नाशिक : पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याचा भारताने अखेर सूड उगवलाच. पाकिस्तान व्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातल्या 9 शहरांमधल्या 21 दहशतवादी केंद्रांवर “पीन पॉईंटेड प्रिसिजन स्ट्राईक” केले. पण या सगळ्या स्ट्राईक नंतर देखील पाकिस्तानी संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी मात्र आवाज खाली आणून भारताने हल्ले थांबविले, तर पाकिस्तान तणाव कमी करायला तयार असल्याचे सांगितले. जे संरक्षण मंत्री भारताला अणुबॉम्बची धमकी देत होते, ते “प्रिसिजन स्ट्राईक” नंतर एकदम मवाळ झाले. भारताबरोबरचा तणाव कमी करायच्या बाता करू लागले. हे एकदम घडले कसे??, त्यांचे मतपरिवर्तन झाले कसे??, त्यांना एकदम शांततेचे महत्व पटले कसे??, या तिन्ही सवालांचे उत्तर भारताने केलेल्या “प्रिसिजन स्ट्राईक” मध्ये आहे.
– हा “प्रिसिजन स्ट्राईक” करण्यापूर्वी भारताने जगभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या देशांना त्याची कल्पना दिली होती. त्यामुळे प्रत्यक्ष स्ट्राईक नंतर जगातल्या कुठल्या देशाची प्रतिकूल प्रतिक्रिया उमटली नाही. पाकिस्तानचा मित्र चीनने फक्त “खेद” प्रकट केला. तुर्कस्तानच्या युद्धनौकेने कराची बंदरात टाकलेला नांगर वर काढला नाही.
– भारताने हा “प्रिसिजन स्ट्राईक” दहशतवादी केंद्रांवर केला. पाकिस्तानी लष्कर किंवा पाकिस्तानी नागरिक यांच्यावर केला नाही.
– या “प्रिसिजन स्ट्राईक” मध्ये भारताने नेमके किती दहशतवादी मारले याचा आकडा जाहीर केला नाही. पण या हल्ल्यात दहशतवादी मसूद अजहर आणि हाफिज सईद या दोघांचे 18 नातेवाईक आणि 6 म्होरके मारले. पण या दोघांना अजून तरी जिवंत ठेवले. यातून भारताने पुढच्या संभाव्य “प्रिसिजन स्ट्राईकचा” “ऑप्शन” “ओपन” ठेवला. पुढचा “प्रिसिजन स्ट्राईक”छोटा, मोठा की मध्यम याविषयी पाकिस्तानच्या मनात संशयाची पेरणी करून ठेवली.
– “प्रिसिजन स्ट्राईक”ची अधिकृत माहिती देताना भारताने पाकिस्तानी लष्कर, तिथले सरकार यावर कुठलेही प्रतिकूल भाष्य केले नाही. पाकिस्तानने दहशतवाद पुरस्कृत केला म्हणून आम्ही दहशतवादी केंद्र उद्ध्वस्त केली एवढेच ब्रीफिंग केले. “ऑपरेशन सिंदूर”ची अधिकृत माहिती देण्यासाठी कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह या दोन महिला अधिकाऱ्यांची निवड केली. त्यांनी “मोजून मापून” “ऑपरेशन सिंदूर”ची माहिती दिली.
– त्यामुळे पाकिस्तानला लष्करी प्रतिकाराची कारवाई करण्यासाठी कुठली संधीच उरली नाही. पाकिस्तानला उघडपणे लष्करी प्रतिकार करता आला नाही. कारण भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानी लष्करावर हल्लाच केला नाही.
– पण इथून पुढे पाकिस्तानी लष्कराने भारतीय सैन्या दलांवर कुठल्याही प्रकारचा उघड अथवा छुपा हल्ला केला, तर भारताला पाकिस्तानी सैन्य दलावर चढाई करायची आयती संधी मिळेल आणि मग भारताने जर प्रखर हल्ला केला, तर तो पाकिस्तानी सैन्य दल तो रोखू शकणार नाही, हे असिफ यांच्या ताबडतोब लक्षात आले.
– शिवाय पाकिस्तानी लष्कराने भारतीय सैन्य दलावर हल्ला केला, तर पाकिस्तानने विविध जागतिक आर्थिक संस्थांमध्ये आर्थिक मदतीसाठी केलेले अर्ज ताबडतोब कचऱ्याच्या डब्यात जातील. पाकिस्तानला कुठलेही आर्थिक पॅकेज किंवा बेल आउट वगैरे देण्याच्या कुणीही फंदात पडणार नाही. त्यानंतर पाकिस्तानचे आर्थिक हाल कुत्रेही खाणार नाही, हे लक्षात घेऊनच भारताला अणुबॉम्बची धमकी देणाऱ्या संरक्षण मंत्री ख्वाजा असिफ यांनी भाषा एकदम मवाळ केली.
– पण या सगळ्याचा अर्थ असा अजिबात नाही की, पाकिस्तान दहशतवादाला प्रोत्साहन देण्याचे थांबवले किंवा भारताविरुद्धचे छुपे युद्ध संपुष्टात आणले. उलट पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याच्या तोंडची मावळ भाषा ही पुढच्या धोक्याचा “संदेश” असू शकते. कारण समोर मैत्रीचा हात आणि पाठीमागे खंजीर ही पाकिस्तानची फितरत राहिली आहे. ती बदलणे शक्य नाही. पण भारताचा प्रतिकार बदलणे शक्य आहे. तो सध्या आक्रमकपणे सुरू आहे, तो तसाच ठेवावा लागेल. त्यामुळेच भारताने Operation sindoor अजून थांबविलेले नाही!!