प्रतिनिधी
हिंगोली : शिवसेना आणि भाजपचा सध्याच्या राजकीय भांडणात एकेकाळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी विरोधात तगडी लढाई लढणारा शिवसैनिक प्रचंड अस्वस्थ असल्याचे दिसून येत आहे. हिंगोलीचे माजी खासदार एडवोकेट शिवाजी माने यांच्या तोंडून हीच अस्वस्थता बाहेर आली आहे.Shiv Sena-BJP are fighting, Congress-NCP are having fun from outside
शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत आणि भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या एकमेकांवर जोरदार तोफा डागत आहेत. संजय राऊत यांची भाषा तर शिव्या पर्यंत खाली आली आहे.
या पार्श्वभूमीवर माजी खासदार एडवोकेट शिवाजी माने यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत सर्वसामान्य शिवसैनिकांची खंत आणि संताप बोलून दाखवला आहे. ज्या शिवसैनिकांच्या रक्ताने आणि घामाने शिवसेना मोठी झाली, त्या शिवसैनिकांसाठी काहीतरी करा. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेच्या आणि मातोश्रीच्या जुन्या काही गोष्टी बाहेर काढून उखाळ्यापाखाळ्या काढू नयेत. शिवसेनेच्या नेत्यांनी देखील राणे साहेबांना अनावश्यक टोचू नये, असे आवाहन शिवाजी माने यांनी केले आहे.
एके काळी राणेसाहेबांनी आपल्या रक्ताने आणि घामाने शिवसेनेला मोठे केले शिवसेनेसाठी ते खपले होते, अशी आठवण त्यांनी करून दिली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी विरोधात लढताना त्यावेळच्या सरकारांनी शिवसैनिकांवर अनेक खटले घातले आहेत त्या खटल्यांचे निकाल अजून लागले नाहीत, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.
त्याच वेळी त्यांनी शिवसेना आणि भाजपच्या दोन नेत्यांना गंभीर इशाराही दिला आहे. आज तुम्ही एकमेकांशी भांडत आहात पण एकेकाळी तुम्ही ज्यांच्याशी लढत होतात ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले बाहेर उभे राहून तुमच्या भांडणाची मजा पाहताहेत, असा टोला शिवाजी माने यांनी लगावला आहे.
शिवाजी माने यांच्या मुखातून सर्वसामान्य शिवसैनिकाची तसेच सर्वसामान्य भाजपच्या कार्यकर्त्यांची भावना व्यक्त होत असल्याची प्रतिक्रिया सोशल मीडिया वरून देखील व्यक्त होताना दिसत आहे.
Shiv Sena-BJP are fighting, Congress-NCP are having fun from outside
महत्त्वाच्या बातम्या