विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : जातनिहाय जनगणनेचा निर्णय केंद्रातील मोदी सरकारने घेतला पण काँग्रेसने त्याचे श्रेय राहुल गांधींच्या टी-शर्ट च्या खिशात घातले. त्या पाठोपाठ आज राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या मुख्यमंत्र्यांची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली पण त्याचे श्रेय देखील काँग्रेस नेत्यांनी राहुल गांधींना दिले. आता राहुल गांधी फक्त शॅडो पंतप्रधान जाहीर व्हायचे राहिलेत, एवढी वस्तुस्थिती यातून समोर आली.
मोदी सरकारने देशात जातनिहाय जनगणनेचा मुद्दा उचलून धरत त्या संदर्भातला निर्णय घेतला 2021 मध्ये जनगणना होणे अपेक्षित असताना त्यावेळी कोरोना महामारीने जगभरासह भारतात थैमान घातले होते त्यामुळे पुढची तीन वर्षे जनगणना टळली. आता जी जनगणना होईल त्याच्यामध्ये जात हा निकष देखील असेल, असे मोदी सरकारने जाहीर केले. गेले काही महिने राहुल गांधी जातनिहाय जनगणनेचा मुद्दा लावून धरत होते. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत आणि नंतरच्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी जातनिहाय जनगणनेचा मुद्दा पेटवला होता पण सगळ्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा पराभव झाला. तरी देखील मोदी सरकारने जातीनिहाय जनगणनेचा निर्णय घेतल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी त्याचे श्रेय राहुल गांधींना दिले.
आज मोदींनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या मुख्यमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. त्यामध्ये 20 राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित होते त्यात देशभरातल्या वेगवेगळ्या राज्यांमधल्या विकास कामांचा आढावा घेणे हा मुख्य अजेंडा होता.
पण काँग्रेसचे नेते प्रमोद तिवारी यांनी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीचे श्रेय देखील राहुल गांधींच्या टी-शर्टच्या खिशात घातले. राहुल गांधींनी केंद्र सरकारवर दबाव वाढवला. त्यामुळे मोदी निदान मुख्यमंत्र्यांना ओळखू तरी लागले, नाही तर ते कुठल्याच राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विचारत नव्हते. राहुल गांधींच्या दबावामुळे कदाचित आज त्यांनी मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली, असा दावा प्रमोद तिवारी यांनी केला.
मोदी सरकारच्या वेगवेगळ्या निर्णयांचे श्रेय राहुल गांधींच्या टी-शर्टच्या खिशात घालायच्या काँग्रेस नेत्यांच्या पवित्र्यामुळे राहुल गांधी आता फक्त शॅडो पंतप्रधान जाहीर व्हायचे राहिलेत.