नाशिक : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये मोठा फटका बसल्यानंतर काँग्रेसने संघटनात्मक सुधारणा करण्याऐवजी आता थेट निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्याचा “डाव” आखला आहे. काँग्रेसचे “गरुड” म्हणे, आता निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवणार असून ते मतदान घोटाळा सुद्धा शोधून काढणार आहेत. काँग्रेसच्या या “गरुड” टीमचे नेतृत्व दुसरे तिसरे कोणी नव्हे, तर थेट लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी करणार आहेत. त्यामुळे पुढच्या निवडणुकीत कोणत्याही स्थितीमध्ये काँग्रेसला अपयश येता कामा नये याची “व्यवस्था”च ही “गरुड” टीम करणार आहे.
महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा फटका बसल्यानंतर काँग्रेसमध्ये महामंथन सुरू झाले होते. त्यातून पक्ष संघटनेमध्ये कुठली सुधारणा करावी, पक्षामध्ये लोकशाही खऱ्या अर्थाने रुजवावी, निर्णय प्रक्रियेमध्ये कार्यकर्त्यांना संधी द्यावी, जुन्या जाणत्या नेत्यांना पुन्हा ऍक्टिव्हेट करावे, एकाच घराण्याची तोंडपूजा करण्यापेक्षा काँग्रेस संघटना बळकट करून जनतेपर्यंत जावे, अशा कुठल्या फारशा सूचना त्या महामंथनातून समोर आल्याच्या बातम्या कुठे दिसल्या नाहीत, पण त्याऐवजी काँग्रेस एक “ईगल टीम” नेमणार आणि ही टीम निवडणूक व्यवहार निवडणूक प्रक्रिया यांच्यावर लक्ष ठेवणार असल्याची बातमी आली.
निवडणूक विषयक कामकाज हे खरे तर कुठल्याही पक्षाच्या “लीगल टीमचे” काम, पण त्याऐवजी काँग्रेसने “ईगल टीम” नेमावी अशी सूचना पक्षाच्या प्रोफेशनल रिंगचे अध्यक्ष आणि पक्षाच्या डेटा अनालिटिक्सचे प्रमुख प्रवीण चक्रवर्ती यांनी केली. तिला त्यांनी मुद्दाम “ईगल टीम” असे नाव दिले आणि ते राहुल गांधींना खूप आवडले म्हणून त्यांनी स्वतःच या टीमचे नेतृत्व करायचे ठरवले. “गरुडासारखी नजर” असलेली ही टीम आता इथून पुढच्या सगळ्या निवडणुकांवर “लक्ष” ठेवून राहणार आहे.
या गरुडांच्या टीम मध्ये महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नितीन राऊत, काँग्रेसचे कोषाध्यक्ष अजय माकन, ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह, अभिषेक मनु सिंघवी, प्रवीण चक्रवर्ती, पवन खेरा, गुरदीप सिंह सप्पल आणि छल्ला वामशी चंद रेड्डी यांचा समावेश आहे.
काँग्रेसची “गरुड टीम” कशी काम करणार?
“गरुड टीम” प्रथम महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदार याद्यांमध्ये झालेल्या कथित घोळाचा छडा लावण्याचे काम करेल. त्यानंतर समिती ५ फेब्रुवारी रोजी दिल्लीत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर लक्ष ठेवेल. निवडणूक आयोगाकडे निःपक्षपणे निवडणुका घेण्याची संविधानिक जबाबदारी असते. परंतु, मागील काही काळात तसे घडले नाही. हरियाणा, महाराष्ट्र आणि इतर राज्यांमधील निवडणुकांमध्ये तफावत झाल्याची आम्हाला शंका आहे, म्हणूनच पक्षाने ईगल समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला, असे पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्यांनी निदर्शनास आणले पण स्वतःचे नाव सांगायला त्यांनी नकार दिला.
काँग्रेसने कोणते आरोप केले?
