांच्या भाषणात मोदींना दिलेल्या अप्रत्यक्ष टोल्यावर भाळली होती. पण त्यापलीकडे जाऊन मोदींनी केलेल्या भाषणाचा नेमका Political crux काय होता?? म्हणजेच “राजकीय इंगित” काय होते??, यावर मराठी माध्यमे प्रकाश टाकू शकली नाहीत. कारण या माध्यमांना पुरोगामी आणि फुरोगामी “पवार बुद्धीने” ग्रासले आहे. Narendra Modi
वास्तविक वर उल्लेख केल्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणातून मराठी माध्यमांनी मराठी माणसांमध्ये निर्माण केलेला न्यूनगंड पूर्णपणे दूर करून टाकला. मराठी माणूस अजून पंतप्रधान बनला नाही. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली तरी मराठी माणसाला दिल्लीत किंमत नाही. मराठी माणसाची दिल्लीच्या राजकारणावर छाप पडत नाही. मराठी माणसांची, नेत्यांची, खासदारांची किंवा कुठल्या मंत्र्यांची दिल्लीत लॉबी नाही. दक्षिणेतली राज्य आणि त्यांचे राज्यकर्ते दिल्लीत लॉबी करून आपापली कामे करून घेतात, पण मराठी खासदारांना आणि नेत्यांना अशी लॉबी करून कामे करून घेता येत नाहीत, हा न्यूनगंड मराठी माध्यमांनी किमान गेली ६० वर्षे तरी पोसला आणि जोपासला होता. त्याला कारणे देखील तशीच होती. परंतु ही कारणे खऱ्या अर्थाने मराठी माध्यमांनी कधी पुढेच आणली नव्हती किंवा ती स्वीकारली नव्हती.
मराठी माध्यमांनी नेहमीच दिल्लीत दोनच मराठी नेत्यांना “रेटून” पुढे केले, ते म्हणजे यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार. आणि अधून मधून प्रमोद महाजन यांनाही पुढे करण्यात मराठी माध्यमे आणि पत्रकारांनी धन्यता मानली होती. त्यापैकी प्रमोद महाजन आपले राजकीय कर्तृत्व पूर्णपणे सिद्ध होण्याआधीच निघून गेले. परंतु, यशवंतराव किंवा शरद पवार यांच्या बाबतीत तसे नव्हते. यशवंतराव आणि शरद पवार महाराष्ट्रातले खूप मोठे नेते होते, तरी दिल्लीत त्यांचे राजकीय कर्तृत्व फारच तोकडे पडले. दिल्लीतल्या कुठल्याच प्रभावी आणि बळकट नेत्याला यशवंतराव किंवा शरद पवार परिणामकारक याच्या आव्हान देऊ शकले नाहीत. जेव्हा काँग्रेसचे नेतृत्व करण्याची किंवा पंतप्रधानपदाची संधी आली, त्यावेळी यशवंतरावांनी कच खाल्ली. ते चरणसिंगांचे उपपंतप्रधान बनले, पण राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांनी पंतप्रधान पदाची दिलेली संधी नाकारली. त्यांना पंतप्रधान पदाचे आव्हान पेलता आले नाही.
