नाशिक : राहुल बाबांना (Rahul Gandhi) लोक उगाचच “सेक्युलर” समजतात, ते तर हिंदुत्ववादी मीडियाचे मोठे संवाहक निघाले!!, असे राहुल बाबांच्याच दोन कृतींमधून समोर आले. एकीकडे waqf सुधारणा बिलावर लोकसभेत भाषण न करून विरोधी पक्षनेते असलेल्या राहुल बाबांनी सेक्युलर नेत्यांच्या आणि सेक्युलर जमातीच्या शिव्या खाल्ल्या. त्यात हिंदुत्ववादी जमातीच्या लोकांनी तर राहुल बाबांबरोबर प्रियांका दीदींवर देखील आपला हात धुवून घेतला. राहुल बाबांनी आणि प्रियांका दीदींनी भाषण करो किंवा न करो, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतः संसदेत गैरहजर राहून waqf बिल मंजूर करवून घ्यायचे, ते करवून घेतलेच. त्यासाठी नवीन पटनाईक, जगन मोहन रेड्डी शरद पवार या सेक्युलर नेत्यांबरोबर “गेमा” केल्या. पण या सगळ्या नेत्यांच्या पलीकडे जाऊन राहुल बाबा हिंदुत्ववादी मीडियाचे मोठे संवाहक बनले. Waqf सुधारणा विधेयक मंजूर होताच भाजप मुस्लिमांच्या नंतर इतर छोट्या अल्पसंख्यांक समूहांना टार्गेट करेल, असे सांगताना राहुल बाबांनी चक्क Organiser मधला लेखाची बातमी शेअर केली आणि मोदी सरकारला टार्गेट केले.
एरवी Organiser मधल्या लेखाकडे कोणाचे लक्ष देखील गेले नसते. तो लेख छापून आला असता. हिंदुत्ववादी लोकांनी वाचला असता आणि त्याचा फारसा परिणाम देखील झाला नसता, पण राहुल बाबांनी Organiser मधल्या त्या लेखाची The Telegraph पेपरने छापलेली बातमी शेअर केली आणि कॅथोलिक चर्च कडे असलेली तब्बल 7 कोटी हेक्टर एवढी प्रचंड जमीन “बाहेर” आली. लोकांचे त्याकडे लक्ष वेधले. Waqf बोर्डाकडे असलेल्या जमिनीपेक्षा कितीतरी पटीने अधिक असलेली ही जमीन असल्याचे पाहून सगळ्यांचे डोळे विस्फारले. Waqf बोर्डावर जर कारवाई होऊ शकते, त्याचा हिशेब होऊ शकतो, तर कॅथोलिक चर्च कडे असलेल्या जमिनीचा हिशोब का होऊ नये??, waqf बोर्डातली जमीन ही जशी दानात मिळालेली असते, तशी कॅथॉलिक चर्च कडे इंग्रजांच्या काळात कवडीमोल भावाने आलेल्या जमिनीवर नेमके काय चालत??, त्याचे महसुली उत्पन्न कोण, कुठे आणि कसे खर्च करते??, याचा हिशेब मागायला काय हरकत आहे??, असे एकापाठोपाठ एक सवाल सगळ्या मीडियाला ग्रासून राहिले. हे सगळे राहुल बाबांमुळे घडले. पण नंतर तो लेख Organiser आपल्या वेबसाईटवरून हटवला.
एरवी Organiser मधल्या त्या लेखाकडे खरंच कोणाचे लक्ष देखील गेले नसते. कारण हिंदुत्ववादी मीडियाकडे लक्ष देण्याची आपल्या देशात पद्धत नाही. ती पद्धत साधारणपणे मोदी सरकार आल्यानंतर किरकोळ स्वरूपात सुरू झाली. पण ती कायम टिकलीच असे देखील नाही, पण जेव्हा राहुल बाबांसारख्या “सेक्युलर” इमेज असलेल्या नेत्यांनी टीका करण्यासाठी का होईना, पण हिंदुत्वामध्ये मीडियाकडे लक्ष द्यायला सुरुवात केल्यानंतर मात्र इतर सेक्युलर मीडियाला आणि सेक्युलर जमातीला देखील त्याकडे लक्ष द्यायला भाग पडले. या अर्थाने राहुल बाबा हिंदुत्ववादी मीडियाचे सगळ्यात मोठे संवाहक बनले!!