• Download App
    नॅशनल हेराल्ड केस : राहुल गांधी यांची ED चौकशी सुरू; काँग्रेसचे जोरदार "ED बुस्टर डोस शक्तीप्रदर्शन"!!ED probe into Rahul Gandhi begins; Congress's strong "ED booster dose demonstration

    नॅशनल हेराल्ड केस : राहुल गांधी यांची ED चौकशी सुरू; काँग्रेसचे जोरदार “ED बुस्टर डोस शक्तीप्रदर्शन”!!

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांच्या सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीच्या चौकशी पूर्वी काँग्रेसने “ईडी राजकीय बुस्टर डोस शक्तिप्रदर्शन” करून घेतले आहे. राहुल गांधी यांची ईडी चौकशी सध्या राजधानीतल्या मुख्यालयात सुरू असून सुमारे डझनभर अधिकारी त्यांची चौकशी आणि तपास करत आहेत. यासाठी भलीमोठी प्रश्नावली राहुल गांधी यांना आधीच पाठवली असून त्याची उत्तरे राहुल गांधी त्यांच्या वकिलांच्या ताफ्यासह ईडीच्या कार्यालयात हजर राहून देत आहेत. ED probe into Rahul Gandhi begins; Congress’s strong “ED booster dose demonstration

    परंतु त्याआधी काँग्रेसने आपला शक्तिप्रदर्शनाचा “ईडी प्रयोग” नवी दिल्लीत करून घेतला आहे. राहुल गांधी यांच्या समवेत काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते राजस्थान आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री, काँग्रेसचे सगळे खासदार रूट मार्च करत ईडी कार्यालयापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. परंतु, पोलिसांनी गाडीतून फक्त राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनाच ईडीच्या कार्यालयात जाऊ दिले आहे. पोलिसांनी बॅरिकेट लावून काँग्रेस कार्यकर्त्यांना हटवल्यानंतर काही काळ काँग्रेस कार्यकर्त्यांची पोलिसांशी झडप झाली. राहुल गांधी यांच्या ईडीच्या चौकशीच्या निमित्ताने काँग्रेस संघटनांनी एकवटून देशभरातल्या 25 राज्यांमधल्या राजधान्यांमधील ईडी कार्यालयांसमोर केंद्र सरकार विरुद्ध आंदोलन केले आहे.


    Rahul Gandhi : राहुल गांधींची काठमांडूत चिनी राजदूत हाऊ यान्की बरोबर टुंगरपार्टी!!


    ईडीच्या मुख्यालयात राहुल गांधींच्या हजेरीपूर्वी प्रियांका गांधी वाड्रा त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेल्या होत्या. तेथून राहुल – प्रियांका काँग्रेस मुख्यालयात गेले आणि पक्षाच्या नेत्यांची बैठक घेतली. बैठकीनंतर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यासह पक्षाचे खासदार आणि इतर नेते पायी चालत ईडी कार्यालयाकडे रवाना झाले होते. पोलिसांनी बॅरिकेड्स लावून काँग्रेसचा मोर्चा थांबवला. नेत्यांना पुढे जाऊ दिले नाही. राहुल गांधी प्रियांकांसोबत कारने ईडीच्या मुख्यालयात पोहोचले.

    ईडी कार्यालयाजवळ थ्री-लेयर सुरक्षा व्यवस्था आहे. काँग्रेसचा मोर्चा पहिल्या सर्कलजवळ पोलिसांनी रोखला होता. येथे कार्यकर्त्यांची पोलिसांशी झटापटही झाली.

     देशाची मालमत्ता विकली नाही : सुरजेवाला

    नॅशनल हेराल्डमध्ये कोणताही घोटाळा झालेला नाही. नॅशनल हेराल्ड कंपनीने यंग इंडिया कंपनीची थकबाकी माफ करून कर्मचाऱ्यांचे पगार दिले आहेत. आम्ही भाजप सरकारप्रमाणे भारतातील सरकारी मालमत्ता विकल्या नाहीत, असे शरसंधान रणदीप सुरजेवाला यांनी साधले आहे.

    विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया

    • अशोक गेहलोत : शांततापूर्ण मोर्चा काढण्यात सरकारला काय अडचण आहे?
    • भूपेश बघेल : तुम्ही या शरीराचा नाश करू शकता, पण विचारांना कैद करू शकत नाहीत.
    • दिग्विजय सिंह : मोदी घाबरतात तेव्हा ते ईडीला पुढे करतात.
    • सचिन पायलट : केंद्र सरकार एजन्सीचा गैरवापर करत आहे.
    • शिवसेना नेते संजय राऊत : राहुल गांधींवरील कारवाई बेकायदेशीर आहे. भाजपच्या विरोधात बोलणाऱ्यावर कारवाई केली जाते.
    • रॉबर्ट वाड्रा : राहुल गांधी सर्व बिनबुडाच्या आरोपातून निर्दोष मुक्त होतील आणि सत्याचा विजय होईल.
    • कार्ती चिदंबरम : मला बहुतेक वेळा ईडीच्या नोटिसा मिळाल्या आहेत. मी ईडी प्रकरणातील काँग्रेसचा तज्ज्ञ आहे.

