विशेष प्रतिनिधी
मुंबई : गेल्या काही दिवसांत आणि विशेषतः दिवस आजच्या दिवसभरातील राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित बातम्यांचा नीट आढावा घेतला आणि काही बातम्या “बिटवीन द लाईन्स” वाचल्या, तर दिलेल्या शीर्षकाचा नेमका अर्थ लागेल. BJP is not splitting NCP, but NCP leaders are eager to get split
सध्या महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या फुटीची विशेषत: अजितदादा बाहेर पडण्याची जोरदार चर्चा आहे. मराठी माध्यमे सूत्रांच्या हवाल्याने बातम्या देत आहेत. पण याचा लघुत्तम साधारण विभाजक म्हणजे लसावि काढला, तर राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्यासाठी भाजप तयार असल्याचे राजकीय परसेप्शन मराठी माध्यमांनी तयार केले आहे. पण त्या पलिकडे जाऊन त्याच बातम्यांचे “बिटवीन द लाईन्स” वाचले आणि काही “डॉट्स” जोडले, तर प्रत्यक्षात भाजपकडून राष्ट्रवादीची फोडाफोडी करण्याची खेळी होण्याआधीच स्वतः राष्ट्रवादीतलेच काही नेते आणि आमदार फुटून घ्यायला उतावीळ झाले आहेत, असेच दिसून येते.
याचे पहिले उदाहरण दस्तूरखुद्द खासदार शरद पवारांचे आहे. शरद पवारांनी उद्धव ठाकरेंशी केलेल्या सिल्वर ओक मधल्या चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेस भाजप बरोबर जाणार नाही. जे जातील ते वैयक्तिक पातळीवर जातील. त्यांचा पक्षाशी संबंध असणार नाही, असे स्पष्ट केले आहे.
“राष्ट्रवादी भाजप बरोबर जाणार नाही”, हे शरद पवारांचे विधान आहे आणि पवारांनी केलेल्या विधानाचा नेमका उलटा अर्थ घ्यायचा असतो, असाच महाराष्ट्रातला राजकीय अनुभव आहे!!
त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पवारांच्या या वक्तव्याचा अर्थ पवारांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना वैयक्तिक निर्णय घ्या,अशी “राजकीय हिंट” दिल्याचाच काढण्यात येत आहे.
याखेरीस दुसरा “डॉट” म्हणजे अजितदादा आज अचानक सकाळी आपल पुण्याचा दौरा आणि कार्यक्रम रद्द करून मुंबईला गेले. ते देवगिरी बंगल्यात गेले, अशा बातम्या आल्या. अजितदादांच्या फुटीविषयी दिवसभर बातम्या चालल्या. त्या दरम्यान अजितदादांनी कोणताही खुलासा केला नाही. मात्र दिवसभर बातम्या चालल्यानंतर त्या बातम्यांची चविष्ट चर्चा रंगल्यानंतर सायंकाळी 6.30 नंतर वेगवेगळी ट्विट करून अजितदादांनी आपल्या बाजूचा खुलासा केला. याचा अर्थ राष्ट्रवादीच्या फुटीची दिवसभर चर्चा होत असताना त्याकडे अजितदादांनी दुर्लक्ष केले होते का??, असा सवाल तयार होतो. मात्र त्याचा खुलासा अजितदादांनी केला नाही, तर मराठी माध्यमांमध्ये आलेल्या बातम्या सत्य नसल्याचा खुलासा केला आहे, तो देखील सायंकाळी!!
दरम्यानच्या काळात माणिकराव कोकाटे आणि अण्णा बनसोडे या राष्ट्रवादीच्या दोन आमदारांनी खुलेपणाने अजितदादा जो निर्णय घेतील तो मान्य असेल, असे जाहीर करून टाकले आहे.
शिवसेनेचा ठाकरे गट मात्र शिवसेनेतल्या फुटी नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडण्यासाठी भाजप ईडी आणि सीबीआय यासारख्या केंद्रीय यंत्रणांचा वापर करत असल्याचे आरोप करत आहे. शिवसेनेत जी काय फूट व्हायची ती होऊन गेली आहे. त्यामुळे जी फूट होण्याची शक्यता आहे, ती राष्ट्रवादीतच आहे आणि राष्ट्रवादीतले वेगवेगळे “डॉट्स” जोडले तर त्या फुटीच्या दिशेने भाजप काही कारवाई करत असण्यापेक्षा राष्ट्रवादीचेच नेते स्वतः फुटून घ्यायला तयार आहेत असे दिसते.
दरम्यानच्या काळात प्रकाश आंबेडकरांनी देखील येत्या पंधरा दिवसात महाराष्ट्रात दोन राजकीय बॉम्बस्फोट होतील असे वक्तव्य केले आहे.त्याचा राष्ट्रवादीने अथवा बाकी कोणीही इन्कार केलेला नाही.
पण या सर्व घडामोडींमध्ये प्रत्यक्ष निर्णय घेणारे भाजपचे जे नेते आहेत, त्यांनी कोणतेही वक्तव्य केलेले नाही. भाजपच्या बाकीच्या नेत्यांची वक्तव्य प्रसार माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाली आहेत.
