2024 च्या लोकसभा निवडणुकीचा मतदानाचा आजचा शेवटचा टप्पा पार पडल्यानंतर येणाऱ्या एक्झिट पोल डिबेट मधून काँग्रेसने कालच “एक्झिट” जाहीर केली. त्यांचे कुठलेही प्रवक्ते एक्झिट पोल डिबेट मध्ये सामील होणार नाहीत, असे काँग्रेसने धोरणात्मकरित्या जाहीर केले. अर्थातच कुठल्या डिबेटमध्ये सामील व्हायचे आणि कुठल्या डिबेट मध्ये सामील व्हायचे नाही, हा पूर्णपणे राजकीय पक्ष म्हणून काँग्रेसचा अधिकार आहे. याविषयी दुमत असण्याचे कारण नाही. पण ज्या लोकशाहीचे प्राण वाद – संवाद, विसंवाद आणि सुसंवाद यामध्ये असतात, त्यामधून “एक्झिट” घेऊन काँग्रेस लोकशाही कशी काय वाचवू शकेल??, हा सवाल तयार झाला आहे. How Congress Can Save Democracy by Taking “Exit” From Exit Poll Debate
काँग्रेसने एक्झिट पोल डिबेट मधून “एक्झिट” घेताना काही विशिष्ट कारणे दिली आहेत. त्यामध्ये प्रत्यक्षात मतदानाचा निकाल मतदान यंत्रांमध्ये बंद झाला असताना उगाचच वृत्तवाहिन्यांचा टीआरपी वाढवण्यासाठी नुसती चर्चा करण्यात मतलब नाही. त्यामुळे काँग्रेस एक्झिट पोल डिबेट मध्ये सामील होणार नाही, असे सगळ्यात महत्त्वाचे कारण आहे. लोकशाही तत्त्वानुसार हे कारण देणेही काँग्रेसचा अधिकार आहे. त्यामध्ये देखील दुमत असण्याचे कारण नाही. पण ज्या एक्झिट पोलचे रिझल्ट्स थोड्याफार प्रमाणात प्रत्यक्ष रिझल्टशी जुळतात किंवा बहुतांश रिझल्टशी जुळतच नाहीत, अशा रिझल्टवर बोलायला न येणे यातून काँग्रेसला अपेक्षित असलेली लोकशाही कशी काय वाचू शकते??
… की काँग्रेसचे एक्झिट पोल डिबेट मधून “एक्झिट” घेणे याचे दाखवायचे कारण वेगळे आणि प्रत्यक्षातले कारण वेगळे आहे??, हा कळीचा सवाल आहे.
एक्झिट पोल मध्ये अर्थातच कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील??, याचे नेमक्या आकड्याचे प्रोजेक्शन दाखवले जाईल. त्यावर विविध पक्षांच्या नेत्यांचे मत मागितले जाईल. त्यांच्या यशापयशाची प्रत्यक्ष निकाल आधी चर्चा होईल. जी सर्वसाधारणपणे प्रत्येक निवडणुकीनंतर मतमोजणीच्या आधी घडतच असते. अशा एक्झिट पोल डिबेटमध्ये तसे बिलकुलच विशेष नसते. हा गेल्या किमान 7 निवडणुकांचा तरी अनुभव आहे. मग असे असताना काँग्रेसने एक्झिट पोल डिबेट मधून बाहेर पडण्याचे कारण काय??… की त्यांची आपल्या पक्षाचे पोल प्रोजेक्शन ऐकण्याची तयारी नाही?? जर उद्याच्या एक्झिट पोल मधून काँग्रेसच्या परफॉर्मन्स विषयी फारच नकारात्मक निकाल आला, तर आपल्या नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे मनोधैर्य निकाला आधीच खचून जाण्याची भीती काँग्रेस नेत्यांना वाटते?? की पोल प्रोजेक्शन दाखवताना वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांच्या अँकर्स कडून असे टोकदार प्रश्न येतील की ज्यामुळे पक्षाचा परफॉर्मन्स कसा कमी झाला किंवा कुठे उंचावला??, या संदर्भात नावांसकट उत्तरे द्यावी लागतील??, त्यापेक्षा त्या एक्झिट पोल डिबेट मध्ये न गेलेलेच बरे असा विचार जर काँग्रेस नेतृत्वाने केला असेल, तर तोही लोकशाहीतला अधिकार म्हणून मान्य करावा लागेल.
पण मग तरी महत्त्वाचा प्रश्न उरतोच तो म्हणजे काँग्रेस एक्झिट पोल मधून एक्झिट घेवो किंवा प्रत्यक्ष सहभागी होवो, प्रत्यक्ष निवडणुकीच्या निकालात काँग्रेस पक्ष हाताचा पंजा या निवडणूक चिन्हावर किती मते मिळवेल??, या प्रश्नातच या प्रश्नाच्या उत्तरातच खऱ्या अर्थाने काँग्रेसचा परफॉर्मन्स दडला आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीचा नेमका आकडा नीट लक्षात घेतला, तर भाजपला त्या निवडणुकीत 229,076,879 (22 कोटी 90 लाख) मते मिळाली होती. पक्षाच्या मतांची टक्केवारी 37.43 % होती, त्याउलट काँग्रेसच्या मतांची टक्केवारी 19.52 % होती आणि काँग्रेसला 119,495,214 (11 कोटी 94 लाख) मते मिळाली होती. 2019 च्या आकड्यांच्या निकषावर 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलचा अंदाज कोणी लावला, तर काँग्रेसला आपला परफॉर्मन्स तब्बल 18 % नी उंचावावा लागेल आणि भाजपवर मात करण्यासाठी किमान आणखी 11 कोटी मते मिळवावी लागतील.
मग एवढ्या मोठ्या प्रमाणात मते वाढविण्यास काँग्रेस यशस्वी ठरली की अयशस्वी ठरली??, यावर आजचे एक्झिट पोल डिबेट असणार आहे का??, ते तसे असले, तर काँग्रेसला नेमक्या आकड्यांवर आधारित आपल्या परफॉर्मन्सवर उत्तरे देणे अडचणीचे ठरणार आहे का???, हा सगळ्यात कळीचा सवाल आहे आणि इथेच काँग्रेसने एक्झिट पोल डिबेटमधून घेतलेल्या “एक्झिट”चे राजकीय रहस्य दडले आहे!!