    प्रश्नांची यादी मोठी

    ईडीच्या सूत्रांनुसार आज राहुल यांची सहायक संचालक स्तरावरील अधिकाऱ्याकडून चौकशी होत आहे. या तपासादरम्यान, राहुल गांधी त्यांचा मोबाइल फोन वापरू शकणार नाहीत. किंवा त्यांच्यासोबत कोणत्याही राजकीय नेत्यांना ईडी कार्यालयात प्रवेश दिलेला नाही.
    राहुल गांधींना चौकशीसाठी ईडीने नॅशनल हेरला आणि यंग इंडिया कंपनी यांच्यातील मनी लॉन्ड्रिंग संदर्भात प्रश्नांची मोठी यादी तयार केली आहे. सुमारे दोन डझन प्रश्न ईडीचे अधिकारी विचारत आहेत. राहुल गांधी आणि त्यांच्या मातोश्री सोनिया गांधी यांची यंग इंडिया कंपनीत 38 – 38% हिस्सेदारी आहे. उर्वरित काँग्रेस नेते मोतीलाल व्होरा आणि ऑस्कर फर्नांडिस यांच्याकडे आहे. या दोन्ही नेत्यांचे निधन झाले आहे.

    ईडीने सोनियांनाही बोलावले

    ईडीने काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांना 23 जून रोजी चौकशीसाठी बोलावले आहे. यापूर्वी 8 जून रोजी त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते, मात्र 1 जून रोजी त्या कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या होत्या. त्यामुळे त्या हजर होऊ शकल्या नाहीत. रविवारी कोरोनामुळे सोनियांची प्रकृती खालावली. त्यांच्यावर दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    काय आहे प्रकरण?

    1938 मध्ये काँग्रेस पक्षाने असोसिएट जर्नल्स लिमिटेड (AJL) ची स्थापना केली. या अंतर्गत नॅशनल हेराल्ड हे वृत्तपत्र प्रकाशित करण्यात येऊ लागले. त्यावेळी एजेएलवर 90 कोटींहून अधिक कर्ज होते आणि ते दूर करण्यासाठी आणखी एक कंपनी स्थापन करण्यात आली होती. ज्याचे नाव यंग इंडिया लिमिटेड होते. यामध्ये राहुल आणि सोनियांचा वाटा 38 – 38 % होता.

    एजेएलचे 9 कोटी शेअर्स यंग इंडियाला देण्यात आले. या बदल्यात यंग इंडिया एजेएलचे दायित्व भरेल, असे सांगण्यात आले, परंतु जास्त भागीदारीमुळे यंग इंडियाला मालकी हक्क मिळाले. एजेएलच्या दायित्वांची पूर्तता करण्यासाठी काँग्रेसने दिलेले 90 कोटींचे कर्जही नंतर माफ करण्यात आले.

    55 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप

    2012 मध्ये सुब्रमण्यम स्वामी यांनी सोनिया आणि राहुल यांच्याविरोधात कोर्टात केस दाखल केली होती. यामध्ये स्वामींनी गांधी परिवारावर 55 कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप केला होता. मात्र, या प्रकरणात ईडीची एंट्री 2015 मध्ये झाली.

    या प्रकरणात आतापर्यंत काय झाले?

    •  1 नोव्हेंबर 2012 रोजी सुब्रमण्यम स्वामी यांनी दिल्ली न्यायालयात खटला दाखल केला, ज्यामध्ये सोनिया-राहुल यांच्याव्यतिरिक्त मोतीलाल व्होरा, ऑस्कर फर्नांडिस, सुमन दुबे आणि सॅम पित्रोदा यांना आरोपी करण्यात आले होते. हे सर्व काँग्रेसशी संबंधित आहेत.
    •  26 जून 2014 रोजी मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट यांनी सोनिया-राहुल गांधींसह सर्व आरोपींविरुद्ध समन्स जारी केले.
    •  1 ऑगस्ट 2014 रोजी ईडीने या प्रकरणाची दखल घेतली आणि मनी लाँड्रिंगचा गुन्हा नोंदवला.
    •  मे 2019 मध्ये ईडीने या प्रकरणाशी संबंधित 64 कोटींची मालमत्ता जप्त केली.
    •  19 डिसेंबर 2015 रोजी दिल्ली पतियाळा कोर्टाने या प्रकरणात सोनिया, राहुल गांधींसह सर्व आरोपींना जामीन मंजूर केला.
    •  9 सप्टेंबर 2018 रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने याप्रकरणी सोनिया आणि राहुल गांधींना दणका दिला होता. प्राप्तिकर विभागाच्या नोटिशीविरोधातील याचिका न्यायालयाने फेटाळून लावली होती.
    •  काँग्रेसने सुप्रीम कोर्टातही याला आव्हान दिले, पण 4 डिसेंबर 2018 रोजी कोर्टाने सांगितले की, इन्कम टॅक्सची चौकशी सुरूच राहील. मात्र, पुढील सुनावणीपर्यंत कोणताही आदेश निघणार नाही.
    •  आज 13 जून 2022 रोजी ईडीचे अधिकारी राहुल गांधी यांची ईडीच्या मुख्यालयात प्रत्यक्ष चौकशी करत आहेत.

    ED probe into Rahul Gandhi begins; Congress’s strong “ED booster dose demonstration

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य