सत्तेशिवाय शहाणपण नाही!!; आमदार माणिकराव कोकाटेंच्या तोंडून बाहेर आले राष्ट्रवादीतले “सत्य”
महाराष्ट्रातले शिंदे – फडणवीस सरकार स्थिर झाल्याच्या पार्श्वभूमीवर ज्या राष्ट्रवादी काँग्रेसला 9 महिने सत्तेबाहेर राहावे लागले, त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे “सत्य” अखेर सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या तोंडून बाहेर आले. पत्रकार परिषदेत त्यांनी अजित पवार जो निर्णय घेतील त्याला पाठिंबा जाहीर करताना सत्तेशिवाय शहाणपण नाही आणि विकासासाठी सत्ता आवश्यकच आहे, असे वक्तव्य केले.
गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा अजितदादांच्या बंडाची आणि राष्ट्रवादीच्या फुटीची चर्चा महाराष्ट्रात जोरावर आहे. त्यासाठी शिवसेनेचा ठाकरे गट भाजपला जबाबदार ठरवत आहे. किंबहुना शिवसेनेत ईडी आणि सीबीआय या यंत्रणांच्या आधारे जशी भाजपने फूट पाडली, तशीच फूट राष्ट्रवादीत पाडण्यासाठी भाजप यंत्रणांचा गैरवापर करतो आहे, असा आरोप खासदार संजय राऊत, उद्धव ठाकरे त्याचबरोबर राष्ट्रवादीतल्या काही नेत्यांनी केला. नागपूरच्या वज्रमूठ सभेत देखील या आरोपांचे पडसाद उमटले. यातून भाजप बाकीचे सर्व विरोधी पक्ष फोडण्यासाठी वेगवेगळ्या राजकीय हत्यारांचा वापर करत असल्याचे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न झाला.
परंतु प्रत्यक्षात माणिकराव कोकाटे यांच्या तोंडून राष्ट्रवादीचे “राजकीय सत्य” बाहेर पडले. सत्तेशिवाय शहाणपण नाही. विकास कामांसाठी सत्ता हाच एक पर्याय आहे. प्रश्न सोडविण्यासाठी सरकारमध्ये असणे महत्त्वाचे आहे. अजितदादा पक्षाला विचारूनच सर्व निर्णय घेतील. अजितदादा हेच सध्या पक्षातले सगळ्यात विधिमंडळातले ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना सर्वाधिकार आहेत. अजितदादा बाहेर पडले, तर राष्ट्रवादीच उरणार नाही, असे वक्तव्य आमदार माणिकराव कोकाटे यांनी केले. त्याचवेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या सर्व्हेमध्ये भाजपचे महाराष्ट्रात 10 – 15 खासदार येतील. त्यामुळे राष्ट्रवादीची गरज भाजपला लागेल, असा दावाही केला आहे.
मात्र, याच पत्रकार परिषदेत सत्तेशिवाय शहाणपण नाही हे वाक्य उच्चारून माणिकराव कोकाटे यांच्या तोंडी राष्ट्रवादीतले सत्यच बाहेर आले आहे आणि हाच सर्वात कळीचा मुद्दा आहे. भाजप राष्ट्रवादीला फोडण्यासाठी पुढे सरसावण्याऐवजी राष्ट्रवादीच स्वतःहून फुटण्यासाठी पुढे येत आहे हेच सत्य उघड झाले आहे.
भाजप इतर पक्ष फोडण्यापेक्षा भाजपची सत्ता महाराष्ट्रात स्थिरावल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसलाच सत्तेचा वाटा मिळवायचा असेल, तर भाजप शिवाय पर्याय नाही हेच यातून स्पष्ट झाले आहे. शरद पवारांनी स्वाभिमानाच्या मुद्द्यावर काँग्रेस मधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेसची वाट चोखाळली असली तरी अखेर सत्तेसाठी त्यांना पुन्हा काँग्रेसच्याच वळचणीला जावे लागले. पण आता काँग्रेसच्या वळचणीला जाऊनही पुन्हा सत्तेचा मार्ग खुला होणार नाही. भाजपला वगळून महाराष्ट्रात सत्ता स्थापनही होऊ शकणार नाही ही राजकीय अपरिहार्यता राष्ट्रवादीच्या सर्वच नेतृत्वाच्या लक्षात आल्याचे माणिकराव कोकाटे यांचे वक्तव्य हे निदर्शक आहे!!
BJP is not splitting NCP, but NCP leaders are eager to get split
महत्वाच्या बातम्या
- कर्नाटकात राहुल गांधींच्या दोन रॅली झाल्या; पण अतीकच्या बातम्यांपुढे नॅशनल मीडियात झाकोळल्या!!
- ‘’उत्तराखंडमध्ये ‘लँड जिहाद’ आणि ‘मझार जिहाद’ खपवून घेणार नाही’’ – पुष्करसिंह धामींचा इशारा!
- सावरकरांचा अपमान : मालेगावच्या सभेत उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना दम, पण नागपूरच्या सभेत वडेट्टीवार कन्येपुढे नांगी!!
- न्यू इंडियन एक्सप्रेस कृत राष्ट्रवादीतल्या अस्वस्थतेचे पोस्टमार्टेम : अजितदादा हे अमित शहांना भेटले? प्रफुल्ल पटेलही अजितदादांच्या बाजूने?