दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टीचा पराभव झाला. भाजप 27 वर्षांनी दिल्लीच्या गादीवर परतली आणि काँग्रेसला शून्य भोपळा मिळाला. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप मुख्यालयातल्या जल्लोष सभेत भाषण करताना काँग्रेसवर जुनाच आरोप केला. काँग्रेसचा हात ज्याच्यावर पडला, त्याचा बेडा गर्ग झाला. म्हणजे त्याची बोट कायमची बुडाली, असे मोदी म्हणाले. त्यासाठी त्यांनी मुलायम सिंग यादव, लालूप्रसाद यादव, करुणानिधी ममता बॅनर्जी यांच्या पक्षांची उदाहरणे दिली. एक प्रकारे मोदींनी काँग्रेस प्रणित Indi आघाडीला पराभवाचे तोंड पाहण्यासाठी आरसा दाखवला.
पण मोदींनी दाखविलेल्या आरशात जसेच्या तसे १०० % सत्यच दिसले, असे मानायचे कारण नाही. कारण मोदींनी राजकीय भाषण करून Indi आघाडीत मतभेदाची पाचर मारून ठेवली. तो मोदी आणि भाजपच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचा भाग ठरला. पण म्हणून मोदींनी केलेल्या आरोपांनुसार फक्त काँग्रेसनेच कायम मित्र पक्षांना खाल्ले आणि मित्र पक्षांनी काँग्रेसला काहीच डॅमेज केले नाही, असे मानणे राजकीयदृष्ट्या चूक आणि वस्तुस्थितीला नाकारणारे ठरेल.
अगदी मोदींनी दिलेली उत्तर प्रदेश, बिहार आणि बंगाल या तिन्ही राज्यांची उदाहरणे घेतली, तरी फक्त काँग्रेसनेच मित्र पक्षांना खाल्ले हे म्हणणे राजकीय दृष्ट्या चूकच ठरेल. कारण या तिन्ही राज्यांत काँग्रेसची व्होट बँक समाजवादी पार्टी, राष्ट्रीय जनता दल आणि तृणमूळ काँग्रेस यांनी सुरुवातीला खाल्ली. काँग्रेस संघटना भाजपच्या आधी समाजवादी पार्टी, राष्ट्रीय जनता दल यांनी पोखरून काढली. काँग्रेस आणि भाजप या दोन राष्ट्रीय पक्षांच्या सत्ता त्या राज्यांमध्ये असण्याच्या मधल्या काळात मुलायम सिंग यांची समाजवादी पार्टी आणि लालूप्रसाद यादव यांची राष्ट्रीय जनता दल यांनी सुमारे दशक ते दीड दशक उत्तर प्रदेश आणि बिहार वर राज्य केले, ते काँग्रेसच्या खाल्लेल्या व्होट बँकेच्या बळावर आणि पोखरलेल्या संघटनेवर!!
…आणि ज्यावेळी सोनिया गांधी यांना पंतप्रधान पदाची संधी आली, त्यावेळी मुलायम सिंग यादव यांनी ऐनवेळी पाठिंबा देण्याचे पत्र द्यायला नकार देऊन त्यांच्या पंतप्रधान पदाच्या महत्त्वाकांक्षेत कोलदांडा घातला होता. त्यामुळे काँग्रेसने जसे मित्र पक्षांना राजकीयदृष्ट्या वागविले, तसेच किंबहुना त्याहीपेक्षा खराब वर्तणूक मित्रपक्षांनी काँग्रेसला दिली, हा उत्तर प्रदेश आणि बिहार मधला इतिहास आहे.
पश्चिम बंगाल मध्ये सुद्धा फारसे वेगळे चित्र नाही. किंबहुना ममता बॅनर्जी यांच्यासारख्या मूळ कॉंग्रेसीच असलेल्या नेत्याने काँग्रेसची अख्खी व्होट बँक खाल्ली. मूळ काँग्रेसची संघटना नेस्तनाबूत केली आणि त्या बळावरच तृणमूळ काँग्रेसची पाळेमुळे पश्चिम बंगालमध्ये रोवली. ममतांनी पश्चिम बंगालमध्ये कम्युनिस्टांशी राजकीय पंगा घेतला हे खरंच, पण कम्युनिस्टांना संपविण्यापूर्वी ममतांनी काँग्रेसची संघटना पोखरली आणि काँग्रेसचीच व्होट बँक खाल्ली हे जास्त खरं आहे.
पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणामध्ये महाराष्ट्राचे उदाहरण दिले नाही, पण म्हणून महाराष्ट्रातली काँग्रेस आणि मित्र पक्षांची भांडणे आणि त्यांनी एकमेकांची व्होट बँक खाणे ही बाब लपून राहात नाही. शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची निर्मिती करताना मूळातच काँग्रेसच्याच व्होट बँकेवर डल्ला मारला. काँग्रेसचीच संघटना त्यांनी पोखरून काढली. काँग्रेसच्याच नेत्यांना फोडून त्यांनी आपला पक्ष टप्प्याटप्प्याने बळकट करत नेला. खरंतर पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांमध्ये मूळ काँग्रेस संघटनेला सुरुंग लावूनच ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांनी आपापले पक्ष वाढविले आणि आपापले घराणेशाहीचे राजकारण काँग्रेसवर लादून ते पुढे रेटले. हा इतिहास आणि वर्तमान आहे.
तामिळनाडूत देखील द्रविडी राजकारण काँग्रेसच्या सर्वसमावेशी राजकारणासाठी सूट झाले नाही म्हणून तिथे काँग्रेसची व्होट बँक घटली. संघटना संपुष्टात आली आणि त्याचा लाभ डीएमके आणि एआयडीएमके या द्रविडी पक्षांना मिळाला. त्यामुळे काँग्रेसने मित्र पक्षांना खाल्ले हा मोदींनी केलेला आरोप अर्धसत्य ठरला. त्याउलट मित्र पक्षांनी काँग्रेसचे जास्त नुकसान केले, हे परखड वास्तव वेगवेगळ्या राज्यांचा आढावा घेतल्यानंतर अधिक ठळकपणे समोर आले.
Congress damaged alliance partners, alliance partners damaged Congress much more
महत्वाच्या बातम्या
- US H-1B visa : अमेरिकेच्या H-1B व्हिसासाठी अर्ज करण्याची तारीख जाहीर
- Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल अन् संजय सिंह यांची चौकशी करण्यासाठी ACBचे पथक रवाना
- S. Jaishankar: अमेरिकेने १५ वर्षांत किती भारतीयांना मायदेशी पाठवले?
- फडणवीसांनी राहुल गांधींवर केला कव्हर फायरिंगचा आरोप; पण मग केजरीवालांनी काय केलं??