दिल्ली विधानसभा निवडणुकीत मतदान होण्याच्या आदल्याच दिवशी काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत देताना काँग्रेसचे स्वप्न जाहीरपणे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदींना २०२९ पूर्वी त्यांच्या खुर्चीवरून उतरवून विरोधी बाकांवर बसवायचे काँग्रेसचे स्वप्न आहे. त्याशिवाय माझी तपस्या पूर्ण होणार नाही. नरेंद्र मोदी रिटायर्ड होतील, तर मग काय फायदा??, त्याच्या आधीच त्यांना सत्तेवरून खाली खेचून विरोधी बाकांवर बसविणे हे काँग्रेस सह देशातल्या करोडो लोकांचे स्वप्न आहे, असे पवन खेडा म्हणाले.
दिल्ली निवडणुकांपूर्वी काँग्रेसने ही “स्वप्न भरारी” मारल्याने काँग्रेसला विधानसभा निवडणुकीच्या मतदानात फायदा होईल, असा पक्षाच्या नेत्यांचा होरा होता. पण एक्झिट पोलने तरी तो होरा खोटा ठरविला आणि काँग्रेसच्या मित्र पक्षांनी एक्झिट पोलच्या आकडेवारीचा आधार घेऊन काँग्रेसला Indi आघाडीच्या नेतृत्व पदावरून हाकलायची तयारी चालवली.
काँग्रेस हरियाणा हरली, महाराष्ट्रात हरली, आता दिल्लीत हरण्याची चिन्हे दिसत आहेत. कारण या सगळीकडे काँग्रेस एकटी लढली. त्या पक्षाने Indi आघाडीतल्या मित्र पक्षांशी पंगा घेतला. पण निदान दिल्लीतल्या पराभवानंतर तरी काँग्रेसमध्ये अंतर्गत मंथन करून आपला पक्ष Indi आघाडीचे नेतृत्व करायला लायक आहे का??, हे तपासून पाहिले पाहिजे, असा टोला तृणमूल काँग्रेसचे खासदार कीर्ती आझाद यांनी हाणला.
– काँग्रेस विरुद्ध प्रादेशिक पक्ष
लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस विरोधात Indi आघाडीत कुरबुरी सुरू झाल्या होत्या, पण हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभांच्या निवडणुकीनंतर त्या वाढल्या. दिल्ली निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसचे Indi आघाडीतले नेतृत्व नाकारले. ममता बॅनर्जी यांनी ते आधीच फेटाळून लावले. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या निवडणुकीनंतर काँग्रेसशी फारकत घेतली. अखिलेश यादवांनी उत्तर प्रदेशात Indi आघाडी नव्हे, तर PDA म्हणजे पिछडे + दलित + आदिवासी आघाडी चालवली. त्या पाठोपाठ दिल्ली निवडणुकांचे निकालाची वाट न पाहता बाकी सगळ्या मित्र पक्षांनी देखील काँग्रेसला Indi आघाडीच्या नेतृत्व पदावरून हाकलायची तयारी चालवली. हे सगळे काँग्रेसने नरेंद्र मोदींना विरोधी बाकांवर बसवायची “स्वप्न भरारी” घेतल्याच्या पार्श्वभूमीवर घडत चालले. या राजकारणाचा नेमका अर्थ काय असेल??