विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : काँग्रेसवर भांडवलदारांनी हजार कोटी रुपयांच्या देणग्यांचा वर्षाव केला तरीही पक्षाच्या नेतृत्वाने भांडवलदारांविरुद्धचा आवाज मोठा ठेवला. पंतप्रधान मोदींनी सगळा देश अदानी + अंबानींना विकायला काढला, असे टीकास्त्र राहुल गांधींनी सोडले, पण याच भांडवलदारांकडून काँग्रेसने देणग्या स्वीकारायला नकार दिला नाही उलट काँग्रेसच्या देणग्यांमध्ये 320 % वाढ झाली, जी पक्षाने नाकारली नाही.
भाजपाला तब्बल ३,९६७.१४ कोटी रुपये देणगी स्वरुपात मिळाले आहेत. भाजपाच्या २०२३-२४ च्या वार्षिक लेखापरीक्षण अहवालातून (ऑडिट) ही माहिती समोर आली आहे. निवडणूक आयोगाने सोमवारी जाहीर केलेल्या वार्षिक अहवालानुसार भाजपला २०२२-२३ मध्ये २,१२०.०६ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या होत्या. २०२३-२४ मध्ये या देणग्या जवळपास दुप्पट झाल्या आहेत. भाजपासह इतर पक्षांना देखील भरघोस देणग्या मिळाल्या.
सर्वाधिक देणग्या मिळालेल्या पक्षांमध्ये भाजपानंतर काँग्रेस दुसऱ्या नंबरवर आहे. काँग्रेसला २०२३-२४ मध्ये १,१२९ कोटी रुपये देणगी स्वरुपात मिळाले आहेत. २०२२-२३ च्या तुलनेत यात तब्बल ३२० % वाढ झाली आहे. २०२२-२३ मध्ये भाजपाला २६८ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या होत्या.
काँग्रेसला मिलालेल्या एकूण देणग्यांपैकी ७३ % टक्के हिस्सा हा निवडणूक रोख्यांचा आहे. म्हणजेच काँग्रेसला ८२८.३६ कोटी रुपये हे निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून मिळाले आहेत. २०२२-२३ मध्ये या पक्षाला १७१.०२ कोटी रुपये निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून मिळाले होते. दुसऱ्या बाजूला काँग्रेसचा निवडणुकीवरील खर्च देखील वाढला आहे. काँग्रेसने २०२२-२३ मध्ये निवडणुकींवर १९२.५५ कोटी रुपये खर्च केले होते. तर २०२३-२४ मध्ये काँग्रेसने निवडणुकीवर ६१९.६७ कोटी रुपये खर्च केले.
लोकसभा निवडणुकीच्या काही महिने आधी सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोखे योजना रद्द केली होती. २०२३-२४ हे निवडणूक रोखे योजनेचं अखेरचं वर्ष होतं. या वर्षापर्यंत सर्वच पक्षांनी निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून देणग्या स्वीकारल्या. या योजनेचा सर्वाधिक फायदा भाजपालाच मिळाला आहे. एप्रिल २०१९ पासून ही योजना रद्द होईपर्यंत निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून भाजपाला ६,०६० कोटी रुपये मिळाले. या योजनेच्या माध्यमातून देशभरातील सर्व पक्षांना मिळालेल्या एकूण देणग्यांपैकी अर्धा हिस्सा एकट्या भाजपाचा होता. तर, काँग्रेस व तृणमूल काँग्रेसला या योजनेच्या माध्यमातून एक हजार कोटींहून अधिक पैसे मिळाले होते. तृणमूलला १,६०९ कोटी आणि काँग्रेसला १,४२१ कोटी रुपये मिळाले होते.
भाजपाला निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून १,६८५.६२ कोटी रुपये मिळाले आहेत. भाजपाला मिळालेल्या एकूण देणग्यांपैकी ४३ टक्के हिस्सेदारी निवडणूक रोख्यांची आहे. २०२२-२३ मध्ये भाजपाला निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून १२९४.१४ कोटी रुपये मिळाले होते.