नाशिक : शिक्षणाचे खासगीकरण करून प्रायव्हेट कॉलेजेस काढली काँग्रेसच्या नेत्यांनी, पण आता राहुल गांधी आणि सुखदेव थोरात म्हणतात, पब्लिक एज्युकेशन सिस्टीम आणा!!
त्याचे झाले असे :
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या महाड चवदार तळे सत्याग्रहाच्या वर्धापन दिनानिमित्त राहुल गांधींनी विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांच्याशी संवाद साधला. त्या संवादामध्ये देशातल्या जातनिहाय जनगणनेपासून ते शिक्षण व्यवस्थेपर्यंत वेगवेगळ्या विषयांवर राहुल गांधी आणि थोरात यांनी साधक बाधक मते व्यक्त केली. डॉ. सुखदेव थोरात हे सोनिया गांधींच्या नेतृत्वाखालच्या यूपीए सरकारच्या काळात विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात UGC चे अध्यक्ष होते.
राहुल गांधी आणि सुखदेव थोरात यांच्या चर्चेमध्ये जे वेगवेगळे विषय समोर आले, त्यामध्ये प्रामुख्याने जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा राहुल गांधींनी लावून धरला. संघ आणि भाजपने दलित, आदिवासी आणि ओबीसी यांचा इतिहास मिटवून टाकला आहे. जातनिहाय जनगणना केल्याशिवाय खऱ्या अर्थाने सामाजिक न्याय प्रस्थापित करता येणार नाही. दिल्लीच्या शाळांमध्ये आणि कॉलेजमध्ये जाणाऱ्या अप्पर कास्ट मुलांना देशातली कास्ट सिस्टीमच आणि कास्ट डिस्क्रिमिनेशन दिसतच नाही. पण कास्ट डिस्क्रिमिनेशन आहे. त्यामुळे जातनिहाय जनगणना केलीच पाहिजे. जातनिहाय जनगणनेला विरोध करणे हा देशद्रोह मानला पाहिजे, असे राहुल गांधी म्हणाले.
त्यानंतर या दोघांच्याही चर्चेत देशातल्या शिक्षण व्यवस्थेचा मुद्दा आला. देशातल्याशिक्षण व्यवस्थेमध्ये नेमक्या कोणत्या सुधारणा कराव्यात??, असा सवाल राहुल गांधींनी सुखदेव थोरात यांना केला. त्यावर त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या काळातील पब्लिक एज्युकेशन सिस्टीम आणली पाहिजे, असे मत व्यक्त केले. सरकारी शाळा, सरकारी कॉलेज आणि सरकारी विद्यापीठे ही सिस्टीम राबवली पाहिजे. काळाच्या ओघात शिक्षणाचे खाजगीकरण झाले, त्यामुळे देशात आज 50 पेक्षा जास्त टक्के विद्यापीठे खासगी असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदविले. पब्लिक एज्युकेशन सिस्टीम आणून शिक्षण सर्वांसाठी खुले केले पाहिजे. कुठल्याही सरकारने शिक्षणाला पैसा कमी पडतो, असे म्हणता कामा नये, यावर सुखदेव थोरात यांनी भर दिला. सुखदेव थोरात यांनी मांडलेल्या मुद्द्यावर राहुल गांधींनी काही मत व्यक्त केले नाही.
– खासगीकरणात काँग्रेस नेते आघाडीवर
पण राहुल गांधी ज्या काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि सध्या त्या पक्षाचे नेते असल्याने लोकसभेतले विरोधी पक्षनेते म्हणून काम करतात, त्याच काँग्रेसच्या नेत्यांनी 1980 ते 1990 च्या दशकात बहुजनांना शिक्षणाचे दरवाजे खुले करण्याच्या नावाखाली शिक्षणाचे खासगीकरण केले. काँग्रेसच्याच बहुसंख्य नेत्यांनी इंजीनियरिंग, मेडिकल, बीएड, डीएड कॉलेज काढली. ते दहा-पंधरा वर्षांमध्ये शिक्षण सम्राट बनले. तालुकास्तरांवर काँग्रेस नेत्यांमध्येच खासगी शिक्षण संस्था काढण्याची स्पर्धा लागली. नंतर तर अनेकांनी खासगी विद्यापीठे काढली. भरमसाठ डोनेशन आणि कॅपिटेशन फी घेऊन तिथे प्रवेश दिले गेले. काँग्रेस नेत्यांच्या कुठल्याही खासगी शिक्षण संस्थांमध्ये कुठलेही आरक्षण त्यांनी लागू होऊ दिले नव्हते.
पण राहुल गांधी आणि सुखदेव थोरात या दोघांनी चर्चेत मात्र देशात पब्लिक एज्युकेशन सिस्टीम आणायची वकालत केली. त्यामुळे काँग्रेस नेत्यांच्या बोलण्यातली आणि प्रत्यक्ष कृतीतली परस्पर विरोधी विसंगती समोर आली.
Congress privatized education system but now Rahul Gandhi advocates public education system
महत्वाच्या बातम्या