विशेष प्रतिनिधी
लखनौ : 2024 च्या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पार्टीचे नेते आणि उत्तर प्रदेश माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी भाजप विरोधात 80 हराओचा नारा दिला आहे, पण यातून ते उत्तर प्रदेशात मध्य प्रदेशातला “बदला” घेण्याच्या तयारीत दिसत आहेत. अखिलेश यादव यांना उत्तर प्रदेशातल्या 80 जागांवर हरवायचे भाजपला, पण ते मधल्या मध्ये काँग्रेसचाच पतंग काटण्याच्या बेतात आहेत!! Akhilesh Yadav’s slogan of beating 80
अखिलेश यादव यांनी लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात समाविचारी पक्षांची आघाडी करायची तयारी दाखवली आहे. समाजवादी पार्टी मित्र पक्षांचा सन्मान करेल. त्यांना सन्मानपूर्वक जागावाटप करेल, असे आश्वासन दिले आहे. पण सन्मानपूर्वक म्हणजे नेमके किती आणि कुणाला??, याबद्दल मात्र अखिलेश यादव यांनी खुलासा करायचे चतुराईने टाळले आहे. समाजवादी पार्टी मित्र पक्षांचा “सन्मान” राखेल. त्यांना “सन्मानपूर्वक” जागावाटप करेल, एवढेच मर्यादित वक्तव्य करून अखिलेश यादव यांनी वेगळ्या राजकीय खेळीचा इरादा सूचकपणे व्यक्त केला आहे.
अखिलेश यादवांच्या या राजकीय खेळीची पाळेमुळे मध्य प्रदेशात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत दडली आहेत.
मध्य प्रदेशात अखिलेश यादव यांनी समाजवादी पार्टीसाठी काँग्रेसकडे 234 पैकी फक्त 6 विधानसभा मतदारसंघ सोडण्याची मागणी केली होती. परंतु मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी, “कौन अखिलेश विखलेश??,” अशा शब्दांमध्ये अखिलेश यादव यांची खिल्ली उडवून समाजवादी पार्टीला एकही जागा सोडली नव्हती.
समाजवादी पार्टीने मध्य प्रदेशात 70 जागांवर निवडणूक लढवली आणि त्यापैकी 52 जागांवर काँग्रेसचा पराभव झाला. अर्थात काँग्रेसचा एकूण झालेला दारूण पराभव पाहता समाजवादी पार्टीचा त्या पराभवात हात असण्याची टक्केवारी 2 – 3 % पलिकडे नाही. पण समाजवादी पार्टीची थोडीफार मते जरी काँग्रेसकडे वळली असती, तरी काँग्रेसला फार तर 2 – 4 जागांचा फायदा झाला असता. भाजपला 10 -15 जागांचा फटका बसला असता. पण एकूण आकडेवारी पाहता भाजपच सत्तेवर आला असता. पण काँग्रेसने आपल्या फायद्याकडे दुर्लक्ष केले आणि आत्मविश्वासाने मध्य प्रदेशात निवडणुकीला सामोरे गेली, पण हा “आत्मविश्वास” खोटा असल्याचे मतदारांनी सिद्ध केले. काँग्रेसला मध्य प्रदेशात फक्त 66 जागा मिळाल्या.
अखिलेश यादव यांना मध्य प्रदेशात काँग्रेसने दिलेली जखम चांगलीच झोंबली आणि त्याचाच “बदला” आता उत्तर प्रदेशात घेण्याची तयारी त्यांनी चालवली आहे. त्यामुळे ते उत्तर प्रदेशातल्या 80 लोकसभा मतदारसंघांपैकी काँग्रेसला नेमक्या किती जागा देणार याविषयी चकार शब्द उच्चारायला तयार नाहीत. मित्र पक्षांना “सन्मानपूर्वक” जागा देऊ एवढेच शब्द त्यांनी उच्चारले आहेत आणि इथेच खरी अखिलेश यादव यांच्या वक्तव्यातील “राजकीय मेख” आहे.
अखिलेश यादव यांना काँग्रेसचा जो “सन्मान” वाटतो, तोच “सन्मान” काँग्रेसला देखील वाटतो का??, हा खरा प्रश्न आहे. म्हणजेच उत्तर प्रदेशात अखिलेश यादव लोकसभेचे 80 जागांपैकी जेवढ्या जागा देऊ इच्छितात, तेवढ्याच जागांवर काँग्रेसचे समाधान होईल का नाही??, याविषयी दाट शंका आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात लोकसभा निवडणुकीत अखिलेश यादव विरुद्ध काँग्रेस असे भांडण जागा वाटपात लागण्याची दाट शक्यता आहे. किंबहुना अखिलेश यादवांच्या या वक्तव्यातूनच ते सूचित झाले आहे.
Akhilesh Yadav’s slogan of beating 80
महत्वाच्या बातम्या
- 6 मोबाइल फोन, URL आणि बँक अकाउंटवरून उलगडणार संसदेच्या सुरक्षेतील त्रुटींचे रहस्य
- Stock Market : शेअर बाजारात झंझावाती तेजी, निफ्टी नव्या विक्रमी उच्चांकावर, सेन्सेक्स 71,000 च्या जवळ
- मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही, त्यांना वेगळ आरक्षण द्या, पण झुंडशाही थांबवा; भुजबळांनी सुनावले
- RBI Action: RBIची पाच सहकारी बँकांवर कारवाई, लाखोंचा दंडही ठोठावला