• Download App
    ठाकरे - पवारांनी टेनिस मॅच खेळण्याएवढे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद मिळवणे सोपे उरलेय का??; खरे "पंच" तर बसलेत दिल्लीत!! Thackeray and Pawar has no capacity to decide maharashtra chief ministership on their own, as BJP has the decisive power for that

    ठाकरे – पवारांनी टेनिस मॅच खेळण्याएवढे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद मिळवणे सोपे उरलेय का??; खरे “पंच” तर बसलेत दिल्लीत!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : उद्धव ठाकरेंनी सिल्वर ओक वर जाऊन शरद पवारांची भेट घेतली. याला आता आठवडा उलटून गेला. पण दरम्यानच्या काळात त्या दोघांमध्ये सिल्वर ओक वर काय चर्चा झाली?? याच्या वेगवेगळ्या बातम्या येऊन गेल्या. त्या पलीकडे जाऊन ज्यावेळी अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदाच्या बातम्या जोरावर होत्या, त्यावेळी शिवसेनेच्या शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी एक दावा केला, की उद्धव ठाकरे यांनी सिल्वर ओक वर शरद पवारांशी चर्चा करताना आपला मुख्यमंत्री पदाचा हक्क सोडून अजितदादांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा करून दिला. Thackeray and Pawar has no capacity to decide maharashtra chief ministership on their own, as BJP has the decisive power for that

    आता हा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पद जाण्याच्या पार्श्वभूमीवर होता. संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंचे सरकार 15 दिवसात पडेल, असे भाकीत केल्यानंतर त्याला प्रतिवाद करताना नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडण्याचे वक्तव्य केले होते.

    पण मराठी माध्यमांनी त्याच्या बातम्या करताना असे काही “पवारनिष्ठ नॅरेटिव्ह” तयार केले, की जणू काही ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद सोडणे आणि पवारांनी ते सहज घेणे एवढे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद “सोप्पे” आहे!!

    पण मराठी माध्यमांनी जरी अशा बातम्या केल्या तरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद मिळवणे हे ठाकरे आणि पवार यांच्यातल्या राजकीय टेनिस मॅच सारखे आहे का??, की ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा बॉल पवारांच्या कोर्टात टाकावा आणि पवारांनी तो त्यांना हवा तसा टोलवावा, एवढे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद मिळवणे सोपे राहिले आहे काय?? तर याचे उत्तर “अजिबात नाही”, असे आहे!!



    ठाकरे – पवारांचे तोकडे कर्तृत्व

    कारण ठाकरे आणि पवार जर एकत्र किंवा विभक्त एवढे मोठे नेते असते, तर त्यांनी केव्हाच स्वबळावर किंवा आघाडी करून जनतेचा स्पष्ट कौल मिळवून म्हणजे स्पष्ट बहुमत मिळवून आपापल्या पक्षांचा मुख्यमंत्री करून दाखवला असता. पण उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना ते जमलेले नाही!!

    बाळासाहेब ठाकरे हयात असताना आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर देखील शिवसेनेला कधीच स्वबळावर सत्ता मिळवता आलेली नाही. स्वतःचा मुख्यमंत्री करता आलेला नाही. अर्थात हेही तितकेच खरे आहे की बाळासाहेब ठाकरे हयात असेपर्यंत शिवसेना आणि भाजप यांची युती तुटली नव्हती आणि बाळासाहेब हेच शिवसेना – भाजप युतीचे महाराष्ट्रातले सर्वोच्च नेते होते. त्यामुळे जे कोणी मुख्यमंत्री झाले, ते बाळासाहेबांच्या मर्जीतले होते, हे मान्यच करावे लागेल!!

     

    पण बाळासाहेबांचे राजकीय कर्तृत्व हा इथला विषय नसून तो स्वतंत्र विषय आहे.

    त्या पलीकडे जाऊन उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी एकत्रित रित्या किंवा स्वतंत्रपणे आपापल्या ताकदीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद शिवसेना अथवा राष्ट्रवादी काँग्रेस यांना मिळवून दाखवले आहे??, काय याचे उत्तर नकारार्थीच आहे!!

