अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी त्यांना पदाची शपथ दिली.
विशेष प्रतिनिधी
वॉशिंग्टन डीसी : डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी त्यांना पदाची शपथ दिली. त्यांच्यासोबत जेडी वेंस यांनी उपाध्यक्षपदाची शपथ घेतली. यासोबतच अमेरिकेत ट्रम्प युग सुरू झाले आहे. ट्रम्प ४ वर्षांनी कॅपिटल हिलला परतले आहेत.
ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले. पंतप्रधान मोदींनी इंस्टाग्रामवर लिहिले की, माझे प्रिय मित्र डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतल्याबद्दल अभिनंदन. आपल्या दोन्ही देशांच्या फायद्यासाठी आणि जगाचे चांगले भविष्य घडविण्यासाठी मी पुन्हा एकदा एकत्र काम करण्यास उत्सुक आहे. पुढील यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा.
यावेळी ट्रम्प म्हणाले की, आजपासून आपला देश पुन्हा समृद्ध होईल आणि जगभरात आपला अधिक आदर केला जाईल. आम्ही यापुढे कोणत्याही देशाला आमचा गैरफायदा घेऊ देणार नाही. आपले सार्वभौमत्व परत मिळवायचे आहे. आमची सुरक्षा पुनर्संचयित केली जाईल. आमची पहिली प्राथमिकता असे राष्ट्र निर्माण करणे आहे जे अभिमानी, समृद्ध आणि स्वतंत्र असेल.
राष्ट्राध्यक्ष म्हणून आपल्या पहिल्या भाषणात ट्रम्प म्हणाले, ‘आम्ही आमच्या दक्षिण सीमेवर राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करतो.’ अमेरिकेच्या मेक्सिकोच्या दक्षिण सीमेवर घुसखोरी रोखण्यासाठी ट्रम्प यांनी सैन्य पाठवण्याची घोषणा केली आहे. , त्यांनी सांगितले की बेकायदेशीर स्थलांतरितांना ते जिथून आले होते तिथेच परत सोडले जाईल.