वृत्तसंस्था
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा काही दिवसांवर आली असताना सगळ्या पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर केले. त्याच पद्धतीने एआयएमआयएम पक्षाचे उमेदवार जाहीर होत आहेत. पण त्यापलीकडे जाऊन त्या पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर आणि आम आदमी पार्टीवर एक वेगळाच आरोप केला. दिल्लीतल्या इतर विभागांमधला सगळा कचरा गोळा करून आम आदमी पार्टीचे सरकार तो कचरा मुस्लिम बहुल इलाख्यामध्ये फेकत आहे, असा आरोप ओवैसी यांनी केला.
दिल्लीत आम पार्टीच्या सरकारने सगळीकडे मोहल्ला क्लिनिक खोलली. सरकारी शाळा सुधारण्याचा दावा केला, पण मुस्लिम बहुल विभागांमध्ये त्यांनी कुठल्या सुधारणा केल्या नाहीत. मुस्लिम बहुल इलाख्यामधली मोहल्ला क्लिनिक बंद पडली आहेत. शाळा ओस पडल्या आहेत. मोदी सरकार प्रधानमंत्री आवास योजनेतील घरे मुस्लिमांना मुद्दामून देत नाही, अशा आरोपांच्या फैरी असदुद्दीन ओवैसी यांनी झाडल्या.
त्यापलीकडे जाऊन ओवैसी यांनी आम आदमी पार्टीचे सरकार दिल्लीतल्या इतर विभागांमधला कचरा गोळा करून तो सगळा कचरा मुस्लिम बहुल इलाख्यांमध्ये आणून फेकत आहेत. त्यामुळे मुस्लिमांचे आरोग्य धोक्यात येत आहे, असा आरोप केला. असदुद्दीन ओवेसी यांचा पक्ष एआयएमआयएम दिल्ली विधानसभेच्या काही जागा लढवणार असून त्यांनी दिल्ली दंगलीतील आरोपी ताहीर हुसेन याची उमेदवारी देखील जाहीर केली आहे.