नाशिक : बैल गेला अन् झोपा केला, या मराठी म्हणीचा प्रत्यय आज आला. महाराष्ट्र विधानसभेने अख्खे जनसुरक्षा विधेयक संमत केले, त्यावेळी काँग्रेसच्या सदस्यांनी त्याच्या विरोधात थोडीफार भाषणे केली, पण त्याला कसून विरोध का केला नाही??, अशी विचारणा करणारी पत्रे काँग्रेस हायकमांडने महाराष्ट्रातल्या नेत्यांना पाठवलीत. पण हे सगळे विधेयक संमत झाल्यानंतर घडले. विधेयक संमत होण्यापूर्वी काँग्रेस हायकमांडला कुठली जाग आली नव्हती. जनसुरक्षा विधेयकावर आपण काय भूमिका घ्यायची?, यावर काँग्रेसच्या केंद्रीय पातळीवर कुठलीही चर्चा झाली नव्हती.
फडणवीस सरकारने महाराष्ट्रातले जनसुरक्षा विधेयक पावसाळी अधिवेशनात मंजूर करून घेतले. महायुतीकडे प्रचंड बहुमत असल्याने काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी किंवा उद्धव ठाकरेंची शिवसेना यांनी विरोध करूनही काही उपयोग झाला नाही. अर्थातच या पक्षांच्या आमदारांनी विधेयकाच्या विरोधात फक्त विधानसभेत भाषणे केली. त्यात काही सूचना केल्या. त्यातल्या काही सूचना फडणवीस सरकारने मान्य केल्या. पण या सगळ्या प्रक्रियेत काँग्रेसच्या 16 आमदारांनी फडणवीस सरकारने मांडलेल्या जनसुरक्षा विधेयकाला कसून किंवा कडाडून विरोध केला नाही, म्हणून काँग्रेस हायकमांड नाराज झाले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे एकमेव आमदार विनोद निकोले यांनी अधिकृतपणे संबंधित विधेयकाच्या विरोधात मत नोंदवले. तसे काँग्रेसच्या कुठल्याच आमदाराने केले नाही म्हणून काँग्रेसचे केंद्रीय नेते नाराज झाले. पण त्याआधी मार्क्सवाद्यांनी काँग्रेसकडे याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. मार्क्सवाद्यांच्या बौद्धिकामुळे काँग्रेस हायकमांडचे एकदम “मतपरिवर्तन” झाले आणि त्यांनी आपल्याच पक्षात self goal करून घेतला.
– विजय वडेट्टीवारांना नोटीस
काँग्रेस हायकमांडने महाराष्ट्र विधिमंडळातले काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांना कारणे दाखवा नोटीस धाडली. जनसुरक्षा विधेयक संमत होत असताना तुम्ही शांत का बसलात??, या विधेयकाला कडाडून विरोध का केला नाही??, मतदानाच्या वेळी काँग्रेसच्या सगळ्या आमदारांनी विरोधी मते का नोंदविली नाहीत?? या सवालांची उत्तरे द्या, असे त्या नोटीशीत नमूद केले आहे.
वास्तविक जनसुरक्षा विधेयक हा विषय नवा नव्हता. काँग्रेसच्या राज्यांनी सुद्धा तो आधीच वेगवेगळ्या पद्धतीने मंजूर करून ठेवला होता. काँग्रेसच्या केंद्रीय नेत्यांनी त्याबद्दल झारखंडच्या सरकारला किंवा आधीच्या छत्तीसगड सरकारला कुठले विचारणा केली नव्हती किंवा कारणे दाखवा नोटीस धाडली नव्हती. पण महाराष्ट्रात फक्त 16 आमदार असलेल्या काँग्रेसने आक्रमक भूमिका घ्यायला हवी होती ती घेतली नाही म्हणून कारणे दाखवा ही नोटीस धाडली.
– राहुल गांधींना नोटीस नाही
लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी waqf सुधारणा विधेयकावरच्या चर्चेची लोकसभेत सुरुवात करणे अपेक्षित होते. पण त्यांनी ती सुरुवात केली नाही. त्याऐवजी त्यांनी लोकसभेतील उपनेते गौरव गोगोई यांना चर्चेची सुरुवात करायला सांगितले. पण waqf सुधारणा विधेयकासारख्या अत्यंत महत्त्वाच्या विधेयकावर तुम्ही लोकसभेतले विरोधी पक्ष नेते म्हणून चर्चेच्या सुरुवात का केली नाही?, याची कारणे दाखवा अशी कुठलीही नोटीस काँग्रेसच्या केंद्रीय नेत्यांनी राहुल गांधींना धाडली नाही. पण महाराष्ट्रात संख्यात्मक पातळीवर दुबळ्या झालेल्या काँग्रेसच्या नेत्यांना मात्र जनसुरक्षा विधेयकाला कसून आणि कडाडून का विरोध केला नाही??, याची कारणे दाखवा अशी नोटीस धाडली. पण जनसुरक्षा विधेयकावर मार्क्सवाद्यांच्या नादी लागून काँग्रेसने आपल्याच नेत्यांना नोटीस धाडून self goal करून घेतला.
Congress High command sent notice to Vijay wadettiwar over janasuraksha bill
महत्वाच्या बातम्या
- Chief Minister : गुंजवणी सिंचन प्रकल्पाच्या कामाला गती द्या, मुख्यमंत्र्यांचे आदेश
- केंद्र सरकारकडून समोसा, जिलेबी, लाडूवर आरोग्य मंत्रालयाचा इशारा नाही; पीआयबीने अफवांचा केला पर्दाफाश
- Bombay Stock : बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इमारत उडवून देण्याची धमकी, चार आरडीएक्स बाँब ठेवल्याचा मेल
- जयंत पाटलांचा “अडथळा” सरताच पवारांच्या घरातच पदांची वाटणी; मुख्य सचिव पदी रोहित पवारांची वर्णी; अख्खी राष्ट्रवादी पवार कुटुंबाच्या सावटाखाली!!