वृत्तसंस्था
पुणे : मार्केट यार्डात नागरिकांनी भाजी खरेदीसाठी गुरुवारी ( ता.15) तुफान गर्दी केली. त्यामुळे संचारबंदीच्या पहिल्या दिवसाचा फज्जा उडाला आहे. Storm crowd in Pune’s market yard
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 15 दिवसांच्या कठोर निर्बंधांची घोषणा केली. संचारबंदी लागू होऊन काही तास उलटत नाहीत, तोच पुणे मार्केट यार्डात नागरिकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळाले.
नागरिकांबरोबर भाजी विक्रेते मार्केटमध्ये मोठ्या संख्येने आले. त्या बरोबर माल वाहतुकीची वाहने, दुचाकी, चारचाकी आणि खरेदीदार यांची तोबा गर्दी मार्केट यार्डात झाली. पार्किंगही हाऊसफुल झाले. गाड्या लावायच्या कुठे? असा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे संचारबंदीच्या पहिल्या दिवसाचा फज्जा उडाला आहे. सरकारने भाजीपाला अत्यावश्यक सेवेत समाविष्ट केला आहे. अर्थात भोजनात भाजीशिवाय चव कशी लागणार ? , हे खरे असले तरी भाजी खरेदीसाठी उडालेली झुंबड कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर धोकादायक मानली जात आहे.
भाज्यांची दरवाढ ; जनता मार्केट यार्डात
पुण्यातील मार्केट यार्डातून भाजीपाला खरेदी केला जातो. नंतर त्याची विक्री उपनगरात होते. शनिवार आणि रविवारच्या लॉकडाऊनमुळे भाजीपाला उपनगरात म्हणावा तसा पोचला नाही. त्यानंतर गुढीपाडवा होता. एकंदर भाज्यांचे दर उपनगरात भडकले. 15 दिवसाचा लॉकडाऊन होताच नगरिकांची पावले भाजी खरेदीसाठी मार्केट यार्डात वळली. कमी दरात भाजी खरेदी करून स्टॉक करून ठेवण्याकडे त्यांचा कल असल्याचे यातून स्पष्ट होते.