    उद्धव ठाकरे यांनी 2014 मध्ये युती तुटल्यानंतर स्वतंत्रपणे निवडणूक लढवून शिवसेनेला फक्त 64 आमदार निवडून आणता आले होते, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारांची संख्या त्यावेळी 42 होती. पवारांनी धूर्तपणे शिवसेनेला वाकुल्या दाखवण्यासाठी भाजपने न मागताच त्यावेळी पाठिंबा देऊ केला होता. पण भाजपने तो घेतला नाही आणि नंतर शिवसेनेला मुकाटपणे देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात सहभागी व्हावे लागले होते. पण हे झाले 2014 ते 2019 या कालावधीतले!!

    2019 नंतर देखील उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या दोन्ही पक्षांना एकत्रित बेरीज करून देखील बहुमत मिळवता आलेले नव्हते. उद्धव ठाकरे यांना भाजप पासून फोडून मुख्यमंत्री पदाच्या घोड्यावर बसवताना शरद पवारांना काँग्रेसचा टेकू घेणे भाग पडले होते.

    महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात तडजोडीचे – राजकारण करून का होईना, पण शिवसेनेचे आत्तापर्यंत 4 मुख्यमंत्री झाले आहेत. मनोहर जोशी, नारायण राणे, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे ते मुख्यमंत्री आहेत, जे खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचे नेतृत्व मानत होते आणि आहेत!!

    पण पवारांचे काय?? शरद पवारांना स्वतःच्या मनातला मुख्यमंत्री आत्तापर्यंत बसवता आलेला नाही. (सुधाकरराव नाईक हे त्याला अपवाद होते, पण नंतर नाईकांनी पवारांविरुद्ध बंड केले होते हा इतिहास आहे.) पवार स्वतःच मुख्यमंत्री होते, पण काँग्रेसचे आणि त्याआधी जनता पक्षाच्या पाठिंब्यावरचे. हीच त्यांची राजकीय ताकद होती.

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर एकदाही पवारांना स्वपक्षाचा मुख्यमंत्री बसवता आलेला नाही. त्यांना तेवढा जनतेचा कौलही कधी मिळवता आलेला नाही. भाजपने 2014 आणि 2019 या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये 100 पेक्षा जास्त आमदार निवडून आणून दाखविले. पवारांना स्वबळावर इतिहासात कधीच राष्ट्रवादीचे 75 आमदार देखील निवडून आणता आलेले नाहीत. ते कायम जुगाड आणि तडजोडीचेच राजकारण करत राहिले आणि तरी देखील मराठी माध्यमांच्या “विशिष्ट मॅनेजमेंट” नुसार आपला राजकारणातला वकूब टिकवून राखू शकले.

    पण आता ती परिस्थिती उरलेली नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद आता ना ठाकरेंचा घास उरला आहे, ना पवारांचा!!

    आता तिथे केंद्रातले मग काँग्रेसचे किंवा भाजपचे सरकार असो, त्यांचा हस्तक्षेप निर्णायक ठरलेला आहे. 2011 मध्ये काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पवारांच्या मनाविरुद्ध पृथ्वीराज चव्हाण यांना मुख्यमंत्री केले होते. तो सल आणि तो राग आजही पवारांच्या मनात कायम आहे. अजित पवारांनी सकाळला दिलेल्या मुलाखतीतून तो बाहेर आला. पृथ्वीराज बाबांबरोबर आम्ही नाईलाजाने काम केले, असे ते म्हणाले.

    त्यानंतरही देवेंद्र फडणवीस 5 वर्षे पवारांच्या मनाविरुद्धचे मुख्यमंत्री होते. अडीच वर्ष उद्धव ठाकरे यांना पवारांनी राजकीय घोड्यावर बसवून जरूर मुख्यमंत्री करून दाखवले, पण अडीच वर्षानंतर त्यांचा तो डावही संपला आणि आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले आहेत, ते पवारांच्या मर्जीने नव्हे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मर्जीने!!

    त्यामुळे ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदावरचा दावा सोडला आणि तो पवारांनी स्वीकारला असा “पवारनिष्ठ नॅरेटिव्ह” चालविणाऱ्या बातम्या मराठी माध्यमांनी कितीही केल्या असल्या, तरी ती वस्तुस्थिती नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद मिळवणे ठाकरे – पवारांनी टेनिस मॅच खेळण्याएवढे सोपे उरलेले नाही. ते ठरविणारे पंच दिल्लीत बसले आहेत!!

    Thackeray and Pawar has no capacity to decide maharashtra chief ministership on their own, as BJP has the decisive power for that

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस