वृत्तसंस्था
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची 10 जनपथ मध्ये जाऊन भेट घेतल्यानंतर पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी आज सायंकाळी केंद्रीय ग्रह आणि सहकार मंत्री अमित शहा यांची भेट घेतली. सोनिया गांधी यांच्याशी अमरिंदरसिंग यांची अत्यंत समाधानकारक चर्चा झाली, असे अमरिंदर सिंग यांचे मीडिया सल्लागार रविन ठकराल यांनी पत्रकारांना सांगितले.Capt Amarinder Singh meets Amit Shah after “satisfactory” discussions with Sonia Gandhi
सोनिया गांधी यांच्या समवेत अमरिंदर सिंग यांनी पंजाबमधल्या सरकार संदर्भात तसेच काँग्रेस संघटनेने संदर्भात चर्चा केली. काँग्रेस अध्यक्षांनी अमरिंदर सिंग यांना सरकार आणि पक्ष संघटना हातात हात घालून पुढे गेले पाहिजेत असा सल्ला दिला असेल, असे वक्तव्य काँग्रेसचे पंजाबचे प्रभारी हरीश रावत यांनी केले . नवज्योत सिंग सिद्धू आणि अमरिंदरसिंग यांच्यातल्या मतभेदांचे वर्णन फक्त प्रसारमाध्यमे करतात. अमरिंदर सिंग यांनी तशी कधी तक्रार केलेली नाही, असा दावा देखील हरीश रावत यांनी केला.
या पार्श्वभूमीवर सोनिया गांधी यांच्याशी तासभर चर्चा केल्यानंतर कॅप्टन अमरिंदरसिंग केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीला पोहोचले. अर्थात ही भेट देखील पूर्वनियोजित असल्याचे सांगण्यात येते. पंजाबमधल्या घुसखोरी संदर्भात लक्षात आलेल्या काही बाबी अमरिंदर सिंग यांनी अमित शहा यांच्या कानावर घातल्या असे सांगण्यात येत आहे.
त्याच बरोबर पंजाबमध्ये येत्या सहा महिन्यात विधानसभा निवडणूक आहे कॅप्टन अमरिंदरसिंग यांची भाजपशी गेल्या काही वर्षांपासून जवळीक असल्याचे बोलले जाते. या पार्श्वभूमीवर सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर ते अमित शहा यांच्या भेटीला पोहोचल्याने वेगवेगळे राजकीय तर्कवितर्क लावले जात आहेत.