विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केल्यानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी अनुक्रमे आक्रमक आणि निमआक्रमक भूमिका घेऊन राहुल गांधींना बॅकफूटवर ढकलले. त्यानंतर आता सावरकर मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी राहुल गांधी उद्धव ठाकरेंना मातोश्रीवर येऊन भेटणार असल्याच्या बातम्या मराठी प्रसारमाध्यमांनी दिल्या. त्याला विरोधी ऐक्याची व्यापक फोडणी दिली. Nehru Gandhi family leaders never visited any regional party leaders houses for political reasons
पण मूळात राहुल गांधी हे मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरेंना भेटणार, ही खरी बातमी होती की कोणी राजकीय पुडी सोडली होती??, याचाच तपास अजून लागायचा आहे. कारण नाना पटोले आणि संजय राऊत यांनी राहुल गांधी हे मातोश्रीवर येणार नसल्याचा खुलासा केला आहे. त्या ऐवजी के. सी. वेणुगोपाल हे मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरेंची चर्चा करणार असल्याच्या बातम्यांना त्यांनी दुजोरा दिला आहे.
गांधी परिवार प्रादेशिक नेत्यांकडे जात नाही
पण मुद्दा त्या पलीकडचा आहे, तो म्हणजे पण नेहरू – गांधी परिवारातील नेत्यांचा राजकीय अभ्यास केला, तर या परिवारातील कोणीही नेते एखाद दुसरा अपवाद वगळता प्रादेशिक नेत्यांच्या घरी गेले आणि त्यांना राजकीय समीकरणांसाठी भेटले, असे इतिहास अजिबात सांगत नाही. अर्थातच याला अपवाद एखाद्या महत्त्वाच्या नेत्याच्या निधनानंतर त्यांच्या घरी जाऊन सांत्वन भेट घेणे हा आहे.
इंदिराजी – बाळासाहेब भेट
खुद्द इंदिरा गांधी आणि बाळासाहेब ठाकरे यांची भेट झाली होती हे खरे. ती मुंबईत झाली होती. पण इंदिरा गांधींनी बाळासाहेबांना मुंबईच्या राजभवनात भेटीला बोलावले होते, हा इतिहास आहे. याचा अर्थ इंदिरा गांधी मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांना भेटल्या नव्हत्या. काँग्रेसच्या राजकारणातील सर्वोच्च नेते म्हणून प्रणव मुखर्जी हे राष्ट्रपती पदाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बाळासाहेबांना मातोश्रीवर येऊन भेटले होते. पण त्याआधी किंवा त्यानंतर काँग्रेसचा तेवढा बडा नेता मातोश्रीवर हजेरी लावून गेल्याचे उदाहरण नाही. बाकी शरद पवार, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटलांचे पती देवीसिंह शेखावत यांनी बाळासाहेबांच्या मातोश्रीवर जाऊन भेटी घेतल्या आहेत. ही उदाहरणे बाळासाहेब ठाकरे हयात असतानाची आहेत.
अमित शाह – नड्डा मातोश्रीवर
शिवसेना-भाजप युती असताना आणि अखंड शिवसेना असताना अमित शाह यांनी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी असताना मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरे यांच्याशी वाटाघाटी केल्या होत्या हे खरे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे देखील मातोश्रीवर येऊन गेले होते. पण उद्धव ठाकरेंनी भाजपशी संबंध तोडल्यानंतर भाजपचा राष्ट्रीय तर सोडाच, प्रादेशिक नेताही मातोश्रीवर गेलेला नाही.
उद्धव – आदित्य 10 जनपथवर
भाजप शिवसेना युती तोडून उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर देखील गांधी परिवारातील कोणीही नेता मातोश्रीवर फिरकलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. उलट उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी 10 जनपथ येथे जाऊन सोनिया आणि राहुल गांधी यांची भेट घेतल्याची दोन उदाहरणे आहेत. महाविकास आघाडी सत्तेवर असतानाही गांधी परिवारातील नेत्यांनी 23 जानेवारी रोजी बाळासाहेबांना ट्विटरवर श्रद्धांजली वाहिल्याची उदाहरणे देखील सापडत नाहीत.
प्रादेशिक नेत्यांना तोकडेच महत्त्व
प्रादेशिक नेत्यांना विशिष्ट पातळीपर्यंतच महत्त्व द्यायचे हे गांधी परिवाराचे राजकीय आणि “मानसिक” धोरण आहे. ते राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्यांच्या घरी जाऊन भेटतात. पण ती पातळी देखील त्यांनी पक्षाध्यक्ष या पातळीवरची ठेवली आहे. उदाहरणच द्यायचे झाले, तर सोनिया गांधी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या घरी गेल्याचे उदाहरण नाही, तर राहुल गांधी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या घरी ते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत म्हणून जातात. राहुल गांधी हे शरद पवारांच्या दिल्लीतल्या 6 जनपथ या निवासस्थानी एकदा गेले होते. पण वयाने ज्येष्ठ असलेल्या नेत्यांच्या घरी जाणे एवढ्याच पुरता तो अपवाद होता. त्यात फार मोठी राजकीय घटना नव्हती.
बातम्यांच्या पुड्या का सोडाव्या लागतात??
या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी मातोश्रीवर येण्याच्या बातम्यांच्या पुड्या सोडणे याचा वेगळा अर्थ आहे. राहुल गांधींना सावरकर मुद्द्यावर बॅकफूटवर ढकलता येऊ शकते, तर बाकीच्या मुद्द्यांवरही राहुल गांधींना डिवचता येते, असा काही राजकीय नेत्यांचा होरा आहे. अदानी प्रकरणात राहुल गांधींना बॅकफूटवर ढकलण्याचा प्रयत्न शरद पवारांनी केलाही होता. पण तो यशस्वी ठरला नाही. म्हणून मग राहुल गांधी मातोश्रीवर येणार. सावरकर मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार, ही पुडी सोडण्यात आली आहे का??, हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि याचे उत्तर नाना पटोले आणि संजय राऊत यांनी परस्पर देऊन टाकले आहे. राहुल गांधी मातोश्रीवर येणार नाहीत आणि उद्धव ठाकरेंची चर्चा करणार नाहीत, हे ते उत्तर आहे!!… याचा अर्थ ज्या कुणी की त्या बातमीची पुडी सोडली आहे, ते इथेही अदानी मुद्द्यासारखेच फेल गेले आहेत.
Nehru Gandhi family leaders never visited any regional party leaders houses for political reasons
महत्वाच्या बातम्या
- Ambedkar Jayanti : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या अनुयायांचे निळ्या रंगाशी नेमके नाते काय?
- राज्यघटनेच्या शिल्पकाराला, कोट्यवधीसाठी महामानव असलेल्या डॉ. आंबेडकरांना ४ दशके उशीरा
- राहुल गांधी – पवारांसह सर्व विरोधकांच्या तोंडी एकीची भाषा, पण मग बेकी होतीये तरी का??
- विधवांसाठी ‘गंगा भागीरथी’ असा शब्द वापरण्यावरून राष्ट्रवादीच्याच सुप्रिया सुळे व रूपाली चाकणकर आमनेसामने…