“यशवंत शिष्य” शरद पवार तर आपल्या दिल्लीतल्या राजाकीय कारकीर्दीत आणखी घसरले. काँग्रेसच्या सगळ्याच पहिल्या फळीतल्या नेत्यांसमोर पवार नेहमी हरले. पूर्ण पराभूत झाले, याची कबुली स्वतः पवारांनीच अनेकदा दिली. नरसिंह राव यांच्यासमोर हरल्याची कबुली पवारांनी दोनच दिवसांपूर्वी पुन्हा एकदा देऊन टाकली. पण मराठी माध्यमांनी यशवंतराव आणि पवार यांचे हे तोकडे राजकीय कर्तृत्व कधी मनापासून मान्य केले नाही. त्या उलट या दोन्ही नेत्यांवर दिल्लीतल्या नेत्यांनी “अन्याय” केल्याची हाकाटी माध्यमे कायमच पिटत राहिली, जी राजकीय वस्तुस्थितीला धरून नव्हती. त्यामुळेच मराठी माणूस किंवा मराठी नेता देशाचा पंतप्रधान बनू शकला नाही, दिल्लीत मराठी माणसाला किंमत नाही वगैरे न्यूनगंड तयार झाला. कारण मराठी माध्यमांनी फक्त यशवंतराव + पवार या दिल्लीत सर्वोच्च पद मिळवण्यात अपयशी ठरलेल्या दोन नेत्यांचे चष्मे डोळ्यावर चढविले होते. त्यापलीकडे दिल्लीत अनेक मराठी माणसांनी कर्तृत्व गाजविले, त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले होते.
– डॉ. हेडगेवार यांचे उत्तुंग कर्तृत्व
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल केलेल्या भाषणातून मराठी माध्यमांनी निर्माण केलेली या न्यूनगंडालाच सुरुंग लावून टाकला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक हे एक “मराठी नेते” होते, याची आठवण मोदींनी सगळ्यांना करून दिली. संघाची स्थापना महाराष्ट्रात झाली. पण तिची व्याप्ती सुरुवातीला देशभर आणि नंतर जगभर पसरली. लाखो स्वयंसेवकांना मराठी माणसाने निर्माण केलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशसेवेची प्रेरणा दिली. त्या प्रेरणेतूनच आपण देशसेवेकडे आकर्षित झालो, हे मोदींनी जाहीरपणे सांगितले. आपल्या भाषणातून मोदींनी मराठी माणसाचे देशाच्या राजकारणात आणि समाजकारणामध्ये सर्वोच्च योगदान असल्याचे अधोरेखित केले. परंतु एका डोळ्यावर “यशवंत” आणि दुसऱ्या डोळ्यावर “शरद” अशा चष्म्याच्या काचा लावलेल्या मराठी माध्यमांना एका मराठी माणसाचे हे उत्तुंग कर्तृत्व दिसलेच नाही. मराठी माध्यमांनी डॉ. केशव बळीराम हेडगेवार या मराठी माणसाच्या उत्तुंग कर्तृत्वाकडे कधी निर्मळ आणि वास्तव दृष्टीने पाहिलेच नाही. त्यामुळेच त्यांनी दिल्लीत मराठी नेत्यांवर “अन्याय” झाल्याची फक्त हाकाटी पिटली. त्यातूनच त्यांनी मराठी माणसाला दिल्लीत किंमत नसल्याचा न्यूनगंड पोसला. जो कधीच सर्वस्वी खरा नव्हता.
ज्या दिवशी मराठी माध्यमे आपल्या डोळ्यांवरचा ‘यशवंत” आणि “शरद” काचांचा चष्मा काढून टाकतील, त्यादिवशी त्यांना मोदींच्या भाषणातले भाषणातला political crux म्हणजेच “राजकीय इंगित” समजून येईल, अन्यथा “पवार बुद्धीची” माध्यमे दिल्लीने मराठी माणसावर “अन्याय” केल्याचे जुनेच न्यूनगंडी रडगाणे गात बसतील!!
Prime minister Narendra Modi removed inferiority complex created by Marathi media
महत्वाच्या बातम्या
- अजित पवार गटात येण्यासाठी ब्लॅकमेलिंग,जितेंद्र आव्हाड यांच्या स्वीय सहायकाचा आरोप
- Naxalites : तब्बल १४ लाखांचा इनाम असलेल्या आशासह चार महिला नक्षलींचा खात्मा!
- Shahnawaz Hussain : नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही बिहार निवडणूक लढू आणि जिंकू – शाहनवाज हुसेन
- Rekha Gupta : दिल्लीत नवीन सरकारचे खाते वाटपही जाहीर ; मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्याकडे ५ विभाग