हरियाणा विधानसभा निवडणुकीत अपयश आल्यानंतर काँग्रेसने ईव्हीएममध्ये छेडछाड झाल्याचा आरोप केला होता. भाजपाने रचलेलं हे षडयंत्र असून आम्हाला हा निकाल मान्य नाही, असं काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी म्हटलं होतं. ईव्हीएममध्ये फेरफार झाल्याचा आरोप करत राजकीय पक्षाने जनादेश स्वीकारण्यास नकार देण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यावेळी काँग्रेसचे संपर्क प्रमुख जयराम रमेश म्हणाले, हा निकाल राज्यातील प्रत्यक्ष परिस्थितीच्या विरोधात आहे. हरियाणातील जनतेला सत्तेत बदल आणि परिवर्तन हवे होते. या परिस्थितीत आज जाहीर झालेला निकाल स्वीकारणं आम्हाला शक्य नाही. आमच्या उमेदवारांनी काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. आम्ही ते निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न करू.
महाराष्ट्रात मतदारसंख्या अचानक कशी वाढली?
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतही दारुण पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर काँग्रेसने मतदार यादीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. २९ नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सहा दिवसांनी काँग्रेसच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं होतं. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील मतदारांची संख्या अचानक १३ टक्के कशी वाढली, असा प्रश्न त्यांनी निवडणूक आयोगाला विचारला होता. काँग्रेसच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात मतदार यादीत समाविष्ट केलेल्या ३९ लाख मतदारांचा कच्चा डेटा मागितला होता.
काँग्रेसच्या आरोपांना निवडणूक आयोगाचं प्रत्युत्तर
दरम्यान, २४ डिसेंबर रोजी निवडणूक आयोगाने पत्र लिहून सांगितले की, महाराष्ट्रात ४८ लाख ८१ हजार ६२० मतदारांची वाढ झाली आणि ८ लाख ३९१ मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली, ज्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान एकूण ४० लाख ८१ हजार २२९ मतदार वाढले आहेत. निवडणूक आयोगाने सांगितले की, लोकप्रतिनिधी कायद्यातील दुरुस्तीनंतर, १८ वर्षांच्या नवीन मतदार नोंदणीसाठी १ जानेवारी, १ एप्रिल, १ जुलै आणि १ ऑक्टोबर या चार तारखा देण्यात आल्या होत्या. यामध्ये १८ ते १९ वर्ष वयोगटातील आठ लाख ७२ हजार ९४ मतदार आणि २० ते २९ वयोगटातील १७ लाख ७४ हजार ५१४ मतदारांचा समावेश आहे.
राहुल गांधी काय म्हणाले होते?
केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिल्यानंतरही काँग्रेसच्या नेत्यांचे समाधान झाले नाही. १५ जानेवारी रोजी काँग्रेसच्या नवीन मुख्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी राहुल गांधी यांनी आरोप केला की, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काहीतरी घोटाळा झाला आहे. त्यांनी असाही आरोप केला की, आपल्या निवडणूक पद्धतीत पारदर्शकतेचा अभाव आणि अनेक गंभीर समस्या आहेत. गेल्या वर्षीच्या दोन्ही निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात १ कोटी मतदारांची वाढ कशी होऊ शकते??, असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला होता.
त्यामुळे इथून पुढच्या सगळ्या निवडणुकांवर काँग्रेसचे “गरुड” बारकाईने लक्ष ठेवून त्यातले घोटाळे शोधण्यात वेळ घालवणार आहेत. पक्ष संघटना किंवा त्या अनुषंगिक विषयांकडे दुर्लक्ष झाले तरी चालेल, पण “गरुडाच्या नजरेने” निवडणूक घोटाळे शोधून काढून काँग्रेससाठी निवडणूक जिंकायचा मार्ग प्रशस्त करण्याचा या “गरुडांचा” इरादा आहे. त्यामुळे निवडणूक आयोग आणि बाकीचे सगळे पक्ष “चिंताक्रांत” झाले आहेत!!
Congress egale team to keep watch on elections
महत्वाच्या बातम्या
- म्हणे, गांधी, सुभाष बाबूंबद्दल सावरकर खोटे बोलले, सावरकरांना लोकशाही नको होती; अरुण शौरींचे अनर्गल प्रलाप!!
- दिल्लीत लाडक्या बहिणीला ८ मार्चपासून २५०० रुपये; पंतप्रधान नरेंद्र मोदींची गेम चेंजर घोषणा!!
- DRDO : ओडिशाच्या किनाऱ्यावर DRDOने हवाई संरक्षण प्रणालीची केली यशस्वी चाचणी
- Sonia Gandhi : सोनिया गांधींविरुद्ध बिहारमध्ये खटला दाखल!